कोव्हीडमुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ओयोचा ‘मोठा’ निर्णय

काही दिवसांपूर्वी ओयो या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ४ दिवसांचा आठवडा केला होता. आता कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या ज्या कर्मचाऱ्यांना कोव्हीडमुळे आपले प्राण गमवावे लागले अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

या निर्णयानुसार कोव्हीडमूळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ओयो पुढील आठ महिने त्यांच्या पगाराची रक्कम देणार आहे. तसेच टर्म इन्श्युरन्स कव्हरेज म्हणून कर्मचाऱ्यांच्या तीन वर्षांचा पगारही त्यांच्या कुटुंबियांना कंपनीकडून देण्यात येणार आहे. मृत कर्मचाऱ्यांचा मुलांना पुढील पाच वर्षे त्यांच्या शिक्षणाचा खर्च ओयोकडून मिळणार आहे तसेच कुटुंबियांना कंपनीच्या ग्रुप मेडिकल पॉलिसीमध्ये सामावून घेतले जाणार आहे.

ओयोचे संस्थापक आणि सीईओ रितेश अगरवाल यांनी आपल्या ट्विट मध्ये याबद्दल माहिती दिली. “कोव्हिडबरोबर सुरू असलेला लढा अजून संपलेला नाही. कंपनीच्या या पावलांमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना थोडीतरी मदत होईल अशी मला आशा आहे. आपली प्रेमाची माणसे गमावल्या नंतरची परिस्थिती हाताळणे अवघड असते याची मला जाणीव आहे. मात्र आम्ही शक्य होईल तसे आमच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी तयार आहोत.” असे अगरवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कंपनीकडून गंभीर लक्षणे नसलेल्या कोव्हीड रुग्णांसाठी वैद्यकीय केंद्रे चालवली जात आहेत. या केंद्रांमध्ये डॉक्टर्स, नर्सेस तसेच ऑक्सिजन कॉनसंट्रेटरसारख्या सुविधा आहेत. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिन्यापर्यंत मर्यादित पगारी रजेचा पर्यायदेखील उपलब्ध करून दिला आहे.

Comments are closed.