अजब कारभार – कंपनी तोट्यात, तरी येतोय आयपीओ!

Everything you need to know about Zomato IPO

झोमॅटोचं नाव ऐकलं नाही असा माणूस शोधूनही सापडणे मुश्किल आहे. एक वेळ झोमॅटोचा वापर न केलेले सापडतील पण हा शब्द ऐकलाच नाही असा माणूस सापडणे खरोखर अवघड आहे. भारतातील फुडटेक सेक्टरमध्ये २०१८ पासून दरवर्षी सर्वाधिक डाऊनलोड केले जाणारे ऍप म्हणजे झोमॅटो. झोमॅटो ही कंपनी काय करते? तर आपला टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म वापरून वेगवेगळी रेस्टॉरंट्स, त्यांचे कस्टमर्स आणि डिलिव्हरी पार्टनर्स यांना एकमेकांशी जोडते. कस्टमर झोमॅटोचे ऍप वापरून रेस्टॉरंट शोधणे, एखाद्या रेस्टॉरंटबद्दल माहिती मिळवणे, त्याबद्दल रिव्ह्यू लिहिणे, टेबल बुक करणे, जेवण ऑर्डर करणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पैसे देणे ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात.

या सगळ्याची चर्चा करण्याचे कारण म्हणजे झोमॅटोचा येऊ घातलेला आयपीओ. या आयपीओमधून झोमॅटो ८२५० कोटी रुपये उभे करणार आहे. यापैकी ५६२६ कोटी रुपये झोमॅटोच्या व्यवसाय विस्तारासाठी वापरले जातील तर ७५० कोटी रुपये झोमॅटोमधील इन्व्हेस्टर कंपनी इन्फो एज यांना देण्यात येणाऱ्या ऑफर फॉर सेलसाठी वापरले जातील. उरलेली रक्कम कंपनीच्या इतर खर्चांसाठी वापरली जाईल.

भारतातील फुडटेकबद्दल थोडेसे

भारतात फुडटेक स्टार्टअप्सची सुरुवात अगदी २००७ मध्ये टेस्टी खाना पासून झाली जे २०१४ मध्ये बंद पडले. जस्ट इट २००८ मध्ये सुरु होऊन २०१५ मध्ये बंद पडले. त्यांनतर २०१२ मध्ये फूडपांडा सुरु झाले जे नंतर २०१७ मध्ये ओला कॅब्जने विकत घेतले आणि २०१९ मध्ये बंदही केले. ओला ने स्वतःचे ओला कॅफेसुरु केले मात्र तेही बंद पडले. ओला या क्षेत्रात उतरली म्हणून मग उबरनेही २०१७ मध्ये उबर इटस सुरु केले जे २०२० मध्ये झोमॅटोने विकत घेतले. स्कुटसीम्हणून एक कंपनी २०१४ मध्ये सुरु झाली जिला स्वीगीने विकत घेतले. जवळपास १३-१४ वर्षांच्या या सगळ्या उलथापालथीनंतर आता फक्त तीन कंपन्या उरल्या आहेत, झोमॅटो, स्वीगी आणि अमेझॉन. अमेझॉन त्यातल्या त्यात फारच नवी आहे पण त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही.

झोमॅटो तोट्यात असताना आयपीओ कसा?

या स्टार्टअप्स बद्दल बऱ्याचजणांना एक प्रश्न सतावत असतो. तो म्हणजे ह्या कंपन्या वर्षानुवर्षे तोट्यात असूनही आयपीओ कसा आणू शकतात? हे सेबीच्या नियमांना धरून आहे का? तर हो. सेबीच्या नियमानुसार जरी कंपनी लॉस मेकिंग असली तरी ती आयपीओसाठी पात्र ठरते. मात्र या आयपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सला १०% पेक्षा जास्त शेअर्स दिले जाऊ शकत नाहीत. तसेच इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सना ७५% पेक्षा कमी शेअर्स दिले जाऊ शकत नाहीत. या ७५% मधले किमान ५% शेअर्स म्युच्युअल फंडांना देणे बंधनकारक असते. त्यामुळे झोमॅटोचा आयपीओ हे सेबीच्या नियमांना धरूनच आहे.

झोमॅटो पैसा कसा कमावते?

१. झोमॅटोवरून दिल्या जाणाऱ्या ऑर्डर्स आणि त्यापोटी मिळणारे कमिशन

२. झोमॅटोच्या मोबाईल ऍपवर दिसणाऱ्या जाहिराती

३. झोमॅटो प्रो मेंबरशिप प्लॅन

४. हायपर प्युअर या बी टू बी प्लॅटफॉर्मवरून मिळणार रेव्हेन्यू

थोडक्यात सांगायचे तर झोमॅटो हे एक नेटवर्क आहे. या नेटवर्कमध्ये कस्टमर, रेस्टॉरंट्स, डिलिव्हरी पार्टनर्स हे सगळे आहेत. जेवढ्या जास्त ऑर्डर या नेटवर्कमध्ये प्रोसेस होतात तेवढाच ऑर्डर रेव्हेन्यू वाढतो. यावरून जास्तीत जास्त रेस्टॉरंट पार्टनर्सला या नेटवर्कचा भाग व्हावा असे वाटते. ते हे नेटवर्क जॉईन करतात. जेवढे जास्त रेस्टॉरंट्स तेवढे जास्त कस्टमर या नेटवर्कवर येतात आणि तेवढ्या जास्त ऑर्डर्स प्रोसेस होतात. ही जी व्हॅल्यू चेन आहे ती सतत वाढणे गरजेचे आहे. झोमॅटोला ते सध्यातरी जमले आहे असे दिसते. जर यात कुठे माशी शिंकली तर ही व्हॅल्यू चेन बिघडून होत्याचे नव्हते होऊ शकते.

आता झोमॅटोने गेल्या तीन वर्षात कशी कामगिरी केली ते बघुयात.
झोमॅटोची ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू (कोटी रुपये)

२०१८ – १३३४

२०१९ – ५३८७

२०२० – ११२२१

२०२१ आर्थिक वर्षाचे पहिले ९ महिने – ६१७०

गेल्यावर्षी लॉकडाऊन असल्याने, करोनाची भीती असल्याने, रेस्टॉरंट्स बंद असल्याने ऑर्डर्स कमी झाल्या असतील अशी शक्यता आहे.

झोमॅटोवर प्रोसेस झालेल्या ऑर्डर्सची संख्या (कोटी)

२०१८ – ३.०६

२०१९ – १९.१

२०२० – ४०.३१

२०२१ आर्थिक वर्षाचे पहिले ९ महिने – १५.५२

झोमॅटोवरील ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू (रुपये)

२०१८ – ४३६

२०१९ – २८३

२०२० – २७९

२०२१ आर्थिक वर्षाचे पहिले ९ महिने – ३९८

हे सगळं छान असलं तरी कंपनीसमोर काही आव्हानेदेखील आहेत.
१. कंपनीचा बिझनेस वाढवायचा म्हणजे कॉस्ट वाढणार आणि त्यामुळे सध्याचे लॉसेससुद्धा वाढत जाणार.
२. डिलिव्हरी पार्टनर्स, रेस्टॉरंट पार्टनर्स याना दीर्घकाळ आपल्या नेटवर्कबरोबर जोडून ठेवणे झोमॅटोला जमेल का?
३. नवे रेस्टॉरंट पार्टनर्स आपल्या नेटवर्कशी जोडणे
४. भारतातील फूड डिलिव्हरी बिझनेसमध्ये असलेली प्रचंड स्पर्धा, कस्टमरच्या बदलत जाणाऱ्या आवडीनिवडी,वर्षानुवर्षे एखाद्या हॉटेलला फोन करून जेवण ऑर्डर करणारे लोक हे सगळं बदलायचं म्हणजे एक मोठं आव्हान आहे.
५. वेगवेगळी पेमेंट ऍप्स आपल्या ऍपमधूनच जेवण ऑर्डर करण्याचा पर्याय उपलब्ध करून देत आहेत. ही झोमॅटोसाठी चिंतेची बाब ठरू शकते.
६. अमेझॉनसारखी मोठी कंपनी या व्यवसायात शिरली आहे. त्यांनी मे २०२० मध्ये बंगलोरला आपला फूड डिलिव्हरीचा पायलट प्रोजेक्ट बंगलोर शहरातील ४ पिन कोड्ससाठी राबवला. आता हा प्रोजेक्ट बंगलोरच्या ६५ पिन कोड्समध्ये विस्तारला आहे. झोमॅटो आणि स्वीगी पेक्षा अमेझॉनची डिलिव्हरी फी ३५% ने कमी आहे. प्राईम मेंबर्सला ही डिलिव्हरी फी लागत नाही. स्वीगी आणि झोमॅटोच्या तुलनेत अमेझॉनवरून जेवण ऑर्डर करणे ३५ ते ३७% स्वस्त पडते. अमेझॉनने त्यांचा बिझनेस स्केलअप करायचा ठरवला तर झोमॅटोला डोकेदुखी ठरू शकते.

झोमॅटो काय करू शकते?

यावर पर्याय म्हणून झोमॅटो आपले कमिशन कमी करणे, डिलिव्हरी चार्जेस कमी करणे, डिलिव्हरी पार्टनर्सला जास्त फी देऊ करणे यासारखे उपाय करू शकते.

याआधीच्या फंडिंग राऊंडमध्ये झोमॅटोचे व्हॅल्युएशन ५.४ बिलियन डॉलर्स एवढे झाले होते. आयपीओच्या वेळेपर्यंत आपले व्हॅल्युएशन ७ ते ९ बिलियन डॉलर्स होईल अशी कंपनीला आशा आहे.

एक आणखी मजेशीर गोष्ट इथे घडू शकते, ती म्हणजे झोमॅटो आणि स्वीगी एकमेकांत मर्ज होणे. असे का होईल? झोमॅटोमध्ये चीनच्या अलीबाबाचा स्टेक आहे तर स्वीगीमध्ये टेंसंटचा स्टेक आहे. या दोन्ही कंपन्यांनी याआधी चीनमध्ये कॅब्ज बिझनेसमध्ये आधी एकमेकांशी स्पर्धा केली आणि जेव्हा यात काही अर्थ नाही हे लक्षात आले तेव्हा दोन्ही कंपन्या एकत्र आल्या. त्यापुढे जाऊन आपला मार्केट शेअर वाढवण्यासाठी त्यांनी उबरचा चीनमधील बिझनेस विकत घेतला. म्हणजे जवळपास स्पर्धा संपवून टाकली. भारतात स्वीगी आणि झोमॅटोच्या बाबतीत हेच होऊ शकते. आता या कंपन्या एकत्र येणार की कसे हे येणारा काळच सांगू शकेल.

Comments are closed.