रिलायन्स न्यू एनर्जी सोलरचा मोठा निर्णय – अमेरिकन कंपनीत लावणार ५० मिलियन डॉलर्स

Reliance's latest move is an indication that company is betting big on renewable sector

रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर (RNSEL) ने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत एनर्जी स्टोरेज क्षेत्रात काम करणारी कंपनी अँब्रीमध्ये रिलायन्स तब्बल ५० मिलियन डॉलर्स गुंतवणार आहे. RNSEL सोबत पॉलसन अँड कंपनी, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स हेही या कंपनीत गुंतवणूक करणार आहेत. या तिघांची मिळून एकूण गुंतवणूक १४४ मिलियन डॉलर्स एवढी असेल.

या गुंतवणुकीच्या मोबदल्यात रिलायन्सला अँब्रीमध्ये ४२.३ मिलियन स्टॉक्स मिळणार आहेत अशा माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. रिलायन्सच्या गुंतवणुकीमुळे कंपनीला आपला एनर्जी स्टोरेज बिझनेस जगभरात वाढवण्यासाठी मदत होईल. या गुंतवणुकीसोबतच अँब्रीसोबत भारतामध्ये बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरु करण्याबाबत चर्चा सुरु असल्याचेही रिलायन्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जूनमध्ये शेअरहोल्डर्सशी बोलताना असे म्हटले होते की, धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स प्रोजेक्टचा भाग म्हणून, जामनगरमध्ये गीगा फॅक्टरी बांधण्याची योजना आपण आखत आहोत.

“आम्ही नवीन आणि प्रगत इलेक्ट्रो-केमिकल तंत्रज्ञानाचा शोध घेत आहोत ज्याचा वापर मोठ्या प्रमाणावर ग्रिड बॅटरीसाठी केला जाऊ शकतो. जनरेशन, स्टोरेज आणि ग्रिड कनेक्टिव्हिटीच्या आधारे चोवीस तास वीज उपलब्धतेसाठी सर्वोच्च विश्वासार्हता प्राप्त करण्यासाठी आम्ही बॅटरी तंत्रज्ञानातील जगभरातील आघाडीच्या कंपन्यांकडून सहकार्य मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” असे अंबानी यांनी त्यावेळी जाहीर केले होते.

रिलायन्सने आता या कंपनीद्वारे रिन्यूएबल क्षेत्रात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. याआधी रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करत भारतातील टेलिकॉम क्षेत्राचा कायापालट करून टाकला होता. हा कायापालट अतिशय कमी कालावधीत घडवून आणण्यात रिलायन्स यशस्वी झाली होती. त्यामुळे आता रिन्यूएबल क्षेत्रात प्रवेश करताना येणाऱ्या काळात रिलायन्स कोणते डावपेच अवलंबते यावर तज्ज्ञांचे लक्ष असेल.

रिलायन्स इंडस्ट्रीज च्या शेअर ला या बातमी नंतर किती फरक पडतो ते पाहण्यासारखे ठरेल. खूप दिवसापासून कंसोलिडेशन मध्ये असलेला हा शेअर कधी वर जाणार हा प्रत्येकाला पडलेला आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स पडत असताना ब्ल्यू चीप शेअर्स मात्र मार्केट ला धरून आहेत आणि निफ्टी ला पुढे सुद्धा ओढत आहेत. याचा पण फायदा रिलायन्स ला होईल का मार्केट मध्ये तग धरून असलेले ब्ल्यू चीप स्टॉक पण पडतील हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच.

Comments are closed.