क्रेडिट कार्डाचे बिल थकले? कर्जातून मुक्त होण्यासाठी हे करा

The best way to reduce credit card debt.

क्रेडिट कार्डाचे बिल वेळेवर न भरल्यामुळे उर्वरित बिलाच्या रकमेवर व्याज लागण्यास सुरुवात होते. हे व्याज अतिशय चढ्या दराने आकारले जाते. दर महिन्याला ३% ते ३.५% म्हणजेच वर्षाला ३६% हून अधिक हा व्याजदर असतो. अशी परिस्थिती असताना बिलाची किंवा कर्जाची रक्कम वेगाने फुगत जाते. हे कर्ज पूर्ण भरल्याशिवाय तर सुटका नसते. मग त्यासाठी काय करावे?

यासाठी तुमच्याकडे पक्का अँक्शन प्लॅन असणं आवश्यक आहे. कर्जदारांशी संपर्क साधून व्याजदरात काही सूट मिळते का हे पाहणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. आणखी काय करून हे कर्ज कमी करता येईल?

क्रेडिट रेटिंग रिपोर्ट –
पहिल्यांदा तुमचा क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट स्कोअर तपासून घ्या. हे विनामूल्य करणे शक्य आहे. हा क्रेडिट रिपोर्ट आणि स्कोअर बरोबर आहे का हे तपासून पहा. कोणते अकाऊंट्स तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर आणि स्कोअरवर जास्त परिणाम करत आहेत हे जाणून घ्या.

क्रेडिट कार्ड कंपनीबरोबर घासाघीस करा –
तुम्ही डिफॉल्टर होण्यापासून वाचण्यासाठी काय काय पावले उचलली आहेत हे क्रेडिट कार्ड कंपनीला सांगा. त्यावरून त्यांच्याबरोबर कर्जाची रक्कम कमी करणे, व्याजदर कमी करणे अशा गोष्टींसाठी घासाघीस करा. जर त्यांना असे वाटले की तुम्ही कर्ज चुकविण्यासाठी योग्य पावले उचलत आहात तर ते व्याजदरात सवलत देतील.

डेट कन्सॉलिडेशन –
इतर जुनी कर्जे एकाच नवीन कर्जामध्ये एकत्र करा ज्याचा व्याजदर तुलनेने कमी असेल. यामुळे तुम्हाला कर्जाची परतफेड करणे सोपे होईल. शिवाय कर्ज परतफेडीचा कालावधीसुद्धा कमी होईल. बॅलन्स ट्रान्सफर कार्ड्स, पर्सनल लोन हे त्यातले काही मार्ग ठरू शकतात.

परतफेड धोरण –
कर्जाची परतफेड करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला ॲव्हलांच आणि दुसरा स्नोबॉल. पहिल्यामध्ये ज्या कर्जाचा व्याजदर सर्वाधिक आहे ती आधी फेडली जातात. स्नोबॉलमध्ये सर्वात कमी रकमेचे कर्ज आधी फेडले जाते आणि नंतर मोठ्या रकमेच्या कर्जाकडे मोर्चा वळवला जातो.

पेमेंट ऑटोमेशन –
भविष्यातील कर्जे वेळेवर भरली जावीत यासाठी ‘पेमेंट्स ऑटोमेशन’ हा एक सोपा मार्ग आहे.

महत्त्वाचे –
१. जसा क्रेडिट कार्ड बॅलन्स कॅरी फॉरवर्ड होतो, तसतसे व्याज हे ऍव्हरेज डेली बॅलन्सवर आकारले जाते. वारंवार छोटीछोटी पेमेंट्स करत राहिल्याने व्याज कमी होऊ शकते. जर मिनीमम अमाऊंट पेएबलच्या दुप्पट रक्कम दरवेळी भरली तर कर्ज कमी करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होतो.

२. थकलेली रक्कम भरण्यासाठी पिअर टू पिअर लेंडिंग सर्व्हिसचा वापर करून पैसे जमावण्याचा विचार करा.

Comments are closed.