पेट्रोल १०० रु. पेक्षा स्वस्त, आणखी एका राज्यात भाव उतरले

पुद्दुचेरी सरकारने २५ ऑगस्ट रोजी पेट्रोलच्या किंमतीत कर कपात जाहीर केली आहे. प्रशासनाने पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट ३ टक्क्यांनी कमी केला आहे. या कपातीचा निर्णय मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता आणि त्याला लेफ्टनंट गव्हर्नर तमिळसाई सौंदराजन यांनी मान्यता दिली. या कपातीमुळे पुद्दुचेरी आणि कराईकल भागात पेट्रोलच्या किंमतीत २.४३ रुपयांची घट होईल. इंडियन ऑइलच्या वेबसाईटनुसार, सध्या पुद्दुचेरीमध्ये पेट्रोल १०१.८१ रुपये आणि डिझेल ९२.७३ रुपये दराने विकले जाते.

याआधी तामिळनाडूने पेट्रोलवर अशाच प्रकारची कर कपात जाहीर केली होती. द्रमुक सरकारने पेट्रोलमध्ये प्रति लिटर तीन रुपयांची कपात केली होती. कर कपातीमुळे तामिळनाडू राज्याला वर्षाला ११६० कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे अर्थमंत्री पी त्यागराजन यांनी १२ ऑगस्ट रोजी सांगितले होते. सध्या चेन्नईमध्ये पेट्रोल ९९.२० रुपये आहे, तर डिझेल ९३.५२ रुपये दराने विकले जाते.

मे महिन्यापासून सातत्याने दर वाढल्यानंतर इंधनाचे दर सर्व महानगरांमध्ये विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून किमती वाढल्याने राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, केरळ, बिहार आणि पंजाब यासह 15 राज्यांमध्ये बहुतेक ठिकाणी पेट्रोलचे दर १०० रुपयांपेक्षा जास्त आहेत.

Comments are closed.