प्रॉपर्टीवर लोन घेताय का?मग हे नक्की करा 

What to look for while availing loan against property

बऱ्याचदा व्यवसायाची गरज म्हणून किंवा वैयक्तिक कारणांसाठी आपल्याला लोन घेण्याची आवश्यकता भासते. हे लोन घेताना बरेच जण प्रॉपर्टीवर लोन घेण्याला प्राधान्य देतात. प्रॉपर्टीवर लोन घेतल्याने तुम्हाला वापरायला पैसा तर मिळतोच आणि प्रॉपर्टीचा मालकी हक्कदेखील तुमच्याकडेच राहतो. शिवाय लोन देणाऱ्या संस्थेकडे प्रॉपर्टी तारण असल्याने ते इंटरेस्ट रेटसुद्धा वाजवी लावतात. तुमचा सिबील स्कोर थोडा कमी असला तरी लोन देण्यासाठी फारशी कटकट करत नाहीत. असे असले तरी प्रॉपर्टीवर लोन घेताना ह्या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत.

१. इंटरेस्ट रेटची तुलना –

प्रॉपर्टीवर लोन घेतले तर सध्या इंटरेस्ट रेट ८ ते १३% च्या दरम्यान लागतो. अर्थात हा रेट किती लावायचा याचा अंतिम निर्णय लोन देणाऱ्या संस्थेकडे असतो. लोनची रक्कम, लोनचा कालावधी याही गोष्टींचा इंटरेस्ट रेटवर परिणाम होत असतो. त्यामुळे प्रॉपर्टीवर लोन घेताना जास्तीत जास्त संस्थांकडे चौकशी करावी. तुम्हाला हव्या असलेल्या रकमेसाठी आणि कालावधीसाठी जी संस्था कमीतकमी इंटरेस्ट रेट देईल त्या संस्थेकडून लोन घेण्यास प्राधान्य द्यावे.

२. प्रोसेसिंग फी –

प्रॉपर्टीवर लोन घेतल्यास एकूण रकमेच्या १-२% प्रोसेसिंग फी लावली जाते. त्यामुळे कोणती संस्था कमीत कमी प्रोसेसिंग फी घेत आहे याचा नीट अभ्यास करावा.

प्रॉपर्टीवर लोन घेताना फ्लोटिंग इंटरेस्ट रेटला प्राध्यान्य द्यावे. यामुळे तुम्ही लोनचे प्री पेमेंट केल्यास किंवा लोन फोरक्लोज केल्यास त्याचे वेगळे पैसे भरावे लागत नाहीत. फिक्स्ड इंटरेस्ट असेल तर हे पैसे तुम्हाला भरावे लागतात.

३. लोनचा कालावधी –

कुठल्याही लोनसाठी हफ्ता आणि इंटरेस्ट किती असेल हे लोनच्या कालावधीवर अवलंबून असते. जास्त कालावधी घेतलेल्या लोनमध्ये तुमचा हफ्ता कमी असतो पण तेवढाच जास्त इंटरेस्टही तुम्हाला भरावा लागतो. हेच जर लोनचा कालावधी कमी असेल तर हफ्ता जास्त होतो. हफ्त्याची ही जास्त रक्कम भरण्याची पूर्ण खात्री असेल तर आणि तरच कमी कालावधीसाठी लोन घ्यावे. अन्यथा १५-२० वर्षे कालावधी साठी लोन घेऊन अधूनमधून प्री पेमेंट करण्याचा पर्याय कधीही उत्तमच.

४. लोनची रक्कम अकाउंटला जमा होण्यासाठी लागणारा कालावधी –

प्रॉपर्टीवर लोन घेताना, लोन देणारी संस्था पैसे देण्याआधी बरीच मोठी प्रक्रिया पार पाडत असते. यामध्ये प्रॉपर्टीची सगळी कागदपत्रे तपासणे, प्रॉपर्टीचे बाजारमूल्य किती आहे हे मोजणे ह्या सगळ्या प्रक्रिया केल्यानंतर मगच तुमचे लोन ऍप्लिकेशन मान्य केले जाते. या सगळ्यासाठी ३ आठवडे ते एक महिना एवढा कालावधी सहज लागू शकतो. त्यामुळे तात्काळ पैशाची गरज असेल तर प्रॉपर्टीवर लोन घेण्याचा पर्याय तुमच्या कामाचा नाही. तुम्ही पर्सनल लोन घेतलेले योग्य.

५. संकटकाळी हफ्ता भरण्याची क्षमता –

सध्या तुम्ही लोनचा हफ्ता भरू शकत असला तरी भविष्यात एखादी घटना अशी घडू शकते की ज्यामुळे तुम्हाला लोनचा हफ्ता भरणे शक्य होत नाही. नोकरी जाऊ शकते, एखादे आजारपण येऊन खर्च वाढू शकतो, आजारपणात सक्तीची रजा घ्यावी लागू शकते. ही सगळे घटक विचारात घेऊन लोनच्या हफ्त्याच्या रकमेचा विचार इमर्जंसी फंडात केला पाहिजे. काही कारणास्तव लोनच्या हफ्त्याची रक्कम थकली तर ती इमर्जंसी फंडातून देता येईल असे नियोजन करावे.

Comments are closed.