भारतातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने काल बायबॅकची ऑफर जाहीर केली. या बायबॅकसाठी इन्फोसिस ९२०० कोटी रुपये खर्च करणार आहे. इन्फोसिससाठी ही गेल्या ५ वर्षांमधील तिसरी बायबॅक ऑफर आहे.
बायबॅक म्हणजे नक्की काय? हे सोप्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न या थ्रेडमधून करतो आहे. यामध्ये बरेच तांत्रिक मुद्दे ज्यांचा रिटेल इन्व्हेस्टर्सवर तितकासा परिणाम होत नाही त्यांचा उल्लेख नाही. कंपनी आपलेच शेअर खुल्या बाजारातून पुन्हा विकत घेते एवढी साधी बायबॅकची व्याख्या आहे. पण हे असे शेअर पुन्हा विकत घेण्याचे कारण काय असू शकेल?
१. कंपनीकडे जर बऱ्यापैकी कॅश रिझर्व्ह असेल तर बायबॅकच्या माध्यमातून कंपनी ती कॅश लिक्विडेट करते. ही कॅश रिझर्व्ह बँकेत पडून राहण्यापेक्षा आपलेच शेअर कंपनी विकत घेते.
२. अनेक कंपन्या बायबॅकच्या माध्यमातून आपली मालकी वाढवतात. याद्वारे इतर कुणी मोठ्या संख्येने शेअर्स विकत घेऊन कंपनीत वाटा वाढवू नये असाही हेतू असतो.
३. एखादी कंपनी बायबॅक जाहीर करून आपण सध्या चांगल्या स्थितीत आहोत असा संदेश इन्व्हेस्टर्सना देऊन अधिकाधिक इन्व्हेस्टर्सना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यास आकर्षित करून घेते. यातून आपल्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढेल असा त्यांना विश्वास असतो.
बायबॅक की डिव्हीडंड? कंपनीला काय फायद्याचे?
कंपनीने डिव्हीडंड द्यायचा असे ठरवले तर तो सगळ्या इन्व्हेस्टर्सना द्यावा लागतो. बायबॅकचे मात्र असे नाही. जो इन्व्हेस्टर बायबॅकमध्ये सहभागी होईल त्यालाच हा बायबॅक रूपातील डिव्हीडंड द्यावा लागतो. कंपनीने डिव्हीडंड द्यायचा असे ठरवले तर त्यांना डिव्हीडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स म्हणजेच DDT भरावा लागतो.
इन्व्हेस्टर्सवर काय परिणाम?
ज्या इन्व्हेस्टर्सच्या डिव्हीडंडची रक्कम १० लाखांहून अधिक असते त्यांनाही त्यावर टॅक्स भरावा लागतो. बायबॅकमध्ये सहभागी होणाऱ्या इन्व्हेस्टर्सने शेअर एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी होल्ड केला असेल तर त्याला १५% टॅक्स लागतो. हेच शेअर जर एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ होल्ड केलेले असतील तर त्याला १०% टॅक्स लागतो.
इन्व्हेस्टर्सला बायबॅकचा काय फायदा?
कंपनीने बायबॅक केला म्हणजे आऊटस्टँडिंग शेअर्सची संख्या कमी झाली. जरी इन्व्हेस्टर्सने बायबॅकमध्ये शेअर्स विकले नाही तरी कंपनीच्या मालकीमध्ये इन्व्हेस्टरच्या शेअर्सच्या मालकीची टक्केवारी देखील वाढली. याचाच अर्थ अर्निंग पर शेअर म्हणजेच EPS ची व्हॅल्यू वाढणार.
जर बायबॅकमध्ये शेअर विकले याचा अर्थ ती किंमत इन्व्हेस्टर्सना मान्य आहे. त्यांनी नफाच कमावला.
बायबॅकमध्ये सहभागी व्हावे अथवा नाही?
तुमच्याकडे असलेले शेअर्स कंपनी नक्की किती किमतीला विकत घेणार आहे हे तुम्हाला माहित असले पाहिजे. त्यावरून तुम्ही फायद्यात आहात की तोट्यात याची कल्पना येईल.
कधीकधी असेही होते की तुम्ही १०० रुपयांना घेतलेला शेअर कंपनीने बायबॅक आणला म्हणून तुम्ही ११५ रुपयांना विकून टाकता. यातून १५% नफा कमावला म्हणून तुम्ही खुश असता. मात्र नंतर हाच शेअर १३०, १५०, २०० रुपयांपर्यंत ही जाऊन पोहोचतो. तेव्हा तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. त्यामुळे बायबॅकमध्ये सहभागी होताना कंपनीची गेल्या काही वर्षातील कामगिरी, भविष्यातील प्रोजेक्ट्स, कंपनीचा नफा, कंपनीची लीड करणारी माणसे, त्यांचं कंपनीसाठीचं व्हिजन या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मगच निर्णय घ्या
Comments are closed.