भारतात आलाय युनिकॉर्नचा पूर, ‘ही’ कंपनी बनली या वर्षातील 34 वी युनिकॉर्न
The latest fundraiser valued the firm at $1.1 billion making it 34th Unicorn from India in 2021
डिजिटल इंश्युरन्स कंपनी Acko जनरल इन्शुरन्सने 28 ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनूसार, त्यांनी जनरल अटलांटिक आणि मल्टीपल्स प्रायव्हेट इक्विटीच्या नेतृत्वाखालील सीरिज D राऊंडमध्ये 255 मिलियन डॉलरचा निधी उभा केला आहे. या फंडिंग राऊंडसाठी कंपनीचे मूल्यांकन 1.1 अब्ज डॉलर एवढे करण्यात आले होते. याबरोबरच 2021 मध्ये युनिकॉर्न बनणारी ही भारतातील 34 वी कंपनी ठरली.
कोणतीही खाजगी कंपनी जिचे व्हॅल्युएशन 1 अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिक असते तिला युनिकॉर्न म्हटले जाते. या राऊंडमध्ये कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड आणि लाइटस्पीड तसेच विद्यमान गुंतवणूकदार इंटॅक्ट व्हेंचर्स आणि म्युनिक आरई व्हेंचर्स यांचाही सहभाग होता. Acko ने आजतागायत एकूण 450 मिलियन डॉलरचा निधी उभारला आहे.
हेल्थकेअर व्हर्टिकलमध्ये कंपनी आणखी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. विशेषत: तंत्रज्ञान, उत्पादन आणि डेटा सायन्समध्ये आपली टीम वाढवण्याचा मानस असल्याचे कंपनीने म्हटले आहे. Acko चे संस्थापक आणि सीईओ वरुण दुआ म्हणाले, “आम्ही आमच्या प्रमुख वाहन विमा व्यवसायात वाढ आणि नवनिर्मिती सुरु ठेवू. भविष्यात हेल्थकेअर सेक्टरमध्ये 150 मिलियन डॉलरहून अधिक गुंतवणूक करण्याचा आमचा मानस आहे.”
वरून दुआ आणि रुची दीपक यांनी 2016 मध्ये स्थापन केलेल्या, Acko चे 70 मिलियन ग्राहक आहेत. कंपनीने मागील वर्षी हेल्थ इंश्युरन्स सेक्टरमध्ये प्रवेश केला. पुढील वर्षाच्या सुरुवातीस कंपनी रिटेल ग्राहकांसाठी हेल्थ इंश्युरन्स सुरु करणार आहे. शंतनू रस्तोगी, जनरल अटलांटिकचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, “Acko ने ग्राहक केंद्रित, मूल्य-आधारित किंमत, उच्च दर्जाची सेवा आणि सखोल तंत्रज्ञान क्षमतांवर आधारित एक वेगळे आणि व्यवसाय आधारित मॉडेल विकसित केले आहे. पुढील दशकात ही फर्म एक महत्त्वपूर्ण फर्म म्हणून उदयास येऊ शकते.”
सध्या केवळ 4.2 टक्के भारतीयांकडे विमा पॉलिसी उपलब्ध आहे. FY21 साठी, इंडियन ब्रँड इक्विटी फाऊंडेशन (IBEF) ने इन्शुरन्स पेनेट्रेशन 3.2 टक्के आणि नॉन-लाइफ इन्शुरन्स पेनिट्रेशन 1 टक्के असेल असा अंदाज लावला आहे. कोविडने विमा क्षेत्राला चालना दिली आहे. यामुळे भारतीयांना आरोग्य आणि जीवन विमा उत्पादने खरेदी करण्यास प्रवृत्त केले आहे. इन्सुरटेक सेक्टरमध्ये पॉलिसीबाझार, पेटीएम, डिजीट, टर्टलमिंट, टॉफी इन्शुरन्स, प्लम यासारख्या इतर मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
Comments are closed.