टीव्हीएसचा छप्परफाड रिझल्ट, शेअरमध्ये थेट १४ टक्क्यांची वाढ
टीव्हीएस मोटर्सचे रिझल्ट काल जाहीर झाले. या निकालात कंपनीच्या नफ्यामध्ये तब्बल १८८% वाढ झाली आहे. साहजिकच २८ एप्रिलला कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी येऊन शेअर जवळपास १४% वाढला.
कंपनीच्या निकालाची आकडेवारी
चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल – ५३२२ कोटी – गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात ५१% वाढ झाली आहे.
कंपनीला या तिमाहीत २८९ कोटींचा नफा झाला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत नफ्यामध्ये तब्बल १८८% वाढ दिसून आली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा १०० कोटी एवढा होता.
कंपनीच्या कॉनकॉलमधील काही ठळक मुद्दे
१. कंपनीला आपल्या प्रॉडक्टससाठी असलेली मागणी वाढत जाणार आहे असे वाटते. सध्याच्या परिस्थितीत जरी या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत फारशी विक्री झाली नाही तरी दुसऱ्या तिमाहीपासून पुन्हा एकदा मागणी वाढेल असा विश्वास कंपनी व्यवस्थापनाला आहे. सध्या कंपनीच्या डीलर्सकडे ४ आठवडे पुरेल एवढी इन्व्हेंटरी आहे. शहरांतील परिस्थिती पूर्ववत झाल्यावर कंपनीच्या स्कुटर सेगमेंटच्या विक्रीत वाढ होईल असाही त्यांचा अंदाज आहे.
२. या तिमाहीत कंपनीच्या निर्यातीत तब्बल ७४% वाढ झाली. निर्यातीतून कंपनीला १७३२ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. कंपनी जवळपास ७० देशांमध्ये आपल्या प्रॉडक्ट्सची निर्यात करते. परदेशात आपले नेटवर्क मजबूत करण्यासाठी कंपनी बराच प्रयत्न करते आहे. याचाच भाग म्हणून कंपनीने इंडोनेशियामध्ये २२ कोटी, सिंगापूरमध्ये २६.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
टीव्हीएस इंडोनेशियाने या तिमाहीत २२३०० दुचाकी विकल्या. हा आकडा गेल्यावर्षी याच तिमाहीत १२९०० एवढा होता. याआधी तोट्यात असलेली ही सब्सिडीअरी आता नफ्यात आहे.
३. कंपनी आपल्या प्रॉडक्ट्सची किमंत कमी करता येईल का? याची चाचपणी करते आहे. यासाठी व्हॅल्यू इंजिनिअरिंग, लोकलायझेशन, मार्केटिंगचा खर्च कमी करून डिजिटल प्लॅटफॉर्मवर जास्त खर्च करणे यासारखे उपक्रम राबवू शकते.
इव्ही मार्केटमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी बंगलोरमधील अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्ह या कंपनीत टीव्हीएसने ३० कोटी रुपये गुंतवले. कंपनीची आयक्युब नावाची इलेक्ट्रिक स्कुटर बंगलोर आणि दिल्ली या शहरांत उपलब्ध आहे. यावर्षात आणखी २० शहरांमध्ये ही स्कुटर उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे.
कंपनीने टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस या दुचाकीसाठी कर्ज देणाऱ्या कंपनीत ५० कोटी रुपये गुंतवले आहेत. गेल्या तिमाहीत FII कडे कंपनीचे ११.२% स्टेक होते. या तिमाहीत त्यांनी आपला स्टेक वाढवून १२.३% वर नेला आहे.
कंपनीचा निकाल अतिशय चांगला असून येणाऱ्या काळात कंपनीची वाटचाल चांगली राहील यात शंका नाही.
Comments are closed.