अमेरिकेतील कंपन्यांचे स्टॉक्स आता भारतातील डिमॅट वापरून घ्या

हो हे खरंय..आता तुमच्या डिमॅटम अकाऊंटचा वापर करून तुम्ही अमेरिकेतील कंपन्यांचे स्टॉक्स विकत घेऊ शकता. NSE IFSC या सुविधेमुळे हे शक्य झाले आहे.

यासाठी ज्या ब्रोकरकडे तुमचे डिमॅट अकाऊंट आहे त्याने NSE IFSC ची नोंदणी केली असणे बंधनकारक आहे. हे असेल तर तुम्ही जसे भारतीय कंपन्यांचे स्टॉक्स खरेदी विक्री करता तसेच अमेरिकन कंपन्यांच्या बाबतीतसुद्धा करू शकता.

एचडीएफसी सिक्युरिटीज, एमके ग्लोबल, आनंद राठी, मोतीलाल ओसवाल, एसएमसी ग्लोबल या ब्रोकर्सने सध्या NSE IFSC सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय आणखी ३१ ब्रोकर्सकडे ही सुविधा उपलब्ध आहे.

आता हे NSE IFSC म्हणजे काय?
ही NSE ची फुल्ली ओन्ड सबसिडीअरी आहे. त्यांनी गुजरातमधील गांधीनगर येथील गिफ्ट सिटी एसईझेडमध्ये आपले एक्स्चेंज सुरु केले आहे. हा एसईझेड मुळात परदेशी गुंतवणूकदारांना आपल्या देशात गुंतवणूक करायला आकर्षित करण्यासाठी स्थापन केला गेला. या एक्स्चेंजमध्ये होणारे सगळे व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतात.

यामध्ये सुरुवातीला अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्या म्हणजेच मेटा (फेसबुक), अल्फाबेट (गुगल), टेस्ला, अमेझॉन यांचे स्टॉक खरेदी करता येतील अथवा विकता येतील. ट्रेडिंग करायचे असेल तर रात्री ८ ते पहाटे २:३० दरम्यान तुम्ही ते करू शकता.

या अमेरिकन स्टॉक्सचे मूल्य अर्थातच डॉलरमध्ये असते. त्यामुळे ते बऱ्याचजणांना महाग वाटू शकतात. मात्र एक चांगली गोष्ट अशी आहे की या स्टॉक्समध्ये तुम्ही १,२ असे पूर्ण स्टॉक घेण्याची गरज नाही. तुम्ही १/२००, १/५० अशा पद्धतीने शेअर विकत घेऊ शकता. याला इंग्रजीत Fractional Trading  असे म्हटले जाते. शिवाय तुम्हाला डिव्हिडंड, बोनसदेखील मिळेल. मात्र सध्या भारतीय गुंतवणूकदारांना वोटिंग राईट्स नसतील. किंवा अगदी १० डॉलर, २० डॉलर अशा पटीत तुम्ही हे शेअर्स विकत घेऊ शकता.

ही प्रक्रिया पार कशी पडेल?
थोडक्यात सांगायचं तर NSE हे स्टॉक्स अमेरिकेतील एक्स्चेंजकडून विकत घेणार आणि त्याच्या NSE IFSC डिपॉझिटरी रिसीट गुंतवणूकदारांना इश्यू करणार. म्हणजे तसं पहायला गेलं तर हे अमेरिकन स्टॉक्स NSE वर लिस्ट होणार नाहीयेत. गुंतवणूकदारांना फक्त NSE IFSC रिसीट मिळणार आहेत. मात्र या रिसीट आपल्या डिमॅट अकाऊंटमध्ये होल्ड केल्या जातील.

 

NSE IFSC डिपॉझिटरी रिसीट म्हणजे काय?
तुमचे प्रतिनिधी म्हणून अमेरिकन स्टॉक तुमच्यासाठी विकत घेतले जाणार. त्या बदल्यात तुम्हाला या डिपॉझिटरी रिसीट इश्यू केल्या जाणार. हे जणूकाही तुम्ही स्टॉकच विकत घेतले आहेत असेच असेल. शेअर्सची खरेदी विक्री करता त्याप्रमाणेच तुम्ही या डिपॉझिटरी रिसीटदेखील  खरेदी विक्री करू शकता.
याआधी बरेच जण अमेरिकेतील स्टॉक्स मध्ये म्युच्युएल फंडामार्फत किंवा ग्रो, इंडमनी अशा ऍपमार्फत गुंतवणूक करत होते. मात्र आता हे स्टॉक्स तुमच्या डिमॅटला असणार आहेत हा सगळयात मोठा फरक असेल. याशिवाय इंटरनॅशनल रेमीटन्सचे चार्जेस कमीजास्त असतात, आपले पैसे नक्की कुठे जातायत, त्याचा उपयोग आपलेच शेअर्स विकत घेण्यासाठी होतोय का? असे काही विश्वासार्हतेबद्दलचेसुद्धा प्रश्न असतात.

यातही एक मेख आहे. सध्या हे प्रॉडक्ट टेस्टिंग फेजमध्ये आहे. म्हणजे या सुविधेचा वापर करण्याऱ्या ग्राहकांची संख्या मर्यादित ठेवली जाणार आहे. एकदा का IFSCA म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स अथॉरिटीने याला परवानगी दिली की आणखी जास्त संख्येने लोक यामध्ये सहभागी होऊ शकतील.

यासाठी कोणते ब्रोकर किती ब्रोकरेज लावणार याची पुरेशी माहिती अजून उपलब्ध नाही. मात्र NSE IFSC ग्राहकांना दर १०० डॉलरमध्ये १२ सेंट्स किंवा ०. १२% एवढे चार्जेस लावणार आहे. भारतातील कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री करताना हे चार्जेस ०. ००३४५% एवढे आहेत.

याशिवाय या शेअर्सचा सेटलमेंट कालावधी T+3 असा असणारं आहे. म्हणजेच स्टॉक खरेदी केल्यावर तुमच्या डिमॅटला येण्यासाठी ३ दिवसांचा अवधी लागणार आहे. हेच स्टॉक जर तुम्ही विकले तर त्याच्या सेटलमेंटला सुद्धा ३ दिवसांचा कालावधी लागेल. स्टॉक विकून तुमच्या अकाऊंटला आलेले पैसे तुम्ही नवे स्टॉक खरेदी करण्यासाठी ३ दिवसानंतर उपलब्ध होतील. इंट्राडे लिव्हरेज ट्रेडिंग, नेकेड शॉर्ट ट्रेडिंग ह्याला परवानगी नसेल.
ही सुविधा झिरोधा, अपस्टॉक्स सारख्या ब्रोकर्ससाठी कधी सुरू होणार याबाबत अजून पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

 

आता महत्वाचा प्रश्न. हे करावे का?
याआधी काहीजण म्युच्यूअल फंड, इंडमनी, ग्रो सारख्या माध्यमातून अमेरिकेतील कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करत होते. आता आणखी एक पण थोडा सोपा मार्ग त्यासाठी उपलब्ध झालेला आहे. गुंतवणूक कायम डायव्हर्सिफाइड असे म्हणतात. त्यासाठी हा मार्ग जोखून बघायला हरकत नाही. मात्र तुम्हाला नियम, अटी, चार्जेस याची माहिती मात्र स्वतः घ्यावी लागेल. त्याबाबत पुरेसा आत्मविश्वास आल्यानंतरच गुंतवणूकीचा निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही.

Comments are closed.