मारुतीच्या नफ्यात झाली घट, शेअर वर काय परिणाम होणार?
मारुती सुझुकीचा चौथ्या तिमाहीचा निकाल २७ एप्रिल २०२१ ला जाहीर झाला. निकालाची आकडेवारी खालीलप्रमाणे
चौथी तिमाही
महसूल – २४०२४ कोटी – गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल १८१९९ कोटी रुपये एवढा होता ज्यात ३२% ने वाढ झाली आहे.
नफा – ११६६ कोटी - गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा १२९२ कोटी रुपये एवढा होता ज्यात आता ९.७% ने घट झालेली आहे.
कंपनीच्या भारतातील विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत २६. ७% वाढ झालेली आहे तर निर्यातीत ४४% ची वाढ आहे.
कंपनीच्या कॉनकॉलमधील काही महत्वाचे मुद्दे
१. कंपनीला आपल्या गाड्यांच्या मागणीबद्दल सध्या चिंता नाही. याला कारण म्हणजे ग्रामीण भागातून कंपनीच्या गाडयांना मिळत असलेला चांगला प्रतिसाद. मारुती या ब्रॅंडकडे अतिशय विश्वासाने पाहिले जाते. ग्रामीण भागातून कंपनीच्या गाडयांना असलेली मागणी या वर्षात ७% नी वाढली आहे. कंपनीच्या एकूण महसुलात ग्रामीण भागातील विक्रीचा वाटा ३८.५% हून वाढून आता ४१% वर गेला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत वेगाने होत असलेली सुधारणा, करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा एकदा रुळावर येणे, लसीकरण, नवीन प्रॉडक्ट लाँच, मारुतीचे अतिशय मजबूत डिस्ट्रिब्युशन नेटवर्क आणि ग्रामीण भागात असलेली कंपनीची लोकप्रियता हे सगळे मुद्दे कंपनीसाठी येणाऱ्या काळात सकारात्मक ठरू शकतात.
२. कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ – मारुती व्यवस्थापनाला कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीबद्दल चिंता आहे. सेमीकंडक्टरचा तुटवडा ही कंपनीसाठी सगळ्यात मोठी समस्या आहे. यातून ते कसा मार्ग काढतात त्यावर पुढील वाटचाल अवलंबून असेल. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या तरी मारुतीला गाड्यांच्या किंमती लगेच वाढवणे शक्य नाही. त्यामुळे येणाऱ्या ६-१२ महिन्यांत कंपनीच्या मार्जिनवर त्याचा परिणाम दिसूशकेल.
३. कंपनीने चौथ्या तिमाहीच्या सुरुवातीला आपल्या प्रॉडक्ट्सच्या किंमतीत ०.७५% वाढ केली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात त्यांनी पुन्हा १.२५% वाढ केली होती. याला कारण म्हणजे कच्च्या मालाच्या किंमतीत म्हणजे स्टील आणि इतर मेटल्सच्या किंमतीत होणारी वाढ.
येणाऱ्या काळातील वाटचाल –
कंपनीच्या पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमधील गाडयांना अजूनही चांगली मागणी आहे.या मागणीत सातत्याने वाढही होताना दिसते. SUV सेगमेंटमध्ये मात्र ब्रेझा सोडली इतर गाडयांना ग्राहकांचा तितकासा चांगला प्रतिसाद नाही. या सेगमेंटमधील मारुतीचा मार्केट शेअर कमी होऊ शकतो. कंपनीच्या प्रॉडक्ट्सच्या मागणीत चांगली वाढ होत असली तरी हा शेअर सध्या विकत घ्यावा की थोडा थांबून घ्यावा हा निर्णय विचार करून आणि आपल्या आर्थिक सल्लागाराशी बोलून घ्या.
Comments are closed.