गो फर्स्ट (गो एअर) च्या आयपीओ ला सबस्क्राईब करावे का?

Go First is desperate to raise money. But will the investors be able to fly?

गो फर्स्ट एअरलाईनने नुकतीच आपल्या आयपीओबद्दल घोषणा केली. कंपनीने सेबीकडे दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार आयपीओच्या माध्यमातून ३६०० कोटी उभे करण्याचा कंपनीचा विचार आहे. या निधीचा वापर कंपनी कसा करणार आहे?

तर या ३६०० कोटींमधला (जर आयपीओ १००% सबस्क्राईब झाला तर) जास्तीत जास्त निधी कंपनी आपली देणी परत करण्यासाठी वापरणार आहे. कंपनीने नमूद केल्याप्रमाणे यासाठी २०१५.८ कोटी रुपये वापरले जाणार आहेत. उरलेल्या निधीपैकी २७९ कोटी रुपये हे ज्या कंपन्यांकडून गोफर्स्टने विमाने लीजवर घेतली आहेत त्यांना देण्यासाठी वापरले जाणार आहेत.  यातून उरलेली रक्कम गोफर्स्ट इंडियान ऑइलचे पेमेंट करण्यासाठी वापरणार आहे. एअरलाईन कंपनीला विमाने चालवण्यासाठी इंधनसुद्धा उधारीवर घ्यावे लागते आहे यावरून कंपनीची परिस्थिती किती हलाखीची आहे हे लक्षात येते. गेल्या महिन्याअखेरीस कंपनीच्या डेटचा आकडा ८१६० कोटींवर जाऊन पोहोचला आहे.

याला कारण काय?

गेल्यावर्षी आणि काहीप्रमाणात यावर्षी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सगळ्याच विमान कंपन्यांना बसला. गोफर्स्ट जी आधी गो एअर होती, तिचा मार्केट शेअर मार्च २०२० मध्ये ९.९% एवढा होता. हाच मार्केट शेअर आता मार्च २०२१ मध्ये ७.८% एवढा आहे. २०१९-२० च्या आर्थिक वर्षात गो एअरने एकूण १,०२,९४४ विमाने ऑपरेट केली. हाच आकडा २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत १९९९३ वर आला.

कंपनी तग धरायलासुद्धा झगडते आहे. कंपनीची नेटवर्थ निगेटिव्ह १९६१ कोटी रुपये आहे. करंट लायाबिलिटीजचा आकडा ४४०० कोटींवर जाऊन पोहोचला आहे, जो कंपनीच्या एकूण टर्नओव्हरच्या तिप्पट आहे. अशी परिस्थिती असताना साहजिकच कोणत्याही कंपनीला आर्थिक हातभाराची गरज लागणार. यासाठी गोफर्स्टने आयपीओ आणायचे ठरवले. मात्र आता ही एअरलाईन स्वतःला अल्ट्रा लो कॉस्ट एअरलाईन म्हणवून घेते आहे. गो एअर ही आधीची कंपनी लो कॉस्ट एअरलाईन म्हणून ओळखली जायची (ती खरोखर लो कॉस्ट होती की नाही हा प्रश्न वेगळा). आजघडीला ऑइलच्या किमती वाढत्या असताना गोफर्स्टने स्वतःला अल्ट्रा लो कॉस्ट एअरलाईन म्हणवणे तितकेसे पटत नाही. फक्त स्वतःला अल्ट्रा लो कॉस्ट एअरलाईन घोषित करून फायद्यात येता येत नाही. असेच असते तर किंगफिशर, जेट एअरवेज बुडाल्या नसत्या. ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी तिकिटांचे दर कमी ठेवायचे हे जेव्हा तुम्ही फायद्यात असता तेव्हा ठीक वाटते. मात्र आधीच भरमसाठ तोटा आणि त्यात ही अशी स्ट्रॅटेजी म्हणजे अवघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गोफर्स्टने तिकिटांचे दर कमी केले तर याच क्षेत्रातील इतर दोन लिस्टेड कंपन्या इंडिगो आणि स्पाईसजेट याना तसे करायला वेळ लागणार नाही. यात तोटा कुणाचा? ज्या कंपनीचे बॅलन्स शीट कमकुवत आहे (या केसमध्ये गोफर्स्ट) त्याच कंपनीचा.

त्यातल्या त्यात एक दिलासादायक गोष्ट म्हणजे करोनामुळे अशी परिस्थिती निर्माण होण्याआधी इंडिगो बरोबरच गो एअरचा परफॉर्मन्ससुद्धा ठीक होता. तरीही जरी गोफर्स्ट लिस्ट झाल्यानंतर तिची स्पर्धा मार्केटमध्येसुद्धा इंडिगो आणि स्पाईसजेट बरोबरच असणार आहे. इन्व्हेस्टर्स आपला पैसा लावताना ज्या कंपनीची आर्थिक स्थिती चांगली आहे, ज्या कंपनीचे रेशो चांगले आहेत त्याच कंपनीमध्ये लावणार. या सगळ्या गोष्टींचा विचार करता या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते.

Comments are closed.