तब्बल १९ वर्षांनंतर ब्रेकआऊट दिलेला ‘हा’ शेअर तीन आकडी टप्पा गाठणार का?

बाजारात गेल्या दोन तीन दिवसांपासून एका स्मॉल कॅप शेअरचा बोलबाला आहे. हा शेअर म्हणजे मोरपेन लॅब.  १९८४ साली स्थापन झालेली मोरपेन लॅबोरेटरीज ही कंपनी अचानक एवढी चर्चेत का आली? त्याला काय कारणे आहेत?

सगळ्यात पहिले कारण म्हणजे मोरपेन लॅबचे मागील एका आठवड्यात १५२ मिलियन एवढे शेअर्स ट्रेड झाले.म्हणजेच एवढ्या शेअर्सची देवाण घेवाण झाली आहे. दुसरे कारण म्हणजे कंपनीमध्ये स्वित्झर्लंडच्या कॉरिंथ ग्रुपने जवळपास ७५० कोटीची गुंतवणूक केली आहे.

या दोन बातम्यांचा परिणाम शेअरच्या किमतीवर दिसला. या शेअरने तब्बल १९ वर्षानंतर ५० रुपयांचा टप्पा पार करत आता ब्रेकआऊट दिला आहे.

मोरपेन लॅबचे प्रॉडक्ट्स नक्की काय आहेत?१९ वर्षानंतर असे काय घडले ज्यामुळे कंपनीचा शेअर थेट ५० रुपयांच्या वर आला आहे? याबद्दल आपण थोडे जाणून घेऊ.

कंपनीचे  प्रॉडक्ट्स – कंपनी तीन वेगवेगळ्या व्हर्टीकल्स आपले प्रॉडक्ट्स विकते.

१. बल्क ड्रग्ज (API) – अँटी डायबेटीस, अँटीकॅन्सर, अँटीव्हायरल
२. डायग्नोस्टिक डिव्हाईस – ऑक्सीमीटर, बीपी मॉनिटर, ग्लुकोज मीटर, नेब्युलायझर
३. फिनिश्ड डोसेज – ब्रँडेड आणि जेनेरिक ड्रग डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रिब्युशन आणि मार्केटिंग

 

याबरोबरच डॉ. मोरपेन नावाने कंपनीची सब्सिडीअरीसुद्धा आहे.  भारतातल्या जवळपास प्रत्येक घरात या कंपनीचे बरनॉल हे प्रॉडक्ट वापरले जात असावे. बरनॉल जवळपास ७० वर्षे जुने प्रॉडक्ट आहे आजही मार्केट लीडर आहे.

 

कंपनीकडे अमेरिका, युरोप, जपान, चीन, तैवान आणि ऑस्ट्रेलियामध्ये १२० डीएमएफची (ड्रग मास्टर फाईल) आणि १० आयडीएल (इम्पोर्ट ड्रग लायसेन्स) आहेत. तसेच कंपनीने २०२१ या वर्षात ३० नवीन प्रॉडक्ट्स लाँच केली आहेत. कंपनीच्या नावावर १२९ पेटंट सुद्धा आहेत.
सरकारने एपीआय ( अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स ) विस्तार योजनांना पाठिंबा देत कामगिरीवर आधारित कंपन्यांसाठी नवीन योजना देखील जाहीर केली आहे. याच योजनेचा फायदा घेत कंपनीने  22 वर्षानंतर आपला एपीआय प्रॉडक्ट पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेत नवीन प्लँट उभारण्याचे काम चालू केले आहे. या प्लँटसाठी अंदाजे  १७८ कोटी एवढा खर्च येणार असून त्याची उत्पादन क्षमता २००० मिलियन टन्स एवढी असेल. हा प्लँट ३ वर्षांमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

तसेच या कंपनीने आता नवीन मॉलेक्युल आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करत जागतिक स्तरावर ॲक्टिव फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्सच्या (एपीआय) बिझनेस मध्ये आपले लक्ष वळवले आहे. नवीन मॉलेक्युलची मदत मधुमेह, अँटी-हायपरटेन्सिव्ह, कोलेस्टेरॉल कमी करणारे आणि न्यूरो-सायकायट्रिक या रोगांवरील औषधांसाठी होणार आहे. या मोलेक्युलवरसुद्धा विविध प्रयोग होत आहेत आणि ते पुढील २४ ते ३६ महिन्यांमध्ये वापरात येतील.

 

कंपनीचा एपीआय व्हर्टिकल अतिशय यशस्वी ठरताना दिसतो आहे. या व्हर्टिकलचा गेल्या वर्षीचा एकूण महसूल ४७३.९५ कोटी होता. यावर्षीच्या ९ महिन्यांतच कंपनीने ५११.७१ कोटींचा महसूल नोंदवला आहे. याच व्हर्टिकलचा जवळपास ७०% महसूल निर्यातीतून मिळतो आहे ही लक्षात घेण्याजोगी बाब आहे. भारताबाहेर अमेरिका, युरोप, दक्षिण अमेरिका, आफ्रिका या सगळ्या भागांत एपीआय बिझनेसने २४% ते ५९% एवढी वाढ नोंदवली आहे.

 

डायग्नोस्टिक डिव्हायसेस व्हर्टीकलनेसुद्धा या वर्षात चांगली कामगिरी केली आहे. एपीआय व्हर्टिकलप्रमाणे याही व्हर्टीकलने यावर्षीच्या ९ महिन्यांतच २२४.५ कोटींचा महसूल नोंदवला आहे जो गेल्या पूर्ण वर्षाच्या महसुलापेक्षा जास्त आहे. करोनामुळे कंपनीच्या ग्लुकोज मीटर (९९%), बीपी मीटर्स (२१०%), थर्मामीटर (४५%) या प्रॉडक्ट्सच्या विक्रीत मोठी वाढ झाली.
डॉ. मोरपेन या कंपनीच्या सब्सिडीअरीनेसुद्धा या वर्षाच्या ९ महिन्यांत ६३.१६ कोटींचा महसूल नोंदवत गेल्या पूर्ण वर्षाच्या महसुलाशी बरोबरी केली आहे.

२०२१ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा १२०% ने वाढला (१०.८२ कोटी ते २३.८० कोटी) आहे. याच काळात कंपनीचा महसूल ३२% ने वाढला (२३४.६६ कोटी ते ३१०.२६ कोटी) आहे. कंपनीच्या एकूण महसुलापैकी ६१% एपीआय, २७% डायग्नोस्टिक डिव्हायसेस आणि १२% हा फॉर्म्युलेशन बिझनेसमधून मिळतो.

 

आता याच शेअरचा टेक्निकल ॲनालिसीस बघू.

या कंपनीचा चार्ट पाहताना असे लक्षात येते की कंपनीच्या शेअरने सप्टेंबर २००२ नंतर एकदा पण ४५ रुपयांचा  टप्पा पार केला नव्हता.  त्यामुळे ४५ हा आकडा एक प्रकारे रेझिस्टन्स म्हणून काम करत होता. पण एप्रिल २०२१ मध्ये शेअरने ४५ चा टप्पा ओलांडत १९ वर्षांनंतर ब्रेकआऊट दिला आहे. तसेच ज्या दिवशी ब्रेकआऊट झाला त्या दिवसाचा व्हॉल्युम ५ कोटीपेक्षा जास्त असल्याने हा ब्रेक आऊट सुद्धा फेल जाण्याची शक्यता कमी आहे. तसेच आज या शेअरची मंथली क्लोजिंग ६५ रुपयांवर झाली आहे जी ४५ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा शेअर तीन आकडी किंमतीचा टप्पा गाठू शकतो. या शेअरचा ऑल टाइम हाय २२२ रुपये आहे.

 

कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल ५ मे २०२१ ला जाहीर होणार आहेत. त्यानंतर या शेअरची वाटचाल कशी राहील याबद्दल वेळोवेळी तुम्हाला पैसापाणीवर माहिती मिळेलच.

Comments are closed.