रिलायन्सच्या नेतृत्वाखाली कॅम्पाची दमदार एन्ट्री; पेप्सी-कोकसमोर नवे आव्हान

कॅम्पा हे एक सॉफ्ट ड्रिंक ब्रँड असून, ज्याला 80 आणि 90 च्या दशकात भारतीय ग्राहकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली होती. दरम्यान, त्या काळात या स्वदेशी पेयाने लोकांच्या मनात खास स्थान मिळवले होते. मात्र, नंतर पेप्सी (Pepsi) आणि कोकसारख्या (CocaCola) परदेशी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केले आणि कॅम्पा हळूहळू मागे पडायला लागला.  काळाने पुन्हा वळण घेतले आणि 2022 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी कॅम्पा ब्रँड सुमारे 22 कोटी रुपयांना विकत घेतला.

दरम्यान, रिलायन्सने 2023 मध्ये कॅम्पाला (Campa) नव्या रूपात बाजारात पुन्हा लाँच केले. यावेळी सर्वात मोठी रणनीती म्हणजे कमी किंमत. कॅम्पा ₹10 मध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली. जे की कॅम्पा पेप्सी आणि कोकसारख्या ब्रँडच्या जवळपास निम्म्या किमतीत होता. सुरुवातीच्या काळात पेप्सी आणि कोकने याकडे फारसे लक्ष दिले नाही, पण हळूहळू कॅम्पाची बाजरात होणारी मागणी बघता त्यांच्यासाठी हे आव्हान ठरू लागली. आज अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पेप्सी-कोकसोबत कॅम्पालाही प्राधान्य दिले जाते.

शिवाय, आत्ताच्या काळात बाजारातील वाढीचे आकडेही हेच दर्शवतात. 2024 मध्ये भारतातील कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक बाजारपेठेत कॅम्पाचा वाटा सुमारे 2% होता. आता तो वाढून 7% झाला. तर, मार्च 2025 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कॅम्पाचा महसूल सुमारे 1000 कोटी रुपये होता. जरी हा आकडा पेप्सी आणि कोकच्या तुलनेत कमी असला, तरी रिलायन्सची ही मोठी योजना आहे. पुढील तीन वर्षांत कॅम्पाचा बाजार हिस्सा 25% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते.

रिलायन्सच्या वाढीमागे ‘प्राईज वॉर’ ही मुख्य रणनीती आहे. आपल्या सर्वांना तर माहितीच आहे, 2016 मध्ये जिओने स्वस्त डेटा देऊन टेलिकॉम क्षेत्रात मोठा बदल घडवला होता. त्याच टेकनिकने कॅम्पाच्या कमी किमतीमुळे पेप्सी आणि कोकवर दबाव वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, रिलायन्स हे प्राईज वॉर पुढील काही वर्षे चालू ठेवू शकते, ज्यामुळे स्पर्धा आणखी तीव्र होऊ शकते.

Comments are closed.