काय आहे नेमका ‘गतीशक्ती’ प्लॅन? ज्यासाठी भारतीय रेल्वे खर्च करणार तब्बल 50000 कोटी

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 14 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनूसार,भारतीय रेल्वेने पुढील पाच वर्षांत पीएम गती शक्ती (Gati Shakti Plan) कार्यक्रमांतर्गत 500 मल्टी-मोडल कार्गो टर्मिनल विकसित करण्यासाठी 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

“भारतीय रेल्वे 4-5 वर्षांच्या कालावधीत पीएम गती शक्ती कार्यक्रमाअंतर्गत किमान 500 मल्टी-मोडल कार्गो टर्मिनल निर्माण करेल.” असे ते म्हणाले. मल्टी-मोडल टर्मिनल कोळसा, स्टील, ऍल्युममिनियम इत्यादी बल्क कार्गो उत्पादनांच्या वाहतुकीवर भर देतील. याशिवाय भारतीय रेल्वे पार्सल वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र सुविधा उभारेल. हा प्रकल्प लोकांच्या, वस्तूंच्या आणि सेवांच्या वाहतुकीसाठी सुसह्य आणि सुटसुटीत पर्याय उपलब्ध करेल. यामुळे लोकांचा वेळ देखील वाचवेल. नवीन मल्टी-मोडल टर्मिनल भारतातील मालवाहतूक खर्च कमी करण्यास मदत करतील आणि राष्ट्रीय हाय-स्पीड रेल नेटवर्कशी जोडले जातील असेही त्यांनी सांगितले.

पुढील तीन वर्षात सरकार 200 मल्टी-मोडल कार्गो टर्मिनल तयार करण्याची योजना आखत आहे आणि प्रत्येक टर्मिनलमध्ये सुमारे 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे वैष्णव म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑक्टोबर रोजी भारतात पायाभूत सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने मल्टी मोडल कनेक्टिव्हिटीसाठी 100 लाख कोटी रुपयांचा पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन लाँच केला होता.

या योजनेमध्ये 16 केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या सर्व विद्यमान आणि नियोजित पायाभूत सुविधा उपक्रमांचा समावेश असेल. केंद्रीय रेल्वे मंत्री असेही म्हणाले की, सध्याच्या कोळशाच्या संकटाच्या दरम्यान भारतीय रेल्वेने चोवीस तास कोळसा वीजनिर्मिती केंद्रांमध्ये वाहून नेण्याची व्यवस्था केली आहे.

Comments are closed.