दुसऱ्या लाटेचा इथेही परिणाम, डीलर्सने थेट सरकारला घातलं साकडं 

FADA has written to Nirmala Sitharaman and Shaktikanta Das seeking for government help

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सबंध देशात चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम उद्योगधंद्यांच्या आर्थिक गाडयावरसुद्धा होताना दिसतोय. आता फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) यांनी थेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांना साकडे घातले आहे.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे एकूण १५००० सदस्य असून त्यांच्या देशभरात २५००० हून अधिक वेगवेगळ्या डिलरशिप आहेत. या फेडरेशनने अर्थमंत्री आणि गव्हर्नर यांना पत्र लिहून जीएसटी रिटर्न्स फाईल करण्यातही तीन महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे.

या मागणीसोबतच असोसिएशनने आणखी एक मागणी केली आहे. प्रत्येक राज्यात जितके दिवस लॉकडाऊन होता तितके दिवस लोन मोरॅटोरियम देण्यात यावे असे त्यांनी म्हटले आहे. ही मागणी टर्म लोन, शॉर्ट टर्म लोन, कार्पोरेट लोन, कॅश क्रेडिट लाईन्स अशा लोन्सला लागू करावे अशी विनंती फेडरेशनने केली आहे. याबरोबरच सर्व लोनचा इंटरेस्ट रेट ९० दिवसांसाठी ४०० बेसिस पॉईंट्सने कमी करावा अशीही विनंती करण्यात आली आहे.

या मागण्यांवर त्वरित पावले न उचलल्यास अनेक डीलर्सला नुकसान सहन करावे लागू शकते. यातील अनेक डिलरशिप या कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरी तसेच ग्रामीण भागातही गाड्यांची मागणी कमी झाली आहे. मार्च २०२१ च्या १६,४९,६७८ गाड्यांच्या तुलनेत एप्रिल २०२१ मध्ये फक्त ११,८५, ३७४ गाड्यांची नोंदणी झाली. ही जवळपास ३०% ची घट आहे. याचा परिणाम निश्चितच डीलर्सवर होतो आहे.

Comments are closed.