फुकटातल्या तिकिटाने मिळवून दिले साडेतीन कोटी!

२६ ऑक्टोबर १९८४

जगप्रसिद्ध आणि कदाचित सार्वकालीन महान म्हणून ज्याचे नाव घेता येऊ शकेल अशा मायकेल जॉर्डनसाठी (Michael Jordan) ही तारीख अतिशय महत्वाची आहे. याची दिवशी मायकेलने एनबीएमध्ये आपला पहिला सामना खेळला होता. हा सामना होता शिकागो बुल्स (Chicago Bulls) विरुद्ध वॉशिंग्टन बुलेट्स. (Washington Bullets)

 

मायकेलच्या पदार्पणाच्या या सामन्याला शिकागोपासून जवळच असलेल्या नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचा एक विद्यार्थी उपस्थित होता. त्याच नाव माईक कोल. माईकच्या वडिलांचा एक मित्र त्यावेळी वॉशिंग्टन बुलेट्ससाठी काम करायचा. माईकने आपली ओळख वापरून त्या सामन्याची दोन तिकिटे मिळवली. पण त्याच्याबरोबर जाण्यासाठी कुणी तयार झाले नाही. मग त्याने एक तिकीट स्वतःसाठी वापरले आणि दुसरे तसेच ठेवून दिले. पुढे माईक ही गोष्ट विसरून गेला. मायकेल जॉर्डन एनबीएचा लेजेंड म्हणून निवृत्त झाला.

 

डिसेंबर २०२१ मध्ये माईक आपल्या घरी टीव्हीवर कॅन्सस सिटी चीफ्स विरुद्ध लॉस अँजेलिस रेंजर्स हा फुटबॉलचा सामना पहात होता. मध्येच त्याला झोप लागून गेली. काही वेळाने जाग आल्यावर त्याने सामन्याचे काय झाले पहायला बातम्या लावल्या. त्याचवेळी टीव्हीवर आणखी एका बातमीने त्याचे लक्ष वेधून घेतले. ती बातमी मायकेल जॉर्डनच्या पदार्पणाच्या सामन्याबाबतच होती. या सामन्याच्या तिकिटाचे तिकीट स्टब (म्हणजे तिकीट फाडून जो भाग आपल्याला परत मिळतो)) तब्बल २ लाख ६४ हजार डॉलर्सला विकले गेल्याची ती बातमी होती.

 

ती बातमी बघून माईकला आपल्या तिकीटाची आठवण झाली. तो पटकन बेसमेंटकडे पळाला. ते तिकीट आपल्याकडे आहे आणि कुठे आहे हे त्याला ठळकपणे आठवत होते. बेसमेंटमधल्या एका प्लॅस्टिकच्या डब्यात त्याने आजवर पाहिलेल्या सगळ्या सामन्यांची तिकिटे आठवण म्हणून ठेवली होती. त्या तिकिटांच्या गठ्ठ्यात त्याला मायकेल जॉर्डनच्या पहिल्या सामन्याचे ‘ते’ तिकीटही सापडले. जर एका तिकीट स्टबला एवढे पैसे मिळत असतील तर पूर्ण तिकिटाला किती पैसे मिळतील या विचाराने माईक हरखून गेला. त्या पैशातून आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघू शकेल असा विचारही त्याच्या डोक्यात आला.

 

ती रात्र माईकला झोप आलीच नाही. आपल्याकडे असलेले तिकीट कसे विकता येईल याचा रिसर्च करायला त्याने लगेचच सुरुवात केली. हा रिसर्च करत असताना त्याला अशा खास सामन्यांच्या तिकिटांना प्रचंड मागणी आहे हे तर लक्षात आले. पुढचे काही दिवस कोलने वेगवेगळ्या ऑक्शन हाऊसेसला संपर्क करण्यात घालवले. तो फक्त आपल्याकडे असलेल्या तिकिटाचा फोटो या लोकांना ईमेलवर पाठवत असे. विशेष म्हणजे ईमेल केल्या केल्या काही मिनिटांतच त्याला पलीकडून फोनही येत
असे.

 

त्यातलाच एक फोन होता हेरिटेज ऑक्शनच्या ख्रिस नेरट यांचा. त्यांनी कोलला सगळ्यात आधी त्याच्याकडे असलेले तिकीट अधिकृत असल्याची खातरजमा करून घ्यायला सांगितले. ते झाल्यावर लगेचच त्यांच्या ऑक्शन हाऊसमार्फत त्याची विक्री करू असेही सांगितले. जसे हे तिकीट ऑक्शनसाठी लिस्ट झाले तसे त्यावर लागणारी बोली वाढतच गेली. अखेरीस फेब्रुवारी २०२२ मध्ये हे तिकीट तब्बल ४ लाख ६८ हजार डॉलर्सला विकले गेले. आपल्या भारतीय रुपयांमध्ये साधारणपणे ३ कोटी ६२ लाख रुपये!

 

हे तिकीट ऑक्शनला देताना माईकला अर्थातच थोडे दुःख झाले. कारण हे तिकीट त्याला वडिलांच्या ओळखीने मिळाले होते. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले. मात्र त्यानंतरही आपले वडील आपल्यासाठी काहीतरी चांगले घडवून आणतायत ह्या विचाराने माईक भावुक झाला होता.

Comments are closed.