या आर्थिक वर्षात IPO मध्ये भरमसाठ वाढ, वाचा अर्थमंत्र्यांनी संसदेत दिलेली ‘ही’ माहिती

या आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंत देशातील 61 कंपन्यांनी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे ( IPO ) 52,759 कोटी रुपये उभारले आहेत. याची माहिती मंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी दिली. लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी असेही सांगितले की, 2021-22 या आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंत IPO घेऊन आलेल्या 61 कंपन्यांपैकी 34 लघु आणि मध्यम उद्योग (SMEs) होत्या.

सीतारामन म्हणाल्या की, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्या शेअर बाजारात लिस्टमध्ये येत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, 56 कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षात IPO द्वारे बाजारातून 31,060 कोटी रुपये उभे केले होते आणि यापैकी 27 कंपन्या SME होत्या.

100 कोटींपेक्षा कमी 35 IPO

अर्थमंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितले की, 61 कंपन्यांपैकी 35 कंपन्यांचे 100 कोटी रुपयांपेक्षा कमी IPO आहेत. चालू आर्थिक वर्षात ज्या कंपन्यांनी IPO काढले आहेत, त्यापैकी 10 हेल्थकेअर क्षेत्रातील आणि सहा सिमेंट/बांधकाम क्षेत्रातील आहेत.

Comments are closed.