डिव्हीडंड का चक्कर है बाबूभैय्या!

आपल्याला सगळ्यांनाच डिव्हीडंड देणाऱ्या कंपन्या आवडतात. सातत्याने डिव्हीडंड देणाऱ्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये असाव्यात असे अनेक विश्लेषकसुद्धा सांगत असतात. कंपन्या दोन प्रकारचे डिव्हीडंड आपल्या स्टॉकहोल्डर्सला देतात.

१. इंटरीम डिव्हीडंड – सहसा पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीत दिला जातो.

२. फायनल डिव्हीडंड – शेवटच्या म्हणजे चौथ्या तिमाहीत दिला जातो.

तसं बघायला गेलं तर दोन्ही डिव्हीडंडच आहेत. पण दोन्हींमध्ये फरकही आहे.

इंटरीम डिव्हीडंड हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडून जाहीर केला जातो तर फायनल डिव्हीडंड बोर्ड ऑफ डायरेक्टर्स रेकमेंड करतात म्हणजेच सुचवू शकतात. त्यांनी सुचवलेला डिव्हीडंड जर शेअरहोल्डर्सने अप्रूव्ह केला तर कंपनीच्या ऍन्युअल जनरल मिटिंगमध्ये तो जाहीर केला जातो. ही एजीएम घेण्यासाठी कंपन्यांकडे आर्थिक वर्ष संपल्यावर ६ महिन्यांचा अवधी असतो.

डिव्हीडंड कोणताही असला तरी तो जाहीर केल्यावर ३० दिवसांच्या आत शेअरहोल्डर्सला देणे गरजेचे असते.

आता समजा १३ मे २०२२ रोजी ‘अ’  कंपनीने शेअरहोल्डर्सला १० रुपये इंटरीम डिव्हीडंड जाहीर केला. तुमच्याकडे त्या कंपनीचे १००० शेअर्स आहेत. म्हणजे तुम्हाला १०,००० रुपये मिळणार आहेत हे तर नक्की आहे. कंपनीने २० दिवसांनी हा डिव्हीडंड तुम्हाला मिळेल हे जाहीर केले आहे. हा इंटरीम डिव्हीडंड असल्यामुळे तो ठरलेल्या दिवशी म्हणजे ३ जून २०२२ ला तुम्हाला मिळेल.

याच दिवशी म्हणजे १३ मे २०२२ रोजी ‘ब’ कंपनीने १० रुपये फायनल डिव्हीडंड रेकमेंड केला. तुमच्याकडे या कंपनीचेसुद्धा १००० शेअर्स आहेत. म्हणजे इथेही तुम्हाला १०,००० रुपये मिळणार आहेत

हा डिव्हीडंड बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने रेकमेंड केल्यावर कंपनीची ऍन्युअल जनरल मिटिंग समजा २ महिन्यांनी म्हणजे १३ जुलै २०२२ ला घेतली. त्यात हा डिव्हीडंड अप्रूव्ह झाला. या कंपनीनेसुद्धा डिव्हीडंड २० दिवसांत जमा होईल असे जाहीर केले. म्हणजे तुम्हाला ३ ऑगस्ट २०२२ रोजी डिव्हीडंड मिळेल.

जर कंपनीने त्यांची एजीएम आणखी एक महिना लेट म्हणजे १३ ऑगस्ट २०२२ ला घेतली. तिथून पुढे २० दिवस म्हणजे ३ सप्टेंबर ला तुम्हाला डिव्हीडंड मिळेल.

एजीएम घेण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी आहे या नियमाचा आधार धरून जर कंपनीने ५ महिन्यांनी म्हणजे १३ ऑक्टोबर २०२२ रोजी एजीएम घेतली तर डिव्हीडंड मिळायला ३ नोव्हेंबर २०२२ उजाडेल.
आता तुमच्या लक्षात आले असेल की डिव्हीडंड कोणत्या प्रकारचा आहे यावरून बराच फरक पडतो. अ कंपनीचा डिव्हीडंड तुम्हाला उशिरात उशिरा ३ जून २०२२ ला मिळेल. ब कंपनीचा डिव्हीडंड मिळायला मात्र अगदी नोव्हेंबरपर्यंतही थांबावे लागू शकते. हीच १०,००० रुपये रक्कम या कालावधीत इतर कोणत्या स्टॉकमध्ये किंवा अगदी गेला बाजार एखाद्या ईटीएफमध्ये गुंतवून तुम्ही चांगले रिटर्न्सदेखील कमावू शकता.

Comments are closed.