सासऱ्यांचाआग्रह म्हणून साडू एकत्र आले आणि बनली एक जगविख्यात कंपनी

आजचा लेख आहे जगातली नामांकित कंझ्युमर गुड्स कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बलबद्दल. प्रॉक्टर आणि गॅम्बल (Proctor & Gamble) अशी आडनावे असलेल्या दोन माणसांनी ही कंपनी सुरु केली हे अनेकांना माहीतही असेल. पण ही दोन माणसे एकमेकांची साडू होती आणि सासऱ्याच्या आग्रहाखातर त्यांनी एकत्रितपणे व्यवसाय सुरु केला हे बऱ्याचजणांना माहित नसेल. चला जाणून घेऊ.

 

प्रॉक्टर अँड गॅम्बल मधला विल्यम प्रॉक्टर हा जन्माने ब्रिटिश माणूस. त्याचा जन्म १८०१ मध्ये इंग्लंडमध्ये झाला. लहान असताना तो मेणबत्त्या बनवण्याच्या दुकानात काम करीत असे. पुढे मोठा होऊन त्याने आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला. पण नशिबाचे फासे त्याच्या बाजूने पडले नाहीत. त्याने सुरु केलेल्या दुकानाच्या उदघाटनाच्या दुसऱ्याच दिवशी दुकानावर दरोडा पडला. दरोडेखोरांनी सगळे सामान चोरून नेले. विल्यम प्रॉक्टरवर व्यवसाय सुरु केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ८००० डॉलर्सच्या कर्जाचा बोजा बसला.

 

यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे हे त्याने ठरवले. पण आपले नशीब आजमावून पाहण्यासाठी त्याने देश सोडायचे ठरवले. तो आणि त्याची बायको अमेरिकेला जायला निघाले. या प्रवासात त्याच्या बायकोला आजाराने ग्रासले. प्रॉक्टर दांपत्य ओहायो राज्यातील सिनसिनाटी शहरात येऊन पोहोचले. मात्र त्यानंतर काही महिन्यातच सौ. प्रॉक्टर यांचा मृत्यू झाला.

 

यानंतर विल्यम प्रॉक्टर यांनी चरितार्थासाठी एका बँकेत काम करायला सुरुवात केली. कर्जाचा बोजा लवकर कमी करावा म्हणून बँकेतल्या नोकरीबरोबरच त्यांनी आपले जुने कौशल्य वापरण्याचे ठरवले. त्यांनी पुन्हा मेणबत्त्या बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. मेणबत्त्या बनवणे, त्यांची विक्री करणे आणि ग्राहकांना त्या पोहोचविणे ही सगळी कामे विल्यम प्रॉक्टर हे स्वतःच करत असत.

 

सिनसिनाटी शहरातच अलेक्झांडर नॉरीस नावाचा मनुष्य रहात होता. त्याचाही मेणबत्त्या बनविण्याचा व्यवसाय होता. विल्यम प्रॉक्टर नॉरीस यांच्या मुलीच्या ऑलिव्हीयाच्या प्रेमात पडले आणि त्यांनी तिला लग्नासाठी विचारलेसुद्धा. यथावकाश हा विवाह पार पडला.

 

दुसरीकडे १८०३ मध्ये आयर्लंडमध्ये जेम्स गॅम्बल यांचा जन्म झाला होता. त्यांच्या कुटुंबाने १८१९ मध्ये आयर्लंड सोडून अमेरिकेत स्थलांतर केले. गॅम्बल कुटूंबाला खरेतर शिकागोला जायचे होते. पण वाटेत जेम्स आजारी पडल्याने त्यांनी सिनसिनाटीला जाण्याचे ठरवले. जेम्स बरा होण्यासाठी काही काळ गेला. त्या दरम्यान त्याच्या घरच्यांनी सिनसिनाटीमध्येच स्थायिक होण्याचे ठरवले होते.

 

वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर जेम्सने साबण बनविण्याच्या एका कारखान्यात कामाला सुरुवात केली. काही वर्षे तिथे काम केल्यावर त्याने स्वतःचा साबण आणि मेणबत्त्या बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. हे करत असताना मधल्या काळात त्याची गाठ अलेक्झांडर नॉरीस यांची दुसरी मुलगी ऍन हिच्याबरोबर झाली होती. त्या दोघांनी लग्नही केले.

 

या दोन्ही मुलींचे वडील म्हणजेच पप्रॉक्टर आणि गॅम्बल यांचा सासरा नॉरीस हा हुशार माणूस होता. आपले दोन्ही जावई एकाच व्यवसायात राहून एकमेकांशी स्पर्धा करतायत हे त्यांना लक्षात आले. त्यांनी आपल्या दोन्ही जावयांना आपले व्यवसाय एकत्र करण्याचा सल्ला दिला. पण जावयांनी त्यांचे ऐकायला बराच काळ घेतला. अखेरीस १८३७ मध्ये प्रॉक्टर आणि गॅम्बल यांनी एकत्र येऊन आजच्या ‘प्रॉक्टर अँड गॅम्बल’ची स्थापना केली. सुरुवात अर्थातच साबण आणि मेणबत्त्या बनविण्यापासून झाली. बाकी पुढे जाऊन ही कंपनी जगविख्यात कशी बनली आणि आजही जगातील आघाडीची कन्झ्युमर गुड्स कंपनी कशी आहे हे सर्वज्ञात आहे.

Comments are closed.