WEFचे अध्यक्ष बोर्गे ब्रेंडे यांचा राजीनामा; जेफ्री एपस्टाईन संबंधांमुळे चौकशी
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) चे अध्यक्ष आणि सीईओ बोर्गे ब्रेंडे (Former Minister of Foreign Affairs of Norway Borge Brende) यांनी राजीनामा दिला आहे. जिनेव्हा येथील संस्थेने दोषी ठरवलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी असलेल्या त्यांच्या संबंधांची चौकशी सुरू केल्यानंतर काही आठवड्यांनंतरच त्यांचा हा निर्णय समोर आला आहे. ब्रेंडे 2017 पासून WEF चे नेतृत्व करत होते मात्र, स्वित्झर्लंडस्थित संघटनेने त्यांच्या राजीनाम्याची पुष्टी केली आणि अलोइस झ्विंगली यांना इथून पुढची जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या न्याय विभागाच्या अहवालानंतर ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार , अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कागदपत्रांवरून असे दिसून आले की, ब्रेंडे यांनी एपस्टाईनसोबत तीन वेळा बिझनेस डिनर केले होते आणि त्यांनी त्यावेळी ईमेल आणि मजकूर संदेशांद्वारे देखील संवाद साधला होता. या खुलाशांनंतर, जिनेव्हास्थित एजन्सीने ब्रेंडेच्या मागील सर्व संपर्कांची स्वतंत्र चौकशी सुरू केली.
इंटरनल रिव्यू मध्ये दुसरे काहीही चुकीचे आढळले नाही.
WEF चे सह-अध्यक्ष आंद्रे हॉफमन आणि लॅरी फिंक यांनी एक वेगळे निवेदन जारी करत म्हटले की, बाहेरील वकिलांनी केलेली चौकशी पूर्ण झाली आहे. दरम्यान, तपासात एपस्टाईनशी असलेल्या संबंधांव्यतिरिक्त काहीही नवीन किंवा संशयास्पद आढळले नाही जे आधीच उघड झाले होते. मात्र, विश्वस्त मंडळ आता ब्रँडेसच्या उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया सुरू करेल.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि जेफ्री एपस्टाईन वाद काय ?
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी स्वित्झर्लंडमधील दावोस (Davos) येथे एक शिखर परिषद आयोजित करते, जिथे जगभरातील राजकारणी, अब्जाधीश आणि व्यावसायिक नेते सहभागी दर्शवत असतात. जेफ्री एपस्टाईन हे एक अमेरिकन फायनान्सर होते ज्यांना लैंगिक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. 2019 मध्ये तुरुंगात त्यांचे निधन झाले. एपस्टाईनच्या उच्च-प्रोफाइल व्यक्तींशी असलेल्या संबंधांमुळे जगभरातील अनेक प्रमुख व्यक्तींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जेफ्री एपस्टाईनशी संबंधित गुप्त कागदपत्रांमधून अनेक प्रमुख नावे उघड झाली.
अमेरिकेतील लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन (Jeffrey Edward Epstein) यांच्याशी संबंधित गुप्त कागदपत्रे उघड झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने 30 जानेवारी रोजी सुमारे 30 लाख पानांचे कागदपत्रे प्रसिद्ध केले आहे. शिवाय, 10 देशांमधील 15 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. तर, 80 हून अधिक शक्तिशाली व्यक्तींची देखील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या फायलींमध्ये राजकारणी, राजदूत, अब्जाधीश आणि राजघराण्यातील लोकांची नावे समोर आली आहेत. ईमेल, फ्लाइट लॉग आणि फोन रेकॉर्डमध्ये 700 ते 1000 प्रभावशाली लोकांचा उल्लेख सुद्धा असल्याचे दिसून आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये, अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, तर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump U.S. President), माजी अध्यक्ष बिल क्लिंटन (Bill Clinton) आणि हिलेरी क्लिंटन (Hillary Clinton) सारखी हाय-प्रोफाइल नावे कागदपत्रांमध्ये विविध संदर्भात आढळली आहेत.
जेफ्री एपस्टाईन कोण होते?
जेफ्री एपस्टाईन हा मुळता न्यू यॉर्कमधील एक करोडपती फायनान्सर होता ज्याची प्रमुख राजकारणी आणि सेलिब्रिटींशी मैत्री होती. दरम्यान, 2005 मध्ये त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. तर, 2008 मध्ये, त्याला एका अल्पवयीन मुलीकडून लैंगिक शोषणाची मागणी केल्याबद्दल दोषी ठरवले होते आणि त्याने 13 महिने तुरुंगवास भोगला. 2019 मध्ये, जेफ्रीला लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तथापि, खटल्यापूर्वीच त्याने तुरुंगात आत्महत्या केली होती. आता, त्याची जोडीदार, घिसलेन मॅक्सवेल (Ghislaine Maxwell), हिला 2021 मध्ये त्याला मदत केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले, ती 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे.
Comments are closed.