थलायवाचा भक्त आणतोय IPO, तोही थेट अमेरिकेत

Freshworks CEO Girish Mathrubootham is a big Rajnikanth fan and has thanked him while filing for IPO

दक्षिणेकडील चित्रपट सृष्टीचे सुपरस्टार आणि ज्यांच्याकरता वय हे फक्त आकडा आहे असे अभिनेता रजनीकांत यांची क्रेझ आता IPO मध्येदेखील दिसून येते आहे. अभिनेता रजनीकांत हे फ्रेशवर्क्सचे संस्थापक आणि सीईओ गिरीश मातृभूतम यांच्यासाठी एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत.गिरीश यांच्या मनात रजनीकांत यांच्यासाठी खास जागा आहे. मातृभूतम यांच्या कंपनीने अमेरिकेत १०० मिलियन डॉलरच्या आयपीओसाठी नुकतीच कागदपत्रे दाखल केली आहेत.

अलीकडच्या काळात भारतातील सर्वात यशस्वी सॉफ्टवेअर स्टार्टअप फाऊंडर्सपैकी मातृभूतम हे एक आहेत. ते रजनीकांत यांचे मोठे चाहते आहेत. जेव्हा जेव्हा रजनीकांत यांचा चित्रपट रिलीज होतो तेव्हा ते त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी चेन्नईतील संपूर्ण सिनेमा हॉल बुक करतात. काही वर्षापूर्वी स्टार्टअप मधील एक पुरस्कार जिंकल्यानंतर रिपोर्टरने त्यांची मुलाखत घेतली तेव्हा ते म्हणाले की, रजनीकांत यांना चेन्नईतील फ्रेशडेस्क कार्यालयाची (आताचे फ्रेशवर्क्स) टूर देण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

गिरीश आपला व्यवसाय वाढवण्यासाठी चेन्नईहून अमेरिकेत गेले असले तरी त्यांच्यातील रजनीकांत यांचा फॅनबॉय अजूनही जिवंत आहे. IPO साठी अप्लाय करताना त्यांनी त्या कागदपत्रातही रजनीकांत यांचा उल्लेख केला आहे.

गिरीश म्हणाले, “आमच्या IPO साठी कोडनेम हे ‘प्रोजेक्ट सुपरस्टार’ होते. रजनीकांत याना दक्षिणेकडे ‘सुपरस्टार’ असेच म्हटले जाते. माझे ‘मानस गुरू’ असल्याबद्दल रजनीकांत यांच्याबद्दल मला प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ‘मानस गुरू’  हा एक मार्गदर्शक आहेत जो तुमच्या मनात राहतो,  ज्यांच्यापासून तुम्ही खूप काही शिकता. ‘सुपरस्टार’ हा असा माणूस आहे ज्याला जगभरातील लाखो चाहत्यांनी प्रेम केले आणि त्याची पूजा केली जाते. एवढे यश मिळवूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. धन्यवाद थलायवा.”

फ्रेशवर्क्सचे सध्याचे व्हॅल्युएशन ३.५ बिलियन डॉलर्स असून कंपनीने आता १० बिलियन डॉलर्स व्हॅल्युएशनचे लक्ष्य ठेवले आहे. ही भारतातील एक आघाडीची सॅस म्हणजेच सॉफ्टवेअर ऍज सर्व्हिस पुरवणारी कंपनी आहे.

Comments are closed.