डेथ सर्टिफिकेट नसले तरी एलआयसी देणार क्लेम सेटलमेंट
LIC relaxes claim settlement requirements
आपल्या एखाद्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पॉलिसीचा क्लेम करण्यासाठी वारसदार किंवा नातलगांना बरीच धावपळ करावी लागते. आता नागरिकांची यातून सुटका होणार आहे. महानगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे डेथ सर्टिफिकेट नसले तरी क्लेमची रक्कम मिळणार आहे. एलआयसी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळाने याची सुरुवात केली आहे.
डेथ सर्टिफिकेट मिळेपर्यंत वाट न पाहता इतर कागदपत्रांच्या आधारे क्लेम सेटलमेंट केली जाणार आहे. यासाठी ईएसआय आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलद्वारे देण्यात आलेले डेथ सर्टिफिकेट स्वीकारले जाणार आहे. याशिवाय डिस्चार्ज समरी, डेथ समरी यावरील मृत्यूचा दिनांक आणि वेळेचा स्पष्ट उल्लेख असल्यास तेही ग्राह्य धरण्यात येणार आहे. हा क्लेम मान्य होण्यासाठी मात्र एलआयसीच्या क्लास 1 किंवा 10 वर्षांहून अधिक काळ सेवेत असलेल्या डेव्हलपमेंट ऑफिसरची सही असणे आवश्यक आहे.
याबरोबरच एलआयसीच्या कोणत्याही शाखेत क्लेम सेटलमेंटची कागदपत्रे दाखल केली तरी चालणार असल्याचे एलआयसी ने स्पष्ट केले आहे. याबरोबरच एखाद्या पॉलिसीकरता लागणारे लाईफ सर्टिफिकेट देण्यासाठी देखील ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
Comments are closed.