फार्मईझी बनली भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन फार्मसी
Medlife will merge with Pharmeasy from May 25, 2021
भारतातील रिटेल फार्मसी क्षेत्रातील कंपनी फार्मईझीने नुकतीच आपली स्पर्धक कंपनी मेडलाईफला विकत घेतले. या डीलमुळे फार्मईझीने भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन फार्मसी बनण्याचा मान मिळवला आहे. रिलायन्स, टाटा, अमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्या या क्षेत्रात पाय पसरण्यासाठी प्रयत्न करत असताना फार्मईझीने टाकलेले हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे.
एक ब्लॉगपोस्टमधून फार्मईझीने याबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, मेडलाईफ आता त्यांचे सर्व ऑपरेशन्स बंद करून फार्मईझीमध्ये विलीन करण्यात येईल. मेडलाईफच्या ग्राहकांना आतापासून फार्मईझीच्या प्लॅटफॉर्म वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. आम्हाला मेडलाईफ हा ब्रँड आपला वाटत असला तरी ग्राहकांच्या सोयीसाठी सगळ्या सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर असणे तितकेच गरजेचे आहे. यामुळे ग्राहकांना अधिक चांगल्या रीतीने सेवा देणे आम्हाला सोपे जाईल.
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात रिलायन्सने नेटमेड्स या कंपनीत ६४० कोटींची गुंतवणूक करत मोठा स्टेक विकत घेतला होता. यावर्षी टाटा ग्रुपने १एमजी या स्टार्टअपमध्ये ६५% हिस्सा विकत घेण्यासाठी करार केला होता. अमेझॉनने नुकतीच बंगलोरमधील ग्राहकांना आपला प्लॅटफॉर्म क्लाउडटेलवरून औषधे विकण्यास सुरुवात केली आहे. युनिकॉमर्सच्या अहवालानुसार एप्रिल २०२१ मध्ये फार्मसीशी निगडित शिपमेंटमध्ये १८% वाढ झालेली दिसून आले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फार्मईझीने केलेले हे डील भारतीय ऑनलाईन फार्मसी सेक्टरसाठी महत्वाचे मानले जात आहे.
Comments are closed.