रिकव्हरी थीमचा दावेदार – इंडियन हॉटेल्स

Best Recovery stock after lifting pandemic restrictions

गेल्या दीड वर्षांपासून करोनामुळे हॉटेल इंडस्ट्रीवर बराच परिणाम झाला. लॉकडाऊनमुळे प्रवासावर निर्बंध आल्याने हॉटेल्सला त्याचा तोटा झाला. गेल्यावर्षी ऑगस्टनंतर काही प्रमाणात निर्बंध शिथील झाले तरी करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रिकव्हर होत असलेल्या व्यवसायावर पुन्हा एकदा परिणाम झाला. या सगळ्यामुळे सगळ्याच हॉटेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये पडझड झालेली दिसली. आता देशभरात होत असलेले लसीकरण, शिथील होत असलेले निर्बंध या घटकांचा परिणाम हॉटेल स्टॉकच्या रिकव्हर होण्यावर होताना दिसतो आहे. या रिकव्हरी थीममध्ये गुंतवणुकीसाठी योग्य ठरू शकेल असा एक स्टॉक म्हणजे इंडियन हॉटेल्स.

गेल्या दोन महिन्यात कंपनीने आपल्या व्यवसायात चांगली वाढ नोंदवली आहे. कंपनीकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार एकूण हॉटेल्सपैकी ४०% हॉटेल्सनी कोव्हीड पूर्वीचा रेव्हेन्यू नोंदवला आहे. करोनाची साथ एकदा ओसरली की या कामगिरीत आणखी सुधारणा होऊ शकते. २०२२ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने ३४४.६ कोटींचा महसूल नोंदवला.  गेल्यावर्षी हाच आकडा १४३ कोटींच्या घरात होता. अर्थात त्यावेळी करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती जास्त गंभीर होती, निर्बंध जास्त कडक होते.

कंपनीच्या लेजर सेगमेंटने चांगली रिकव्हरी नोंदवली आहे. आता बऱ्याच राज्यात शिथील होणाऱ्या निर्बंधाचा विचार करता बिझनेस आणि कार्पोरेट ट्रॅव्हलदेखील वाढू लागेल. कंपनीला याचाही चांगला फायदा होऊ शकेल.
याबरोबरच कंपनीने गेल्या वर्षी Q-Min हे फूड डिलिव्हरी ऍपदेखील लाँच केले. देशभरात असलेल्या निर्बंधामुळे लोक हॉटेलमधून जेवण ऑर्डर करत होते. याचा फायदा घेत थेट ताजसारख्या नामांकित ब्रँडच्या हॉटेल्समधून जेवण ऑर्डर करता यावे यासाठी कंपनीने हे ऍप लाँच केले होते. जून २०२० मध्ये लाँच केल्यापासून आता कंपनीने या ऍपचा आवाका १८ शहरे आणि ३५ हॉटेल्सपर्यंत वाढवला आहे. २०२२ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या ऍपने कंपनीला ३० कोटींचा महसूल मिळवून दिला. कंपनीच्या एकूण महसुलापैकी हा महसूल ९% एवढा आहे. येणाऱ्या काही वर्षात Q-Min कडून मिळणार महसूल ५०० कोटींपर्यंत वाढविण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

याबरोबरच इंडियन हॉटेल्सचा ‘अमा ट्रेल्स’ नावानेदेखील बिझनेस आहे. यामध्ये ग्राहक आलिशान बंगल्यामध्ये राहू शकतात. इंडियन हॉटेल्ससध्या असे ४४ बंगले बांधत आहे. येणाऱ्या काळात एकूण बंगल्यांची संख्या ५०० च्या घरात नेण्याचे कंपनीचे नियोजन आहे. हा बिझनेस सेगमेंट येणाऱ्या कंपनीला चांगला महसूल मिळवून देईल असा कंपनी व्यवस्थापनाला विश्वास आहे.

बिझनेसमध्ये रिकव्हरी होत असताना इंडियन हॉटेल्स आपल्या मॅनपॉवरमध्ये आणि कार्पोरेट ओव्हरहेड्समध्ये घट करत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कंपनीने आपले कार्पोरेट ओव्हरहेड्स जवळपास १२% ने कमी केलेले आहेत.
एका बाजूला महसुलात वाढ, खर्चात कपात असे धोरण असताना कंपनीच्या डेटमध्ये मात्र वाढ होते आहे. मार्च २०२१ मध्ये कंपनीचे डेट ३१०० कोटी होते. ते आता जून २०२१ च्या आकडेवारीनुसार ३६०० कोटी झाले आहे. मात्र हे डेट वाढण्यासाठी कंपनीने डेट इश्युअन्सद्वारे केलेली निधीची ऊभारणी हे प्रमुख कारण आहे. कंपनीचा डेट टू इक्विटी रेशोदेखील १ पेक्षा जास्त आहे. येत्या काळात आणखी निधी उभारणी करण्याचे कंपनीचे नियोजन आहे ज्याद्वारे हा रेशो १ पेक्षा कमी करण्यासाठी मदत होऊ शकेल. नुकतीच कंपनीच्या बोर्डाने २५० कोटींपर्यंतच्या निधी उभारणीसाठी परवानगी दिली आहे.

कंपनीचे एकूण ४०% स्टेक प्रमोटर्सकडे आहेत आणि यातले ०% शेअर्स प्लेज केलेले आहेत. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या दोघांचे कंपनीत प्रत्येकी १.०५% स्टेक्स आहेत.

टेक्निकली स्टॉक ऑल टाईम हायच्या खूप जवळ आहे. या ठिकाणी स्टॉकला काही प्रमाणात रेझिस्टंसचा सामना करावा लागत आहे. जर स्टॉकने हा टप्पा पार केला तर येत्या काळात चांगली अप मुव्ह पहायला मिळू शकते.

देशभरात आणि जगभरात वेगाने होते असलेले लसीकरण, कमी होते चाललेले निर्बंध, पूर्वपदावर येत असलेला ट्रॅव्हल अँड टुरिझम बिझनेस या सगळ्या गोष्टींचा विचार करता सध्या १३८ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर येणाऱ्या दीड दोन वर्षांत चांगला परतावा देऊ शकेल.

Comments are closed.