आयपीएलमध्ये फॅन्टसी लीग खेळून पैसे कमावताय? इन्कम टॅक्स किती लागतो बघा..

आयपीएल सुरु होऊन आता १३ वर्षे झाली. अगदी पहिल्या हंगामापासून या लीगने लोकप्रियतेचे सगळे विक्रम मोडीत काढले. अशातच गेल्या काही वर्षांत भारतात स्मार्टफोन आणि डेटाचा वापर प्रचंड वाढला. याला कारण म्हणजे अतिशय स्वस्तात उपलब्ध असलेला डेटा. याचा थेट परिणाम स्पोर्ट्समधल्या बेटिंग आणि फँटसी गेमिंगवर झाला. आज भारतात क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, हॉकी, बास्केटबॉल या खेळांच्या लीगसाठी फँटसी गेमिंगचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

ड्रीम११, माय टीम ११, गेमईझी यांच्यासारख्या अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्सच्या आकडेवारीनुसार २०१६ साली भारतात या क्षेत्रात १० कंपन्या होत्या. हाच आकडा २०२० मध्ये १५० पर्यंत जाऊन पोहोचला आहे. फक्त गेल्या वर्षभरात या क्षेत्राच्या एकूण महसुलात तिप्पट वाढ होत तो २४०० कोटींपर्यंत गेला आहे. भारतात फँटसी गेम खेळणाऱ्या युजर्सचा आकडा २०१६ मधील २ कोटींवरून २०२० मध्ये तब्बल १० कोटी एवढा झाला आहे.

आता या फँटसी गेमिंगमध्ये मिळवलेल्या पैशावर टॅक्स कसा लागतो?

फँटसी गेमिंग आणि ऑनलाईन बेटिंग या दोन्हींमधून जिंकलेल्या रकमेवर इन्कम टॅक्स च्या सेक्शन ११५ बीबी अंतर्गत टॅक्स लागतो. हे उत्पन्न, ‘इन्कम फ्रॉम ऑदर सोर्सेस’ म्हणून दाखवावे लागते. या सेक्शनमध्ये ऑनलाईन लॉटरी, ऑनलाईन कोडी, हॉर्स रेसिंग, पत्ते, बेटिंग, ऑनलाईन गॅम्बलिंग या सगळ्यांमधून मिळालेले उत्पन्न येते. याशिवाय इन्कम टॅक्सच्या सेक्शन ५८(४) अंतर्गत तुम्हाला या उत्पन्नावर कोणतेही डिडक्शन क्लेम करता येत नाही.

या जिंकलेल्या रकमेवर सेसची रक्कम सोडून तुम्हाला ३०% टॅक्स लागतो. सेसची टक्केवारी धरली तर हाच टॅक्स ३१.२% एवढा लागू होतो. तुम्ही जिंकलेली रक्कम १०००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर जी कंपनी तुम्हाला ही रक्कम देते, ती टीडीएस कापून घेते. तुम्हाला तुमच्या फॉर्म 26AS मध्ये किती रक्कम टीडीएस म्हणून कापून घेतली गेली आहे हे कळू शकते.

त्यामुळे आयपीएल, प्रो कबड्डी लीग सारख्या लीगमध्ये फँटसी गेमिंगमध्ये टीम जरूर लावा. मात्र त्यातून जिंकलेल्या पैशावर इन्कम टॅक्स भरावा लागतो आणि तोही ३१.२% हे जरूर लक्षात असू द्यात.

Comments are closed.