स्वदेशी म्हणून सुरु होत जगप्रसिद्ध झालेले पारले जी
पारले जी म्हटलं की थेट लहानपण आठवतं. पारले जी बिस्कीट चहामध्ये बुडवून खाण्याची मजा काही औरच. ते कपात पडण्याआधी तोंडात घालण्यासाठीची धडपड, कपात पडलं तरी आणखीच चवदार झालेले पारले जी अनेकांना आवडतेदेखील. आजही करोडो भारतीयांचा दिवस चहा आणि पारलेने सुरु होतो. पण या बिस्किटांची खरी सुरुवात कधी झाली यासाठी आपल्याला अगदी १०० वर्षे मागे जावे लागेल.
१९२० च्या दशकात स्वदेशी चळवळीने चांगला जोर पकडला होता. मोहनलाल दयाल चौहान नावाचे गृहस्थ त्यावेळी मुंबईत स्वतःचा कापड व्यवसाय करत. ते या स्वदेशी चळवळीने प्रेरित झाले. परदेशातून येणाऱ्या कापडाचा व्यापार आपण करू नये असा विचार त्यांनी केला. चरितार्थ चालवण्यासाठी काहीतरी केले तर पाहिजेच. आपण आता मिठाई, बिस्किटे बनवून त्याचा व्यवसाय करू असे मोहनलाल यांनी ठरवले. त्यानुसार त्यांनी या व्यवसायाचे रीतसर प्रशिक्षण घेतेले आणि त्यासाठी लागणारी यंत्रे जर्मनीतून मागवली. त्यावेळी या यंत्रांची किंमत ६०,००० रुपये होती.
व्यवसायाची तयारी तर केली पण त्यासाठी जागा तर हवी ना. त्यासाठी मोहनलाल यांनी मुबंईच्या पार्ले भागात एक जुनी फॅक्टरी विकत घेतली आणि १९२९ मध्ये आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीला चौहान यांच्याकडे १२ जण काम करीत असत. चौहान यांचे कुटूंबीयसुद्धा फॅक्टरीच्या इंजिनियरिंग, पॅकेजिंग असा वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करीत.
व्यवसाय सुरु करताना झालेल्या धावपळीत चौहान त्याला नाव देण्याचे विसरले असा एक मतप्रवाह आहे. मग त्यावर पर्याय म्हणून ज्या जागी व्यवसाय सुरु केला त्या पार्ल्याचे नाव देण्याचे ठरले आणि नामकरण झाले पारले.
पारलेचे चे बिस्कीट आत्ता प्रसिद्ध असले तरी हे कंपनीचे पहिले प्रॉडक्ट नव्हते. ते होते ऑरेंज कँडी. त्यानंतर त्यांनी इतरही काही प्रॉडक्टस बनवले. कंपनी सुरु झाल्यावर तब्बल १० वर्षांनी पारलेने पहिल्यांदा बिस्कीट बनविण्यास सुरुवात केली. तोपर्यंत भारतात बिस्किटे प्रामुख्याने आयात केली जात. बिस्किटे हे उच्चवर्गीयांचे खाणे आहे असाही एक समज होता. त्यावेळी बाजारात युनायटेड बिस्किट्स, ब्रिटानिया, ग्लॅक्सो अशा ब्रिटिश बिस्कीट ब्रॅण्ड्सचे वर्चस्व होते. या सगळ्या ब्रॅण्ड्सला उत्तर म्हणून पारलेने आपले बिस्कीट लाँच केले. त्याला नाव दिले पारले ग्लुको.
भारतात बनणारे, खिशाला परवडेल असे हे ग्लुको बिस्कीट लाँच केल्यांनतर लगेचच प्रचंड लोकप्रिय झाले. त्या दरम्यान दुसरे महायुद्धही चालू होते. युद्धात असणाऱ्या ब्रिटिश इंडियन आर्मीने पारले ग्लुकोचा खप भरपूर वाढवला.
दरम्यान पारलेच्या ग्लुको बिस्किट्सला मिळालेले यश पाहून इतरही ब्रॅण्ड्सने आपली ग्लुकोज बिस्किट्स लाँच करायला सुरुवात केली होती. ब्रिटानियाने ग्लुकोज डी नावाने आपले बिस्कीट लाँच केले आणि त्याची जाहिरात करण्यासाठी अमजद खानला घेतले. नावे सारखी असल्याने अनेकजण दुकानात जाऊन फक्त ग्लुको बिस्कीटची मागणी करायचे. मग ते ब्रिटानियाचे आहे की पारलेचे याबाबत त्यांना काही घेणे नसे.
पारलेला हा धोका लक्षात आला. आपले बिस्कीट लोकांच्या लक्षात यावे म्हणून त्यांनी बिस्किटाचे पॅकिंग बदलले आणि पिवळ्या रंगाच्या कागदावर एका छोट्या मुलीचे चित्र वापरून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे करूनही स्पर्धकांना पूर्णपणे अटकाव घालणे शक्य नव्हते. ते त्यांची बिस्किटे विकण्यासाठी ‘ग्लुको’ हा शब्द सर्रास वापरत होते. पारलेने ग्लुको या शब्दाचे पेटंट घेण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. मग त्यांनी आपल्या बिस्किटाचे नाव बदलून पारले ग्लुको ऐवजी पारले जी असे केले.
पुढे जाऊन १९९० मध्ये पारलेने सुपरहिरो शक्तिमानला आपला बसदिच्छादूत म्हणून नेमले. शक्तीमान लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय होता. त्याचा फायदा अर्थातच पारलेला झाला. या सगळ्या प्रवासादरम्यान पारले मोनॅको, किसमी, पॉपिन्स, क्रॅकजॅक, मेलडी, मँगो बाईट असे लोकप्रिय प्रॉडक्टसही कंपनीने बाजारात आणले होते.
लोकांना हवे ते प्रॉडक्ट, लोकांना परवडेल अशा किंमतीत उपलब्ध करून दिल्याने, काळासोबत सतत बदलत राहिल्याने, आजही पारले जी मार्केटमध्ये ६५-७०% शेअर राखून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही पारलेची लोकप्रियता बरीच वर आहे. सध्या कंपनीचे कॅमेरून, घाना, नायजेरिया, इथिओपिया, केनिया, आयव्हरी कोस्ट, नेपाळ, मेक्सिको या आठ देशांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत.
Comments are closed.