इंश्युरन्स पॉलिसीमधले को-पे आणि डीडक्टिबल्स म्हणजे नक्की काय?

गेल्या काही वर्षांत भारतात हेल्थ इंश्युरन्स, कार इंश्युरन्स, ट्रॅव्हल इंश्युरन्स घेणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. गेल्या वर्षांपासून करोनाने घातलेल्या थैमानामुळे याबाबत जनतेत बरीच जागरूकता निर्माण झाली आहे. इंश्युरन्स विकत घेताना त्यात काय कव्हर होते आणि काय कव्हर होत नाही याकडे आपण जातीने लक्ष देतो. याबाबत काय काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती आता बऱ्यापैकी उपलब्ध आहे. मात्र या इंश्युरन्स पॉलिसीजमध्ये दोन गोष्टी अशा असतात की ज्यावर इंश्युरन्स कंपन्यांचा जास्त भर असतो. त्या दोन गोष्टी म्हणजे को-पे आणि डीडक्टिबल्स. या दोन शब्दांचा नक्की अर्थ काय? त्याचा तुमच्या पॉलिसीवर काय परिणाम होतो?

 

को-पे – अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर तुम्ही इंश्युरन्स क्लेम केला की पॉलिसीमध्ये को-पेची टक्केवारी जेवढी असते तेवढी रक्कम तुम्हाला स्वतःच्या खिशातून भरावी लागते.
म्हणजे जर तुम्ही १ लाख रुपयांचा क्लेम केला आणि तुमच्या पॉलिसीमध्ये को-पेची टक्केवारी १५% आहे तर तुम्हाला १५००० रुपये खिशातून भरावे लागतात आणि उरलेले ८५००० इंश्युरन्स कंपनी तुम्हाला देते.

 

या को-पेची टक्केवारी इंश्युरन्स कंपनीनुसार बदलू शकते. यात बऱ्याच कंपन्या अजून छोट्या अटीसुद्धा टाकतात. जसे की तुम्ही तुमच्या इंश्युरन्स कंपनीच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या हॉस्पिटलमधून उपचार घेतले तर तुम्हाला को-पेची टक्केवारी जास्त लागू होते. पॉलिसीमध्ये १०% असेल तर या केससाठी ती १५% असू शकते.

 

डीडक्टिबल्स  – ह्याचाही अर्थ जवळपास को-पे सारखाच आहे. तुम्ही जर क्लेम केला तर पॉलिसीमध्ये
डीडक्टिबल्सची रक्कम जेवढी असते ती सोडून उरलेली रक्कम तुम्हाला इंश्युरन्स कंपनीकडून मिळते.

 

म्हणजे जर तुम्ही १ लाख रुपयांचा क्लेम केला आणि तुमच्या पॉलिसीमध्ये डीडक्टिबल्सची रक्कम १०००० आहे तर तुम्हाला १०००० रुपये खिशातून भरावे लागतात आणि उरलेले ९०००० इंश्युरन्स कंपनी तुम्हाला देते. ही डीडक्टिबल्सची रक्कम जेवढी जास्त तेवढा तुमचा इंश्युरन्स प्रीमियम कमी हे सांगायला नकोच.

 

डीडक्टिबल्स तुम्हाला दरवर्षी भरावे लागते आणि त्यानंतरच तुमची इंश्युरन्स पॉलिसी लागू होते. मात्र एकदा ही रक्कम भरली की पुन्हा त्या वर्षात तुम्हाला ती भरावी लागत नाही. को-पे ची रक्कम मात्र जेव्हा जेव्हा तुम्ही क्लेम करता तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला भरावी लागते. पॉलिसीधारकांनी छोट्या छोट्या रकमांचे क्लेम करू नयेत म्हणून या दोन गोष्टींचा इन्शुरन्स कंपन्यांना उपयोग होतो.

Comments are closed.