अक्षय तृतीयेला सोनेखरेदी नका करू, सोन्यात SIP सुरु करा

SIP in gold fund can be an option for physical gold

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेकजण सोने विकत घेतात. पण दुकानात जाऊन किंवा ऑनलाईन सोने विकत घेण्यापेक्षा बॉंड किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून घेणे कधीही चांगले. यामुळे तुमच्याकडे सोने हे पेपर फॉर्ममध्ये राहते जे हाताळण्यास सोपे असते. या सोन्याची त्या त्या दिवशीची किंमत किती आहे हेही तुम्हाला सहज कळते.

पेपर फॉर्ममध्ये सोने कसे विकत घ्याल?

पहिला पर्याय म्हणजे सॉव्हरिन गोल्ड बॉंड्स. हे बॉंड्स भारत सरकारकडून इश्यू केले जातात. या बॉंड्स वर तुम्हाला वार्षिक २.५% दराने व्याजही मिळते. हे व्याज दर सहा महिन्याला मिळते. आरबीआय वेळोवेळी हे बॉंड्स बाजारात आणत असते. त्यावर नजर ठेवून तुम्ही या पेपर फॉर्ममधील सोन्यात गुंतवणूक करू शकता.

दुसरा पर्याय म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड. हे फंड गोल्ड ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) मध्ये गुंतवणूक करतात. या फंडांची NAV सोन्याच्या किमतीशी निगडित असते. सध्या बाजारात एकूण १० गोल्ड फंड उपलब्ध आहेत. ते खालीलप्रमाणे

आदित्य बिर्ला एसएल गोल्ड
ऍक्सिस गोल्ड
एचडीएफसी गोल्ड
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रेग्युलर गोल्ड सेव्हिंग्ज
आयडीबीआय गोल्ड
इंव्हेस्को इंडिया गोल्ड
कोटक गोल्ड
निपॉन इंडिया गोल्ड सेव्हिंग्ज
क्वांटम गोल्ड सेव्हिंग्ज
एसबीआय गोल्ड

या फंडांमध्ये तुम्ही SIP करू शकता. यामुळे सोन्याच्या भावात होणाऱ्या चढउतारांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या गोल्ड म्युच्युअल फंडांत तुम्ही अगदी ५०० रुपये महिना टाकून सुद्धा SIP सुरु करू शकता. या फंडांत केलेली गुंतवणूक एक वर्षाच्या आत तुम्ही काढून घेतलीत तर १% एक्झिट लोड लागतो. गोल्ड फंडांत केलेली गुंतवणूक ३६ महिन्यांच्या नंतर काढून घेतलीत तर तुम्हाला २०% लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लागतो. जर हेच तुम्ही ३६ महिन्यांच्या आधी केले तर तुम्ही ज्या टॅक्स स्लॅबमध्ये असाल त्या रेटने तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो.

शेअर्स, एफडी, पीएफ, पीपीएफ यांच्याबरोबरच पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करण्यासाठी गोल्ड फंड हा एक चांगला पर्याय आहे. मात्र एकूण पोर्टफोलिओच्या ५-१०% गुंतवणूकच यामध्ये ठेवणे योग्य.

Comments are closed.