कॉपर इज द न्यू ऑइल

गोल्डमन सॅक्स या जगातील आघाडीच्या वित्तसंस्थेने नुकताच कमोडिटीवर आधारित एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात त्यांनी ‘कॉपर इज द न्यू ऑइल’ असे म्हणत येणाऱ्या काही वर्षांत कॉपरला आणखी चांगले दिवस येऊ शकतात असे संकेत दिले आहेत. या अहवालातील काही महत्वाच्या गोष्टी मांडण्याचा हा प्रयत्न.

गेल्या काही वर्षात अनेक देश नेट झिरो इमिशनकडे पाऊल टाकताना दिसत आहेत. या नेट झिरो इमिशन या संकल्पनेचा बराच मोठा, सकारात्मक परिणाम ग्रीन मेटल्स आणि त्यातही कॉपरवर होणार आहे. नेट झिरो इमिशन म्हणजे अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर येणाऱ्या काळात वाढत जाणार. या ऊर्जा स्रोतांपासून निर्माण केली जाणारी ऊर्जा साठवणे आणि तिचे वहन करणे यासाठी कॉपर हा सर्वाधिक योग्य धातू आहे. केबल्स, बॅटरीज, ट्रान्झिस्टर्स, इन्व्हर्टर्स या सगळ्या गोष्टींमध्ये कॉपरचा वापर केला जातो. कॉपरचे गुणधर्म त्याला यासाठी पहिला पर्याय बनवतात. याला कारण म्हणजे

१. डक्टिलिटी – कॉपरचे शीट्स बनवता येतात आणि ताराही बनवता येतात.

२. कंडक्टिव्हिटी – कॉपरमधून विजेचे वहन सहजरित्या होते.

३. रीऍक्टिव्हिटी – कॉपरची रीऍक्टिव्हिटी अतिशय कमी आहे. त्यामुळे कॉपरवर गंज कमी लागतो स्टेनलेस स्टीलमध्ये असेच गुणधर्म असतात मात्र त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी कॉपरपेक्षा ३० पट कमी असते.

गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार २०३० पर्यंत कॉपरची मागणी ६०० ते ९००% एवढी वाढू शकते. या वाढत्या मागणीला पुरवठा करण्याची कॉपर मार्केटची क्षमता आहे का? तर नाही. गेल्या १२ महिन्यांत कॉपरच्या किमती जवळपास ८०% नी वाढल्या. मात्र कॉपरचा सप्लाय मात्र त्या प्रमाणात वाढलेला नाही. कॉपर मायनिंगसाठी कोणत्याही मोठ्या ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट्सला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे २०३० पर्यंत कॉपरचा पुरवठा ८.२ मिलियन टनांनी कमी पडू शकते असे भाकीत गोल्डमन सॅक्सने वर्तवले आहे. यातूनच कॉपरमध्ये आणखी मोठी बुल रन बघायला मिळू शकते.

कॉपरची सध्याची किंमत ९००० डॉलर पर टन एवढी आहे. गोल्डमन सॅक्सच्या मते ही किंमत खूपच कमी आहे. जरी ही किंमत पुढची २-३ वर्षे कायम राहिली तरी २०२३ पर्यंत कॉपरची सध्याची इन्व्हेंटरी संपून जाईल. मात्र ही किंमत स्थिर राहणे शक्यच नाही. मागणी वाढतेय म्हणजे किंमत वाढतच जाणार. गोल्डमनच्या मते कॉपरची पर टन किंमत २०२१ मध्ये ९६७५, २२ मध्ये ११८७५ , २३ मध्ये १२०००, २४ मध्ये १४००० आणि २०२५ मध्ये १५००० डॉलर एवढी वाढू शकते. येणाऱ्या १२ महिन्यांत ही रक्कम ११००० डॉलर पर्यंत जाऊ शकते.

कॉपरला कोणत्या क्षेत्रातून मागणी वाढू शकते?

१. विंड टर्बाइन्स

२. इलेक्ट्रिक व्हेईकल्स

३. सोलर पॅनेल्स

४. बॅटरीज

५. चार्जिंग स्टेशनसाठी लागणारे केबलिंग

इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या संख्येत येणाऱ्या दशकांत मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. गोल्डमनच्या अहवालानुसार ही संख्या २०३० पर्यंत ३ कोटींपर्यंत वाढू शकते. यासाठी लागणाऱ्या चार्जिंग स्टेशन्सची संख्या तेवढीच वाढू शकते. फक्त इव्ही मार्केटसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉपरची मागणी येणाऱ्या दशकात प्रत्येक वर्षी ३१% वाढू शकते असे गोल्डमनचा अहवाल म्हणतो. विशेष म्हणजे युरोप, चीन आणि अमेरिका हे खंड या मागणीला पूरक अशी इव्ही धोरणे राबविताना दिसत आहेत.

सोलर पॉवर सेक्टरमध्येही कॉपरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि तो वाढत जाणार आहे. गोल्डमनच्या अहवालानुसार सोलर सेक्टरमधील कॉपरची मागणी २०३० पर्यंत १.६ ते ३.३ मिलियन मेट्रिक टन्स एवढी वाढू शकते. विंड एनर्जी सेक्टरमधील हीच मागणी २०३० पर्यंत १.३ ते २.१ मिलियन मेट्रिक टन्स इतकी वाढू शकते.

स्क्रॅप कॉपर सप्लाय हाही एक मुद्दा या अहवालात मांडला आहे. कॉपरच्या वाढत्या मागणीमुळे स्क्रॅप कॉपरला सुद्धा मागणी वाढेल. मात्र हा सेक्टर तुलनेने अजूनही तितकासा विकसित झालेला नाही. त्यामुळे जरी स्क्रॅप कॉपरचा सप्लाय असला तरी नवीन ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट्स सुरु केल्याशिवाय कॉपरची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य होणार नाही. येणाऱ्या काळात कॉपर प्रॉडक्शनमध्ये एखादी नवी टेक्नॉलॉजी येऊन कॉपर प्रॉडक्शनची संपूर्ण पध्दतच जर बदलली तर कदाचित कॉपरचा सप्लाय वाढून त्याचा परिणाम किमतीवर होऊ शकतो. मात्र सध्यातरी अशी टेक्नॉलिजी उपलब्ध नाही. जरी अशी काही टेक्नॉलॉजी आली तरी ती सबंध स्वीकारली जाणे, तिचा वापर केला जाणे यासाठी या दशकाचा उत्तरार्ध उजाडावा लागेल.

कॉपरच्या वाढत्या मागणीचा सकारात्मक परिणाम होऊ शकेल अशा भारतीय कंपन्या

१. हिंदुस्थान कॉपर – १४० रुपये

२. भाग्यनगर इंडिया – ४७ रुपये

३. हिंदाल्को – ३५८ रुपये

टीप – हा फक्त या अहवालाचा गोषवारा आहे. सुचवलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय आपापल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून घ्यावा.

Comments are closed.