कोविड महामारीत देखील भारताच्या अब्जाधीशांच्या यादीत झाली चांगलीच वाढ!

२०२० मधील कोविड महामारीत ४० भारतीयांनी अब्जाधीशांच्या यादीत प्रवेश केला आहे. या यादीमध्ये आता एकूण भारतीयांची संख्या १७७ वर गेली आहे.

मुकेश अंबानी यांची संपत्ती ८३ अब्ज डॉलर्स असून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ति म्हणून आपल्या जागी कायम आहेत. ह्यरून ग्लोबल रिच लिस्टनुसार अंबानींच्या संपत्तीत २४% वाढ झाली आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एक स्थान वर झेप घेत आठव्या स्थानी विराजमान झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत संपत्तीत कमालीची वाढ करणाऱ्या गुजरातमधील गौतम अदानी यांची संपत्ती २०२० मध्ये जवळजवळ दुप्पट होऊन ३२ अब्ज डॉलर्स इतकी झाली. यासोबतच ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ४८ व्या स्थानी येऊन पोचलेत आणि सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये २ ऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा भाऊ विनोद यांची संपत्ती १२८% वाढून ९.८ अब्ज डॉलर झाली आहे.

आयटी कंपनी एचसीएलचे शिव नादर तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत आणि त्यांची संपत्ति २७ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

सॉफ्टवेअर कंपनी झेकेलेरचे जय चौधरी यांची संपत्ती २७४ टक्क्यांनी वाढून १३ अब्ज डॉलर्स झाली, तर बायजू रवींद्रन आणि कुटुंबीयांची संपत्ती १०० टक्क्यांनी वाढून २.८ अब्ज डॉलर झाली, असे ह्यरून ग्लोबल रिचच्या अहवालात म्हटले आहे.

महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा आणि कुटुंबीयांची संपत्ती १००% वाढून २.४ अब्ज डॉलर झाली आहे, तर पतंजली आयुर्वेदचे आचार्य बालकृष्ण यांची संपत्ति ३२ टक्क्यांनी कमी होऊन ३.६ अब्ज डॉलर्स झाली आहे.

भारतीय अब्जाधीशांमध्ये १७७ पैकी ६० मुंबई मधले असून, नवी दिल्ली मधले ४० आणि बंगळुरु मध्ये २२ अश्या शहरांमध्ये सर्वाधिक अब्जाधीश आहेत.

महिला उद्योजकांमध्ये, बायोकॉनच्या किरण मजूमदार शॉ या ४.८ अब्ज डॉलर्स इतक्या संपत्ती सोबत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीत ४१% वाढ झालेली आहे. गोदरेजच्या स्मिता व्ही. कृष्णा ४.७ अब्ज डॉलर्स सोबत २ ऱ्या क्रमांकावर आहेत तर लूपिनच्या मंजू गुप्ता ३.३ अब्ज डॉलर्स इतक्या संपत्ती सोबत ३ ऱ्या स्थानी विराजमान आहेत.

जागतिक स्तरावर या यादीचे नेतृत्व टेस्लाचे एलॉन मस्क करतात ज्यांची संपत्ती १९७ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांच्यानंतर अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस १८९ अब्ज डॉलर्स सोबत २ ऱ्या स्थानी आहेत.

Comments are closed.