तुमचा हेल्थ इन्श्युरन्स आहे का? नसेल तर हे नक्की वाचा
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात हेल्थ इन्श्युरन्स ही एक गरज बनून गेली आहे. बऱ्याचदा तुम्ही काम करत असलेली कंपनी तुम्हाला ग्रुप इन्श्युरन्स अंतर्गत हेल्थ इन्श्युरन्सचा फायदा देते. मात्र ही रक्कम पुरेशी असते का? नसल्यास अधिकचा वैद्यकीय खर्च करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते. हा खर्च किती असू शकेल हे कुणीच सांगू शकत नाही म्हणूनच कंपनीच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसोबत आपली स्वतःची आणि कुटूंबियांची पॉलिसी असणे कधीही चांगले.
यामध्ये तुम्ही स्वतःला आणि कुटूंबियांना काही व्याधी असतील तर त्याच्या उपचाराचा खर्च कव्हर करेल अशी पॉलिसी घेऊ शकता. हे करण्याचे दोन मार्ग आहेत.
१. वेगळी वैयक्तिक पॉलिसी घेणे
२. कंपनीच्या पॉलिसीवर टॉप अप घेणे
कंपनीने दिलेल्या पॉलिसीमध्ये एका ठराविक रकमेपर्यंत तुम्हाला इन्श्युरन्सचे कव्हर मिळते. उपचारासाठीचा खर्च त्याहून अधिक झाला तर टॉप अप कामाला येऊ शकतो.
कधीकधी असेही होते की एखाद्या आजारासाठी तुम्हाला दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. अशावेळी पुरेसे इन्श्युरन्स कव्हर असणे कधीही फायद्याचेच असते. बऱ्याच कंपन्या कुटूंबातील सर्व सदस्यांना कव्हर करतील असे फॅमिली फ्लोटर प्लॅन उपलब्ध करून देतात. ह्या प्लॅन मार्फत तुम्ही स्वतः, पत्नी, मुले, आई वडील असे संपूर्ण कुटूंब कव्हर करू शकता.
हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी घेताना खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
१. यामध्ये एकच पॉलिसी सगळ्यांना लागू होते असे नाही.
२. प्रत्येकाची पॉलिसी, त्याला असलेले आजार, त्यासाठी त्याला लागणारे इन्श्युरन्स कव्हर आणि त्यासाठीचा हफ्ता हे वेगवेगळे असते. यासाठी प्रत्येकाचे वय, काम करण्याचे ठिकाण, कामाचे स्वरूप, कटूंबातील सदस्यांची मेडिकल हिस्टरी असे अनेक घटक महत्वाचे असतात.
त्यामुळे मित्राने घेतली, भावाने घेतली म्हणून आपण पण तीच पॉलिसी घेऊ असे न करता तुमच्यासाठी कोणती पॉलिसी योग्य आहे याचा नीट अभ्यास करून मगच निर्णय घ्या.
Comments are closed.