अशी पोहोचली नेसकॅफे अवकाशात..

मागच्या लेखात आपण नेसकॅफेचा जन्म कसा झाला याची माहिती घेतली. त्या लेखात नेसकॅफे चंद्रावर जाणारी पहिली कॉफी ठरली हेही नमूद केले होते. मात्र हे शक्य कसे झाले? अवकाशात कॉफी प्यायची तर कशी?

 

याबाबतचा किस्सा १९६० चा आहे. नासाने नेस्लेला एक विशेष विनंती केली. ही विनंती अर्थातच चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांच्या खाण्याबाबतची होती. या लोकांसाठी एका घासाच्या आकाराचे आणि ज्याचे तुकडे बारीक कण होणार नाहीत असे पदार्थ हवे होते. का? तर या पदार्थांचे बारीक तुकडे झाले तर अंतराळवीरांच्या डोळ्यात जाणे, इलेक्ट्रिकल पॅनल्समध्ये अडकणे, त्यामुळे काहीतरी बिघाड होणे अथवा आग लागणे अशा वेगवेगळ्या शक्यता होत्या.

 

यामुळेच नासाकडून नेस्लेला अतिशय कडक वॉर्निंग होती. कोणत्याही परिस्थितीत या खाद्य पदार्थाचे बारीक तुकडे होता कामा नये. हे जरी नेस्लेने जमवले तरी नासाची दुसरी अटसुध्दा होतीच. अंतराळवीरांना दिले जाणारे खाद्यपदार्थ तेवढेच पौष्टीकसुद्धा असले पाहिजेत. नेस्लेने हे चॅलेंज स्वीकारले आणि स्पेस क्यूब बनवले. हे क्यूब्ज चॉकलेट, स्ट्रॉबेरी, पीनट आणि कोकोनट अशा चार वेगवेगळ्या फ्लेवर्सचे होते. शिवाय एकाच घासात सहजासहजी खाता येतील असे होते.

खाण्याचा प्रश्न तर सुटला. पण पृथ्वीवर असताना कॉफीशिवाय दिवस सुरू न करणारे अंतराळवीर अवकाशातदेखील कॉफी पासून वंचित का राहतील?

नेमकं त्याच वेळी नेस्लेने कॉफीची फ्रीज ड्रायिंग प्रोसेस डेव्हलप केली होती. यामुळे कॉफीचा ओरिजिनल फ्लेवर आणि वास टिकून राहत असे.

 

नेस्लेने आपली टेस्टर्स चॉईस नावाची कॉफी अंतराळात पाठविण्याचे ठरवले. टेस्टर्स चॉईस म्हणजे आताच्या नेसकॅफे गोल्डची आवृत्ती म्हटलं तरी हरकत नाही.

नेस्लेने अंतराळात वापरता येईल अशी कॉफी दिली तरी ती वापरून कॉफी बनवणे वाटते तेवढे सोपे नव्हते. कारण अंतराळयानात हवेचा दाब तुलनेने कमी असतो. त्यामुळे पाणी नेहमीपेक्षा कमी तापमानाला उकळते. यामुळे पाण्यात कॉफी विरघळण्याची प्रक्रिया थोडी किचकट होते. पण अंतरळवीरांनी कॉफीच्या प्रेमाखातर तेवढं मॅनेज केलं.

या प्रयोगामुळे अंतराळात जाणारी पहिली कॉफी हा मान मात्र नेस्ले ला मिळाला. तो आजही आणि इथून पुढे सुद्धा असाच राहील.

Comments are closed.