प्रीमियमचा परतावा देणारा टर्म इंश्युरन्स प्लॅन तुमच्यासाठी खरंच चांगला आहे का?
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पुरेसा लाईफ इंश्युरन्स असणे कधीही चांगलेच. यामुळे तुमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना एक आधार मिळतो. काही बरेवाईट झाले तर इंश्युरन्स क्लेमच्या पैशाची बरीच मदत होऊ शकते. असे असले तरी बरेच लोक इंश्युरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या दोन गोष्टींची गल्लत करताना दिसतात. पारंपरिक लाईफ इंश्युरन्स पेक्षा स्वतंत्र टर्म प्लॅन असावा असा विचार करणारे लोक तुलनेने कमी असतात. दिवसेंदिवस या संख्येत वाढ होते आहे ही मात्र चांगली गोष्ट आहे.
मात्र टर्म इंश्युरन्स घेतानाही अनेकजण गोंधळलेले दिसतात. याला कारण म्हणजे टर्म इंश्युरन्स चे वेगवेगळे प्रकार! काही टर्म इंश्युरन्स हे तुम्ही भरलेला प्रीमियम परत न देणारे म्हणजेच प्युअर टर्म प्लॅन असतात. तर काही टर्म प्लॅनमध्ये पॉलिसीच्या शेवटी तुम्ही भरलेला प्रीमियम काही प्रमाणात तुम्हाला परत मिळतो. प्रीमियमचे पैसे परत मिळतात म्हणून बऱ्याच जणांचा हा प्लॅन खरेदी करण्याकडे कल असतो. मग या दोनपैकी नक्की कोणता टर्म प्लॅन घ्यावा? आधी या दोन्ही प्लॅनची वैशिष्टये पाहू.
प्युअर टर्म प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्ही भरलेला प्रीमियम तुम्हाला परत मिळत नाही. या प्लॅनचा प्रीमियम तुमचे वय, पॉलिसीचे कव्हर किती रकमेचे आहे? आणि पॉलिसी किती वर्षांची आहे? या घटकांवरून ठरवला जातो. प्रीमियम दर महिन्याला, दर तिमाहीला, दर सहामाहीला किंवा दर वर्षाला भरण्याची सुविधा असते. या प्लॅनमध्ये तुम्हाला पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर कोणताही आर्थिक फायदा होत नाही. त्यामुळेच या प्लॅनचा प्रीमियम नेहमीच्या लाईफ इंश्युरन्स पॉलिसीपेक्षा बराच कमी असतो. हा प्लॅन घेताना वेगवेगळे रायर्डस तुम्ही त्याच्यासोबत जोडू शकता. अर्थात रायडर्स घेतले की प्रीमियम त्या प्रमाणात वाढतो.
प्रीमियमचा परतावा मिळणारा टर्म प्लॅन
नावारून लक्षात आले असेलच. पॉलिसीची मुदत संपल्यावरही तुम्ही जिवंत असाल तर तुम्ही भरलेला पूर्ण प्रीमियम किंवा त्यापैकी काही रक्कम तुम्हाला परत मिळते. या प्लॅनमध्ये तुम्ही जेवढा प्रीमियम भरला आहे त्यावर अवलंबून तुम्हाला कर्जही मिळू शकते. पुर टर्म प्लॅनमध्ये तुम्हाला कर्जाची सुविधा उपलब्ध नसते. या प्लॅनचा प्रीमियम तुम्ही एकरकमी किंवा हप्त्याने भरू शकता. मात्र प्युअर टर्म प्लॅनच्या तुलनेत या प्लॅनचा प्रीमियम जास्त असतो.
कोणता टर्म प्लॅन घ्यावा?
प्रीमियमचा परतावा देणाऱ्या टर्म प्लॅनची जाहिरात करताना बऱ्याच कंपन्या फुकट टर्म पॉलिसी अशी जाहिरात करताना दिसतात. तुम्ही भरलेला प्रीमियम तुम्हाला पॉलिसीच्या मॅच्युरिटीला परत मिळणार असल्याने ती पॉलिसी फ्रीच झाली असे सांगितले जाते. पण खरंच असे आहे का?
१. प्रीमियमचा परतावा देणाऱ्या टर्म प्लॅनचा प्रीमियम बराच जास्त असतो. तेवढ्याच रकमेचे पॉलिसी कव्हर असलेल्या प्युअर टर्म प्लॅनचा प्रीमियम बराच कमी असतो. प्युअर टर्म प्लॅन घेऊन प्रीमियम पोटी वाचणारी रक्कम स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड गेलाबाजार एफडीमध्ये टाकून त्यावर ३०-३५ वर्षांत अधिक चांगला परतावा मिळू शकतो.
२. पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला मिळणारी रक्कम आत्ता जरी मोठी वाटत असली तरी ३०-३५ वर्षांनी ती रक्कम तुलनेने तशी छोटीच असणार असते.
३०-३५ वर्षानंतर भारतातील इंश्युरन्स सेक्टरची धोरणे कशी असतील याबाबत कोणीच सध्या काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे टर्म प्लॅन घेताना प्रीमियमचा परतावा देणारा प्लॅन वरवर चांगला वाटला तरी प्युअर टर्म प्लॅन घेणे याचमुळे जास्त फायदेशीर ठरू शकते.
Comments are closed.