जवळपास तीन वर्षांपूर्वी फ्लिपकार्टमधील आपली गुंतवणूक विकलेला सॉफ्टबँक व्हिजन फंड पुन्हा एकदा या कंपनीत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार यावेळी सॉफ्टबँक फ्लिपकार्टमध्ये ६००-७०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
फ्लिपकार्ट सध्या २ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक मिळवण्यासाठी फंडिंग राऊंडच्या तयारीत आहे. या राऊंडमध्ये फ्लिपकार्टमधील सध्याचे गुंवतणूकदार कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, जीआयसी यांच्याबरोबरच अबुधाबीची एडिक्यू, कॅनडाची सीपीपीआयबी या कंपन्या गुंतवणूक करणार आहे. या फंडिंग राऊंडनंतर फ्लिपकार्टचे व्हॅल्युएशन २५-३० बिलियन डॉलर्स एवढे होऊ शकते.
आता सॉफ्टबँकसुद्धा फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समोर येत आहे. याबाबत फ्लिपकार्ट आणि सॉफ्टबँकेच्या व्यवस्थापनांमध्ये चर्चा सुरु असून येत्या काही आठवड्यांत याबाबत निश्चित निर्णय होईल. असे झाल्यास फ्लिपकार्टचा आयपीओ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याआधीच्या वृत्तानुसार फ्लिपकार्ट २०२२ च्या सुरुवातीला आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत होते. मात्र आता यासाठी त्यांना आणखी काही काळ वाट बघावी लागू शकते.
सॉफ्टबँकेने २०१७ मध्ये फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्नॅपडीलकडून झालेल्या विरोधामुळे हा व्यवहार होऊ शकला नाही. यानंतर सॉफ्टबँकेने फ्लिपकार्टमध्ये असलेला आपला २१% वाटा वाटा वॉलमार्टला २८०० कोटी रुपयांना विकला होता. गेल्यावर्षी जुलै महिन्यात फ्लिपकार्टने १.२ बिलियन डॉलर्सचा निधी उभा केला होता. त्यावेळी कंपनीचे व्हॅल्युएशन २४.९ बिलियन डॉलर्स एवढे करण्यात आले होते. आता रिलायन्स रिटेल, टाटा ग्रुप, अमेझॉन या कंपन्या भारतातील रिटेल क्षेत्रात आपला शेअर वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना सॉफ्टबँकेची फ्लिपकार्टमधील ही गुंतवणूक महत्वाची मानण्यात येत आहे.
Comments are closed.