बिग बुलने टायटन विकला…पण काळजीचे कारण नाही

Rakesh Jhunjhunwala has sold Titan Company shares worth Rs 384 crore

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी सलग तिसऱ्या तिमाहीत घड्याळे आणि ज्वेलरी बनवणारी कंपनी टायटनमधील आपला हिस्सा कमी केला. मात्र अनेक ब्रोकर्सच्या मते हे काळजी करण्याचे कारण नाही. 2021-22 च्या उर्वरित काळात कोविडच्या दुसर्‍या लाटेनंतर होणाऱ्या रिकव्हरीचा फायदा टायटनला होऊ शकेल असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

झुनझुनवाला यांनी जून तिमाहीत टायटनचे 22.50 लाख शेअर्स विकले. तरीही, टायटन हे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वात जास्त वाटा असलेले होल्डिंग आहे. त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी तशीच (96.40 लाख शेअर्स) असून, एकत्रितपणे, त्यांच्याकडे 4.26 कोटी शेअर्स आहेत.

जून तिमाहीत, टायटनने देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव असूनही उत्पन्नात 74.5 टक्क्यांची वाढ नोंदवली. ब्रोकरेज कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने स्टॉकसाठी टारगेट प्राईज14 टक्क्यांनी वाढवून 1,860 रुपये केले आहे आणि ‘अॅड’ रेटिंग कायम ठेवली आहे.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने या शेअरचा 2,065 रुपयांची टारगेट प्राईज दिली आहे आणि शेअरसाठी ‘बाय’ कॉल कायम ठेवला.

विश्लेषकांना अशी अपेक्षा आहे की कंपनीचा मार्केट शेअर यापुढे असाच राहील. अलीकडेच सरकारने सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. जूनपासून लागू केलेल्या या निर्णयामुळे अनऑरगनाईझड प्लेअर्सवर आणखी दबाव येईल. याचाच नेमका फायदा मोठ्या कंपन्यांना होऊ शकेल.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे की अनिवार्य हॉलमार्किंगमुळे दागिन्यांच्या ब्रॅण्डला, ज्यादा ब्रँड प्रीमियम आकारण्यासाठी एक संधी प्राप्त होईल.

ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने मात्र या स्टॉकला ‘सेल’ रेटिंग दिले आहे, त्यांनी जून तिमाहीच्या आकडेवारीनुसार स्टॉकसाठी 1500 रुपये टार्गेट दिले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव असूनही,गेल्या सहा महिन्यांत कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांनी वाढले आहेत. विश्लेषकांचे असे मत आहे की स्टॉकचा हा परफॉर्मन्स असाच टिकून राहू शकतो.

Comments are closed.