ईव्ही मार्केटची बॅटरी अमर राजा करणार चार्ज

Amara Raja has received a technology transfer from ISRO for Lithium-ion battery manufacturing

गेले काही महिने भारतात ईव्ही धोरणामुळे फायदा होणाऱ्या कंपन्या चर्चेत आहेत. भारत सरकारचे येणाऱ्या काळातील ईव्ही वाहनांबाबतचे धोरण या कंपन्यांना पूरक असणार आहे. यातली एक कंपनी म्हणजेच अमर राजा बॅटरीज.

तिरुपती येथील अमर राजा ग्रुपमधील ही एक कंपनी. अमर राजा ग्रुपच्या एकूण ७ कंपन्या आहेत. या ग्रुपमध्ये जवळपास १६००० कर्मचारी आहेत. अमर राजा बॅटरीज ही लीड ऍसिड बॅटरीज बनवणारी भारतातील एक प्रमुख कंपनी मानली जाते. कंपनी इंडस्ट्रिअल बॅटरीज, ऑटोमोटिव्ह बॅटरीज, घरी वापरले जाणारे इन्व्हर्टर्स आणि बॅटरीज  यांचे उत्पादन करते. ऍमरॉन हा बॅटरीचा ब्रँड सर्वज्ञात आहे. ऑटोमोटिव्ह बॅटरीजसाठी कंपनीच्या ग्राहकांमध्ये होंडा, ह्युंदाई, महिंद्रा अँड महिंद्रा, फोर्ड, मारुती, अशोक लेलँड, टाटा मोटर्स, रॉयल एनफिल्ड, बजाज ऑटो या नामांकित कंपन्यांचा समावेश होतो. कंपनी ३२ हून अधिक देशांमध्ये आपल्या बॅटरीजची निर्यातदेखील करते. कंपनीच्या इंडस्ट्रिअल बॅटरीज टेलिकॉम, रेल्वे, डिफेन्स सेक्टरमध्ये वापरल्या जातात.

कंपनीबाबत काही ठळक गोष्टी
१. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महालला पॉवर सपोर्ट अमर राजाच्या बॅटरीजचा आहे.

२. भारतातील दर दोनपैकी एका टेलिकॉम टॉवरला अमर राजाची बॅटरी आहे.

३. सिंगापूरमधील दर तीनपैकी एका कारला अमर राजाची बॅटरी आहे.

भारतातील बॅटरी मार्केटचा विचार केला तर दोन कंपन्यांची नावे लगेच आठवतात. त्या कंपन्या म्हणजे अमर राजा आणि एक्साईड इंडस्ट्रीज. येणाऱ्या काळाचा विचार करता लीड ऍसिड बॅटरीज ऐवजी लिथियम आयॉन बॅटरीजचा वापर वाढत जाणार आहे. हेच लक्षात घेऊन अमर राजाने फेब्रुवारी २०२१ रोजी तिरुपती येथे लिथियम आयॉन सेल्ससाठी संशोधन केंद्र सुरु केले. येत्या काही वर्षात लिथियम आयॉन सेल्स बनवणारी भारतातील पहिली कंपनी बनण्याचा कंपनीचा मानस आहे. या संशोधन केंद्रासाठी कंपनीने सध्या २० कोटींची गुंतवणूक केली आहे. अर्थात ही गुंतवणूक अगदीच नगण्य असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कंपनीला या मुद्द्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी मोठ्या कॅपेक्सची गरज लागू शकते. तसे न केल्यास कंपनीसाठी तो धोका ठरू शकतो. मात्र अमर राजासारखी जुनी आणि अनुभवी  व्यवस्थापन असलेली कंपनी बदलत्या मार्केटचा विचार करून योग्य वेळी योग्य निर्णय घेईल असे वाटते.  लिथियम आयॉन बॅटरीज बनवण्यासाठी भारत सरकारने नुकत्याच सुरु केलेल्या परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेन्टिव्ह स्कीमचा फायदा या कंपनीला होऊ शकतो. या स्कीमसाठी रिलायन्स, अदानी, टाटा केमिकल्स, एल अँड टी या कंपन्यांनीसुद्धा रस दाखवला आहे.

एक बाब इथे नमूद करावी लागेल ती म्हणजे लिथियम आयॉन बॅटरीज बनवण्यासाठी कंपनीला इस्रोकडून टेक्नॉलॉजी ट्रान्सफर लायसन्स मिळाले आहे. विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना इस्रोकडून ही टेक्नॉलॉजी मिळणार आहे त्यामध्ये अमर राजाची स्पर्धक कंपनी एक्साईड इंडस्ट्रीजचा समावेश नाही. अमर राजा याचा फायदा कसा उठवते? याकडे लक्ष ठेवावे लागेल.

मार्च २०२१ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने १८९ कोटींचा नफा कमावला. गेल्यावर्षी याच तिमाहीत कमावलेल्या नफ्याच्या (१३७ कोटी) तुलनेत ही वाढ ३८% एवढी आहे. कंपनीच्या महसुलातसुद्धा १५८१ कोटींवरून २१०३ कोटी एवढी वाढ झाली. कंपनी २०११ पासून सातत्याने आपल्या शेअरहोल्डर्सना डिव्हीडंड देत आली आहे. कंपनीचा डेट झिरो आहे.  ३१ मार्च २०२० रोजी कंपनीचा शेअर ४७८ रुपये होता. तिथून त्याने जानेवारी २०२१ मध्ये १००० रुपयांचा टप्पा गाठला होता. सध्या हा शेअर ७६१ रुपये आहे.

काही दिवसांपूर्वी क्लॅरिऑस होल्डिंगने कंपनीतला आपला २४% वाटा एका ब्लॉक डीलद्वारे विकला. यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी हीच एक चांगली संधी असल्याचे अनेक विश्लेषकांनी सांगितले होते. भारतातील एक प्रमुख इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मानल्या जाणाऱ्या एलआयसीचा अमर राजामध्ये ५% वाटा आहे. एप्रिल २०२१ मध्ये एलआयसीने ओपन मार्केटमधून जवळपास २ लाख शेअर विकत घेत आपला वाट ४.९४% वरून आता ५.०६% पर्यंत नेला आहे. याबरोबरच मॉर्गन स्टॅन्ले, इंटिग्रेटेड कोअर स्ट्रॅटेजीज एशिया यांनी नुकतेच कंपनीचे शेअर्स विकत घेतले आहेत.

भारत सरकारचे ईव्ही धोरण, बदलत्या परिस्थितीला अनुरूप वाटचाल करण्याची कंपनी व्यवस्थापनाची तयारी आणि त्या दिशेने टाकलेली पाऊले, बॅटरी मार्केटमधील एक नावाजलेला ब्रँड या सगळ्या गोष्टींचा अमर राजाला येणाऱ्या काळात फायदा होऊ शकतो. बदलत्या परिस्थितीला कंपनीने योग्य प्रतिसाद दिल्यास हा शेअर येणाऱ्या काळात चांगला रिटर्न देऊ शकेल.

कंपनीच्या शेअरने डेली चार्टवर डाऊन ट्रेंड तोडत ब्रेक आऊट दिला आहे. या टेक्निकल ऍनालिसिसवरूनदेखील येणाऱ्या काळात हा शेअर चांगला परतावा देऊ शकतो ही बाब अधोरेखित होते.

Comments are closed.