एक निर्णय आणि व्हॉल्वोने वाचवले करोडो जीव

चारचाकी चालवताना सीटबेल्ट लावणे सध्या सगळीकडे बंधनकारक आहे. यासाठी सेफ्टीचे कारण दिले जाते. सीटबेल्ट नसेल तर दंडही आकारला जातो. ह्या सीटबेल्टचे डिझाईन जवळपास सगळ्याच गाड्यांमध्ये सारखेच असते. याला कारण काय असू शकेल? कारण हे डिझाईनच सीटबेल्टचे योग्य डिझाईन आहे. या डिझाईनचा शोध नील्स बोहलीन या इंजिनीयरने लावला होता.

नील्स बोहलीनने शोध लावलेल्या सीटबेल्टला ३ पॉईंट बेल्ट डिझाईन असे म्हणतात. त्याचा शोध १९५९ मध्ये लावला होता. याआधी २ पॉईंट बेल्ट डिझाईन वापरले जात असत जो गाडीत बसलेल्या माणसाच्या कमरेवरून जात असे. पण या डिझाईनचे तोटे होते. सीटबेल्ट लावल्यामुळे माणसाची हालचाल मर्यादित होई. शिवाय गाडीचा अपघात झाला, समोरच्या बाजूने किंवा मागच्या बाजूने टक्कर बसली तर गाडीत बसलेला माणूस सहज पुढे ढकलला जाऊन जखमी होण्याची शक्यता असे.

यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा विचार व्हॉल्वोचे तेव्हाचे अध्यक्ष गुन्नार इनग्लो यांनी केला. अपघातात दगावणाऱ्या लोकांचा आकडा काहीतरी करून कमी केला पाहिजे, गाडी चालवणाऱ्या लोकांची सुरक्षितता वाढवली पाहिजे असे त्यांच्या डोक्यात होते. याशिवाय त्यांचा एक नातेवाईकही कर अपघातातात दगावला होता. सीटबेल्टचे नवे डिझाईन हवे यामागे हे एक वैयक्तिक कारणसुद्धा होते.

 

स्टॉकहोमच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पदवीधर असेलेले नील्स बोहलीन तोपर्यंत  विमानांमध्ये असलेल्या इजेक्टर सीटच्या डिझाईनचे काम करत असत. गुन्नार यांनी त्यांना आपल्या कंपनीत नोकरी देऊ केली आणि सीटबेल्टचे नवे डिझाईन बनविण्याच्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करा असे सुचवले.

 

नील्स बोहलीन यांनी यावर काम करून आज सगळ्या गाड्यांमध्ये आपल्याला दिसणाऱ्या थ्री पॉईंट सीटबेल्टचा शोध लावला. या सीटबेल्टचा वापर करणे आधीच्या डिझाईनपेक्षा सोपे होते. याशिवाय या डिझाईनमुळे गाडीत बसणाऱ्या माणसांची सुरक्षिततासुद्धा वाढली. पुढे व्हॉल्वोने रीतसर या थ्री पॉईंट सीटबेल्ट डिझाईनचे पेटंट घेतले. बाजारातील स्पर्धेचा विचार करता व्हॉल्वो खरंतर हे पेटंट स्वतःकडे ठेवून भरपूर पैसा कमावू शकले असते. आपल्या गाड्या सर्वात जास्त सुरक्षित आहे असे मार्केटिंग करू शकले असते. मात्र असे न करता कंपनीने हे पेटंट सर्व कार कंपन्यांसाठी खुले केले.

 

आपण लावलेला शोध किती परिणामकारक आहे हे सिद्ध करण्यासाठी नील्स बोहलीन यांनी १९६७ मध्ये एक पेपर पब्लिश केला.  यासाठी त्यांनी २८००० अपघातांचा अभ्यास केला होता. या अपघातांमध्ये एकूण ३७५११ लोक होते. यातील ज्या ज्या लोकांनी थ्री पॉईंट सीटबेल्टचा वापर केला होता त्यापैकी एकाचाही मृत्यू झाला नव्हता (गाडीचा वेग ६० मैल प्रतितासापेक्षा कमी असताना).

 

पेटंटचा २० वर्षाचा कालावधी १९७८ मध्ये संपल्यावर व्हॉल्वोने प्रत्येक गाडीमागे फक्त १० डॉलर रॉयल्टी आकारायचे ठरवले असते तरी फक्त १९७८ या एका वर्षात कंपनीने ४०० मिलियन डॉलर्स कमावले असते. मात्र व्हॉल्वोच्या एका निरपेक्ष निर्णयामुळे सीटबेल्टचे हे डिझाईन जगभरात वापरले गेले आणि करोडो लोकांचे प्राण वाचले.

Comments are closed.