रिलायन्सला तोडीस तोड ठरतेय एअरटेल, शेअरवर काय परिणाम होणार?

भारतात टेलिकॉम क्षेत्रात सध्या एअरटेल आणि जिओ या दोनच कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. वोडाफोन आणि आयडियाच्या विलीनीकरणानंतर त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे आणि त्याचा सर्वात जास्त फायदा एअरटेलला झाला आहे.

एअरटेलकडे ३४.४ कोटी ग्राहक आहेत तर जिओकडे ४१ कोटी. यांच्या तुलनेत वोडाफोन आयडियाकडे २८.६ कोटी ग्राहक आहेत. मात्र मागील सलग ६ महिन्यांत एअरटेलने जिओपेक्षा जास्त नवीन ग्राहक जोडले आहेत. जिओच्या ग्राहकांची एकूण संख्या जरी जास्त असली तरीसुद्धा एअरटेल नव्याने जोडत असलेले ग्राहक मात्र जिओच्या तुलनेत अधिक आहेत. एअरटेलने ऑगस्ट २०२० ते जानेवारी २०२१ या काळात तब्बल २.५ कोटी नवीन ग्राहक जोडले. जिओने याच काळात केवळ १ कोटी नवीन ग्राहक जोडले. एअरटेलच्या ग्राहकांची संख्या जरी जिओच्या तुलनेत कमी असली तरी त्यांचे सक्रिय वापरकर्ते म्हणजेच ऍक्टिव्ह युजर्स जास्त आहेत. ऍक्टिव्ह युजर्सच्या बाबतीत मागील महिन्याच्या तुलनेत एअरटेलने आपले ग्राहक वाढवले आहेत, तर जिओ आणि वोडाफोन आयडिया या दोघांमध्ये किरकोळ घसरण दिसून आली आहे.

टक्केवारीच्या बघायची झाली तर एअरटेलच्या ऍक्टिव्ह युजर्सची संख्या जास्त आहे. एअरटेलच्या एकूण ग्राहकांपैकी ९७% ग्राहक ऍक्टिव्ह आहेत. जिओची हीच संख्या खाली घसरत ७९% वर आली आहे तर वोडाफोन आयडियाची जवळपास ९०% आहे.

भारती एअरटेलने मागील महिन्यात १८,६९९ कोटी किंमतीचे ३५५.४५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम मिळविले तर जिओने ५७,१२२ कोटी किंमतीची ४,४८८ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम मिळविले. एअरटेलने जानेवारीमध्ये ५जी चे प्रात्यक्षिक केले होते. ५जी सुविधेचे प्रात्यक्षिक देणारी एअरटेल ही भारतातली पहिली कंपनी ठरली आहे. ५-जी वायरलेस सेवेसाठी त्यांचे नेटवर्क तयार असल्याचे म्हटले आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती - 

कंपनीच्या प्रमोटर्सकडे कंपनीचे ५५.८६% शेअर्स आहेत तर एफआयआय कडे १८.५६% तर डीआयआय कडे २०.३५% शेअर्स आहेत.

प्रमोटर्सने आपला स्टेक हा मागील एक वर्षात ३% कमी केला असला तरी तो त्यांनी कंपनीच्या डेट कमी करण्यासाठी केल्याने त्याचा कंपनीला फायदाच होणार आहे. तसेच प्रमोटर्सने त्यांच्या शेअर्सवर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नसल्याने ही कंपनीसाठी जमेची बाजू आहे.

मूडीझच्या रिपोर्ट नुसार भारती एअरटेल लिमिटेडचे मार्जिन २०२१ मध्ये सुमारे ४५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे जे सप्टेंबर २०२० ते १२ महिन्यांच्या कालावधीत ४० टक्क्यांवरून वाढले आहे.

२०२० च्या काही तिमाहींमध्ये कमाईची घसरण सुरू असताना एअरटेलने ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत ८५३.६ कोटी रुपयांचा नफा नोंदविला. वर्षभरापूर्वी याच काळात कंपनीला १,०३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तर सप्टेंबरच्या तिमाहीत तोटा ७७३ कोटी रुपये झाला.

जिओने दर वाढवण्यास नकार दिल्याने एअरटेलने सुद्धा यावर्षी आपले दर वाढवले नाहीत. जर येत्या काळात दर वाढ झाली तर त्याचा फायदा कंपनीला नक्कीच होईल. गेले काही दिवस हा शेअर ५३० ते ५४० दरम्यान रेंगाळतो आहे. येणाऱ्या काळात कंपनीची कामगिरी चांगली राहिली तर त्याचा सकारात्मक परिणाम शेअरच्या किमतीवर दिसू शकतो.

Comments are closed.