झायडसची लस आली, पण किंमत किती असेल?

Zydus will be launching it's vaccine for Covid-19 which will be the fourth Covid vaccine in India

भारतात कोवीड लसीकरणासाठी तीन कंपन्यांच्या लसींना परवानगी देण्यात आली आहे. आता यात अजून आणखी एका लसीची भर पडणार आहे. भारतातील नामांकित फार्मा कंपनीच झायडस कॅडिला आपली लस घेऊन येत आहे. झायडस कॅडीलाची लस पुढच्या महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र या लशीची किंमत कोविशील्डपेक्षा जास्त असू शकते. कंपनी आणि सरकार सध्या ZyCoV-D या जगातील पहिली डीएनए लसीबाबत चर्चा करत आहेत आणि किंमतींवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

“झायडस लसीची किंमत आधी मंजूर केलेल्या लसींच्या किंमतीदरम्यान असेल. परंतु डीएनए लसींमध्ये उत्पादन खर्च जास्त असल्याने झायडसची किंमत कोविशील्डपेक्षा थोडी जास्त असू शकते.” असे कंपनीशी निगडीत एका व्यक्तीने सांगितले. भारतीय औषध नियमकाने २० ऑगस्ट रोजी तीन डोस असलेल्या कोविड-१९ लसीला आपत्कालीन वापरासाठी अप्रूव्हल दिले होते. भारतातील १२ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्वांना ही लस दिली जाऊ शकते. सरकारने मुलांसाठी झायडस लसीचा एक मोठा साठा उपलब्ध करणे अपेक्षित आहे.

सरकार कोवीशील्ड १५७.५० आणि कोव्हॅक्सिन २२५.७५ प्रति डोस दराने खरेदी करत आहे.

“झायडसला कदाचित कोविशील्ड सारखे व्हॉल्युम मिळणार नाही. डीएनए लसींची निर्मिती ही एक जटिल, वेळ घेणारी प्रक्रिया आहे.” किंमतीवर निर्णय घेताना हे सर्व घटक लक्षात ठेवावे लागतील असे एका व्यक्तीकडून सांगण्यात आले.

खाजगी केंद्रांवर प्रत्येकी एका डोससाठी कोविशील्डची किंमत ७८० रू, कॉव्हॅक्सीनची किंमत १४१० रू आणि स्पुटनिक ११४५ रू मध्ये उपलब्ध आहे. झायडसचे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल यांनी म्हटले आहे की, “परवडण्यायोग्य किंमत हा आमचा बेंचमार्क असेल. तथापि, तंत्रज्ञान, क्षमता आणि व्हॉल्युम हे देखील किंमत ठरवण्यासाठी मुख्य घटक असतील.”

पटेल यांनी म्हटले आहे की कंपनी ऑक्टोबरपर्यंत १० मिलीयन डोस आणि जानेवारी २०२२ पर्यंत ४०-५० मिलीयन डोस तयार करू शकते. झायडसने बायोटेक्नॉलॉजी विभाग (DBT) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्या सहकार्याने  ZyCov-D विकसित केले. १२-१८ वयोगटातील जवळजवळ १००० सह २८००० पेक्षा जास्त स्वयंसेवकांवरील अभ्यासात या लशीची  ६६.६% परिणामकारकता असल्याचे दिसून आले आहे. तीन डोस २८ दिवसांच्या अंतराने द्यावे लागतील, त्यामुळे लसीकरण दोन महिन्यांत पूर्ण होईल. कोविशील्ड लसीच्या दोन डोस दरम्यान किमान अंतर सध्या भारतात ८४ दिवस आहे.

Comments are closed.