कहर! मुंबई इंडियन्सचे ‘हे’ खेळाडू केवळ ५२ दिवसांत कमावतात करोडो रुपये

भारतीय क्रिकेट संघाने २००७ साली झालेला पहिला वहिला टी२० विश्वचषक जिंकला आणि भारतात टी२० क्रिकेटचे वारे वाहू लागले. या विश्वचषकानंतर केवळ १ वर्षांच्या आतच इंडियन प्रीमीयर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली. साल २००८ पासून होत असलेल्या या स्पर्धेचे १३ हंगाम पूर्ण झाले आहेत. तर १४वा हंगाम सध्या सुरु आहे. गेल्या १३ वर्षांत आयपीएलने खूप मोठी प्रगती केली आहे. आज आयपीएल जगात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून प्रसिद्ध आहे. या आयपीएलने अनेक खेळाडूंना एका रात्रीत करोडपती केले आहे.

साल २०१९-२० च्या एका रिपोर्टप्रमाणे एका आयपीएल हंगामात जवळपास ४९०० कोटी महसूल जमा होते. तसेच आयपीएलच्या एका हंगामात जवळपास ६० सामने होतात. म्हणजेच एका सामन्याचा महसूल साधारण ८१ कोटी रुपये एवढा होतो.

अशा या जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये सर्वात श्रीमंत संघ जर कोणता असेल तर तो आहे मुंबई इंडियन्स. या संघाची ब्रॅंड व्हल्यू ७६१ कोटी रुपये इतकी आहे. ही ब्रॅंड व्हॅल्यू २०२० सालची आहे. २०१९ साली या संघांचे व्हॅल्युएशन यापेक्षा जास्त होते. अशा या श्रीमंत लीगमधील श्रीमंत संघातील सर्वात मोठ्या खेळाडूचे मानधन ऐकून कुणालाही नक्कीच धक्का बसेल. क्रिकेटप्रेमींना तो मोठा खेळाडू नक्कीच माहित आहे. होय, मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा खेळाडू रोहित शर्मा असून तो आयपीएलच्या एका हंगामाचे तब्बल १५ कोटी घेतो. वर्ष २०२०च्या आकडेवारीनुसार रोहित आयपीएलमध्ये धोनीपाठोपाठ सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू होता.

रोहित कर्णधार असलेला मुंबई इंडियन्स खेळाडूंच्या मानधनावर २०२१ वर्षात ८१ कोटी रुपये खर्च करणार आहे. यातील १५ कोटी एकट्या रोहितच्या वाट्याला येणार आहे. याच संघात दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे हार्दिक पंड्या. हा अष्टपैलू खेळाडू २०२१ हंगामात ११ कोटी रुपये घरी घेऊन जाणार असून त्याचाच सख्खा भाऊ कृणाल पंड्या हा मुंबईचा तिसरा महागडा खेळाडू आहे. कृणाल या हंगामात ८ कोटी ८० लाख रुपये मानधन घेणार आहे. अगदीच गमतीने सांगायचं झालं तर यावर्षी शर्मांच्या घरी येणाऱ्या पैशांपेक्षा पंड्यां बंधूंच्या घरी जास्त रुपये येणार आहेत. असे असले तरी मानधनाची तुलना केली तर आयपीएलमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हार्दिक ३४वा तर कृणाल ४१वा आहे.

गमतीचा भाग म्हणजे मुंबई इंडियन्स २००८ साली खेळाडूंच्या मानधनावर २४ कोटी रुपये खर्च करत होती. तर ही रक्कम २०२०मध्ये ८४ कोटींवर गेली होती. परंतू कोरोनामुळे यावर्षी मुंबईने जवळपास ३ कोटी रुपये खेळाडूंच्या मानधनावर कमी खर्च करायचे ठरवले आहे. केवळ २०१५ व २०१७मध्ये मुंबईने खेळाडूंच्या मानधनावरील खर्च हा आधीच्या वर्षापेक्षा कमी केला होता. विशेष म्हणजे या दोनही वर्षी मुंबईने विजेतेपद जिंकले होते.

२०१३ साली मुंबईने पहिल्यांदा विजेतेपद जिंकले तेव्हा रोहितचे मानधन (९ कोटी २० लाख) हे संघातील सर्वात सिनीयर खेळाडू सचिन तेंडूलकरपेक्षाही (८ कोटी २८ लाख) जास्त होते. २०१५ साली मुंबईने दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकली, तेव्हा रोहितचे मानधन हे १२ कोटी ५० लाख तर कायरन पोलार्डचे मानधन हे ९ कोटी ५० लाख होते. आताच्या हंगामात पोलार्ड ५ कोटी ४० लाख रुपयांत खेळत आहे. तिसऱ्यांदा जेव्हा मुंबई इंडियन्स आयपीएल विजेती ठरली तेव्हाही रोहित पोलार्डच्या मानधनात वाढ करण्यात आली नव्हती.

जेव्हा २०१९ साली मुंबईने चौथे विजेतेपद जिंकले तेव्हाही सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू होता रोहित, व मानधन होते १५ कोटी. दुसऱ्या क्रमांकावर मात्र पहिल्यांदाच रोहितपाठोपाठ १० कोटींपेक्षा जास्त मानधन घेणारा खेळाडू पोहचला होता व तो होता हार्दिक पंड्या.या हंगामात हार्दिकसाठी मुंबईने तब्बल ११ कोटी रुपये मोजले होते.

२०२०मध्ये दुबईत जेव्हा हा संघ पाचव्यांदा आयपीएल विजेते ठरला तेव्हा रोहितचे मानधन हे १५ कोटी तर हार्दिकचे मानधन ११ कोटी १० लाख रुपये होते. आतापर्यंत मुंबईकडून १० कोटींपेक्षा जास्त मानधन घेणारे केवळ रोहित व हार्दिक हे दोनच खेळाडू आहेत. रोहितने २०१४पासून सगल ८ वर्ष तर हार्दिकने २०१८पासून सलग ४ वर्ष १० कोटींपेक्षा अधिक मानधन घेतले आहे.

मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंची यादी
१५ कोटी- रोहित शर्मा
११ कोटी- हार्दिक पंड्या
८ कोटी ८० लाख- कृणाल पंड्या
७ कोटी- जसप्रीत बुमराह
६ कोटी २० लाख- इशान किशन
५ कोटी ४० लाख- कायरन पोलार्ड
५ कोटी- नॅथन कुल्टर नाईल
३ कोटी २० लाख- ट्रेंट बोल्ट
३ कोटी २० लाख- ऍडम माईल्स
३ कोटी २० लाख- सुर्यकुमार यादव
२ कोटी ८० लाख- क्विंटन डिकॉक
२ कोटी ४० लाख- पियुष चावला
२ कोटी- ख्रिस लीन
१ कोटी ९० लाख- राहुल चहर
अन्य ११ खेळाडूंचा हंगामाचे मानधन हे २० लाख ते ८० लाखांदरम्यान आहे. यात २० लाख मानधनासह अर्जुन तेंडूलकरचाही समावेश आहे.

Comments are closed.