होमलोन फिटलं? मग आता ईएमआयची रक्कम अशी गुंतवा

भारतातील ९९% नागरिक स्वतःच घर घेताना होमलोन घेतात. हे लोन फेडण्यासाठी १०,१५, २० वर्षे ईएमआय भरतात. एकदा का हे होमलोन फिटलं की दर महिन्याला ईएमआय म्हणून भरली जाणारी रक्कम शिल्लक रहायला सुरुवात होते. ही रक्कम अर्थातच काही हजारांच्या घरात असते. मग या रकमेचा वापर कसा करता येईल?

बरेच लोक रिअल इस्टेटमध्ये इंटरेस्टेड असतात आणि त्यांना आणखी एक घर हवे असते. राहण्यासाठी घर खरेदी करणे ही चांगली कल्पना आहे,परंतु गुंतवणूकीसाठी खरेदी करताना विचार केला गेला पाहिजे. दुसरे होमलोन घेण्याची घाई करू नका. त्याऐवजी तुम्ही दर महिन्याला त्या अतिरिक्त पैशांचे करायचे काय?

त्यासाठी या पर्यायांचा विचार करू शकता.

१. इमर्जन्सी फंड रेडी करा तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसल्यास किंवा तो पुरेसा नसल्यास, तुमच्या शिल्लक पैशांचा वापर तो वाढविण्यासाठी करू शकता. हे कंटाळवाणे वाटेल, परंतु आवश्यक आहे. इमर्जन्सी कधीही येऊ शकते आणि तेव्हा तुमच्याकडे किती पैसा आहे हे बघून येत नाही.

२. जास्त व्याजदर असलेली इतर कर्जे फेडून टाकाजर तुमच्याकडे जास्त व्याजदराची इतर कर्जे (पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड थकबाकी) असेल तर ते भरणे सुरू करा. क्रेडिट कार्डचा बॅलन्स असेल तर आधी तो भरून टाका आणि मग इतर कर्जे फेडा.

३. मुलांच्या भविष्याची तरतूद
आता तुमच्या इतर ध्येयांवर लक्ष वेधू. सेवानिवृत्तीसाठी बचत करणे, मुलांचे उच्च शिक्षण, लग्न हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीसाठी किती गुंतवणूक करावी हे शोधण्यासाठी काही ध्येय-आधारित आर्थिक नियोजन करा. जर तुम्ही पुरेशी बचत करत नसाल, तर तुमची शिल्लक इकडे वळवा. यासाठी एक सोपे उदाहरण बघू.

समजा होमलोनसाठी तुम्ही मासिक EMI मध्ये ४५००० रुपये भरत होतात. आता कर्ज संपले आहे आणि तुमच्याकडे दर महिन्याला हे ४५००० शिल्लक आहेत. आता तुम्ही केलेल्या नियोजनानुसार तुम्हाला मुलांच्या भविष्यासाठी दरमहा ५०००० रुपये आणि सेवानिवृत्तीसाठी ३५००० रुपये गुंतवावे लागतील. म्हणजे एकूण ८५००० रुपये दरमहा गुंतवायचे आहेत. परंतु आत्तापर्यंत, तुम्ही फक्त मुलांसाठी आणि सेवानिवृत्तीसाठी तुम्ही प्रत्येकी २०००० रुपये गुंतवत आहात. आता तुम्ही हे ईएमआयचे ४५००० तिकडे वळवून मासिक ८५००० रुपये बचतीचे उद्दिष्ट साध्य करू शकता.

सेवानिवृत्तीसाठी,तुम्ही तुमचे VPF काँट्रिब्युशन आणि इक्विटी फंड वाढवण्याचा विचार करू शकता. मुलांच्या भविष्यासाठी, तुम्ही इक्विटी आणि डेट फंडांमध्ये एसआयपी चा वापर करू शकता. तुमच्यापैकी काहींना अतिरिक्त खर्च देखील असू शकतात. जर असे असेल तर पैसे वाचवण्यासाठी डेट फंड किंवा रिकरिंग डिपॉझिट वापरा.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचे आयुष्य मनमुराद जगा. आयुष्य फक्त बचत आणि गुंतवणूक करण्याबद्दल नाही. म्हणून, जर तुम्हाला थोडा खर्च करायचा असेल तर करा आणि काही महिने करा. ट्रिपला जा. परंतु, काही वेळेनंतर पुन्हा तुमच्या उद्दिष्टाकडे परत या.

Comments are closed.