९० रुपये पगाराची नोकरी ते ३००० कोटींचे साम्राज्य – बालाजी वेफर्सचा प्रेरणादायी प्रवास

सत्तरच्या दशकात गुजरातमधील एक शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी झगडत होता. स्वतःच्या शेतीतून कुटूंब चालवणे त्याला अवघड होऊन बसले होते. अशा परिस्थितीत त्याने आपली शेतजमीन विकून टाकली. तेही फक्त २०,००० रुपयांना. अर्थात १९७२ साली ही रक्कमही मोठीच होती. हा शेतकरी होता रामजीभाई विरानी आणि त्यांची मुले होती मेघजीभाई, भिकुभाई आणि चंदुभाई.

 

जमीन विकून आलेले पैसे रामजीभाईंनी आपल्या तीन मुलांना दिले. मुलांनी या पैशातून शेतीसाठी लागणारी अवजारे आणि खते विकण्याचा व्यवसाय सुरु केला. यामध्ये त्यांनी २०,००० रुपये संपवून टाकले. आता करायचं काय?

 

मग तीन भावांमधल्या सगळ्यात लहान चंदूभाईने एका थेटरमधल्या कॅंटीनमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. पगार होता ९० रुपये महिना. काही वर्षांनी या कॅंटीनचे काँट्रॅक्ट संपले. नवीन काँट्रॅक्ट चंदुभाई आणि त्यांच्या दोन भावांनी १००० रुपये महिना दराने मिळवले.

 

कँटीन सुरु झाले. सगळे सुरळीत चालू आहे असे वाटत असतानाच त्यांना वेफर्स सप्लाय करणाऱ्या कंपनीकडून ऑर्डर मिळायला उशीर व्हायला लागला. स्टॉकच नाही तर गिऱ्हाईकांना विकणार काय? त्यामुळे धंदा बुडू लागला. चंदुभाईंनी तीनवेळा सप्लायर बदलून पाहिला पण काही साध्य झाले नाही. त्यावर उपाय काढायचा म्हणून चंदुभाई म्हणाले, “आपण आता घरीच वेफर्स बनवू. मार्जिनसुद्धा चांगला मिळेल.”

 

फक्त विचार करून चंदुभाई थांबले नाहीत तर १९८२ मध्ये य व्यवसायाला सुरुवातसुद्धा केली. अगदी बटाटे चिरण्यापासून ते वेफर्स तळण्यापर्यंत सगळी कामे त्यांनी स्वतः शिकून घेतली. इन्व्हेस्टमेंट होती १०,००० रुपये. चंदुभाईंचे हे घरगुती वेफर्स थेटरमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले. त्यातून उभारी घेऊन त्यांनी आसपासच्या काही इतर कँटीनला सुद्धा वेफर्स पुरवायला सुरुवात केली.

 

खप जसा वाढू लागला तसे चंदुभाईंनी आपल्या ब्रँडचे नाव ठेवले, ‘बालाजी वेफर्स’. इतर काही रिटेलर्स त्यांनी आपले वेफर्स विकण्यासाठी विचारले. त्यांनी वेफर्स तर विकले पण पैसे देण्यासाठी कानकुस करू लागले. काहीजण वेफर्स शिळे आहेत अशी तक्रार उगीच करू लागले. पण चंदुभाईंच्या वेफर्सची चव हा त्यांचा USP होता. तिघे भाऊ सायकलवर फिरून वेफर्स विकत असत. यातून महिन्याला साधारण २०-३० हजार नफा होऊ लागला.

 

बिझनेस वाढतोय म्हटल्यावर चंदुभाईंचा उत्साह वाढला आणि १९८९ मध्ये त्यांनी आपले सेव्हिंग्ज, बँकेचे ५० लाखाचे लोन वापरून वेफर्सचा प्लॅंट सुरु केला. सुरुवातीला अर्थातच त्यांचा फोकस गुजरातपुरता मर्यादित होता. नंतर त्यांनी आणखी तीन प्लॅंट सुरु केले. या प्रॉडक्शन एक्स्पान्शनमधून महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये आपला बिझनेस वाढवायचा त्यांचा प्लॅन होता.

 

प्रॉडक्ट चांगले असले की बिझनेस आपोआप येतोच म्हणतात तसेच बालाजी वेफर्सच्या बाबतीत झाले. बिझनेस वाढतच गेला. किती?  तर २००५ मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू ५० कोटी होता तो २०१० मध्ये थेट ३९३ कोटींवर जाऊन पोहोचला. त्यावेळी गुजरातमध्ये कंपनीचा मार्केट शेअर ६०% हून जास्त होता.

 

मार्केटमध्ये एखादा नवीन प्लेयर येऊन प्रस्थापितांना टक्कर देतो तेव्हा अर्थातच हे प्रस्थापित त्याला विकत घेण्याचा प्रयत्न करतात. पेप्सिकोने तेच केले. त्यांनी २०१३ मध्ये बालाजी वेफर्सला ४००० कोटींची ऑफर दिली. पण चंदूभाईंनी ही ऑफर नाकारली आणि आपली कंपनी तशीच सुरु ठेवली. आजघडीला कंपनीचा रेव्हेन्यू ३००० कोटींपेक्षा जास्त आहे. सध्या कंपनी भारतातील १२-१३ राज्यांमध्ये आपले प्रॉडक्ट्स विकते. गुजरात, मध्य प्रदेशमध्ये त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लॅंट्स आहेत. लवकरच उत्तर प्रदेश, दिल्ली, त्यानंतर दक्षिण आणि पूर्व भारतात एक्स्पान्शन करण्याचा कंपनीचा इरादा आहे.   मात्र पश्चिम भारत आजही कंपनीचा बालेकिल्ला आहे.

Comments are closed.