मारुती सुझुकी वाढवणार कारच्या किंमती
This will be the third price increase in this fiscal year by Delhi based carmaker
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी सप्टेंबरमध्ये आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२२ मध्ये त्यांनी केलेली ही तिसरी वाढ असेल. कंपनीने यापूर्वी एप्रिल आणि जुलैमध्ये किंमती वाढवल्या होत्या.
मारुती सुझुकी इंडियाने स्टॉक एक्सचेंजला दाखल केलेल्या कागदपत्रांत असे म्हटले आहे की, “आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की गेल्या वर्षभरात वाहन उत्पादनाच्या विविध खर्चात वाढ झाल्यामुळे काही प्रमाणात किंमतीत वाढ करणे गरजेचे आहे. त्यामुळे किंमत वाढवणे अत्यावश्यक झाले आहे.”
सप्टेंबर २०२१ मध्ये सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही वाढ नेमकी किती असेल हे मात्र कंपनीने स्पष्ट केलेले नाही. या महिन्यात १० तारखेला गणेश चतुर्थीपासून सुरु होणाऱ्या उत्सवाच्या हंगामापूर्वी ही दरवाढ केली जाईल.
टाटा मोटर्स, होंडा कार्स, महिंद्रा अँड महिंद्रा, रेनॉल्ट आणि टोयोटा यांनी जुलै-ऑगस्ट कालावधीत किमती वाढवल्या होत्या. स्टील आणि मौल्यवान धातूंसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली होती. रेटिंग आणि मार्केट इंटेलिजन्स कंपनी ICRA ने शेअर केलेल्या अहवालानुसार,आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या सहामाहीत कमॉडिटीच्या किंमती उच्चांकावर राहण्याची चिन्हे आहेत.या बातमीच्या पार्श्वभूमीवर मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये शुक्रवारी २% हून अधिक वाढ झालेली दिसली.
Comments are closed.