वाढत्या सिमेंट मागणीचा लाभार्थी 

JK Cement will benefit once the cement demand comes back to normalcy

करोनामुळे लागू झालेले निर्बंध एकीकडे हळूहळू उठत असताना, मार्केटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर थीम जोर धरताना दिसून येत आहे. या क्षेत्राला पूरक अशी सरकारची धोरणे हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. या थीमचा फायदा होऊ शकेल असा एक शेअर म्हणजे जे के सिमेंट लिमिटेड.

कंपनी ग्रे सिमेंट आणि व्हाईट सिमेंट अशी दोन प्रकारचे सिमेंट बनवते. कंपनीच्या महसुलात ग्रे सिमेंटचा वाटा ७६% तर व्हाईट सिमेंटचा वाटा २४% एवढा असतो.मार्च २१ अखेरीस संपलेल्या तिमाहीत कंपनीने २१३४ कोटी रुपयांचा महसूल आणि २१६ कोटी रुपये नफा कमावला. कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्ससाठी १५ रुपये डिव्हिडंडदेखील जाहीर केला आहे. मार्केटमधील सिमेंट ची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी व्यवस्थापनाने आता कॅपसिटी वाढवण्यासाठी आणखी एक प्लँट उभारण्याची परवानगी दिली आहे. हा पूर्णपणे ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट असणार असून मध्य प्रदेशातील पन्ना येथे असणार आहे. या प्लँटची कॅपसिटी ४ मिलियन टन्स प्रति वर्ष एवढी असणार आहे. यासाठी एकूण २९७० कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा प्लँट येत्या दोन वर्षात प्रॉडक्शन सुरू करेल अशी कंपनीला आशा आहे.

सप्टेंबर २०२० (१३.९८%) पासून प्रत्येक तिमाहीत (मार्च २०२१ – १६.८६%) एफआयआय कंपनीमध्ये आपला स्टेक वाढवत आहेत. प्रमोटर्सकडे कंपनीचे ५७% शेअर्स असून यातले ०% शेअर्स प्लेज केलेले आहेत. मार्च २०२१ अखेरीस कंपनीचे ग्रॉस डेट ३५४२ कोटी रुपये आहे. या आर्थिक वर्षात ६००-७०० कोटी रुपये डेट कमी करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीच्या प्रॉडक्ट व्हॉल्युममध्ये गेल्या सलग चार तिमाहीत वाढ झालेली आहे. इन्फ्रा थीम जर सरकारच्या प्लॅन नुसार घडत गेली तर कंपनीला याचा मोठा फायदा होऊ शकतो.

करोनामुळे फटका बसलेल्या क्षेत्रात इन्फ्रास्ट्रक्चरचाही समावेश होतो. सिमेंटची घातलेली मागणी पूर्वपदावर येण्यासाठी थोडा वेळ लागला तरी नंतरची मागणी मोठी असणार आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरने १३२% परतावा दिला आहे. त्यामुळे या कंपनीने विश्लेषकांचेसुद्धा लक्ष वेधून घेतले आहे. कंपनी व्यवस्थापनाने नवीन प्लॅंट सारख्या योजना वेळेवर पूर्ण केल्या त्याचा शेअरवर चांगलाच परिणाम होईल. सध्या हा शेअर विकत घेऊन थांबण्याची तयारी असेल तर येणाऱ्या काळात तो चांगला परतावा देऊ शकतो.

Comments are closed.