कॉफीचा स्टॉक संपवायचा म्हणून बनवली आणि जगप्रसिद्ध झाली

अमेरिकेन स्टॉक मार्केटमध्ये १९२९ मध्ये मोठा क्रॅश झाला होता. या क्रॅशमुळे जगभरात सगळीकडे कॉफीच्या किंमती पडल्या. इतक्या पडल्या की उत्पन्नाचा खर्चही निघेल की नाही याची शास्वती नव्हती. लॉसमध्ये विकण्यापेक्षा साठवलेली बरी म्हणून जगात कॉफीचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या ब्राझील या देशाने कॉफी विकलीच नाही. परिणामी देशात मोठ्या प्रमाणावर कॉफीचासाठा तसाच पडून राहिला.

यावर उपाय म्हणून ब्राझीलने थेट नेस्ले या कंपनीला साकडे घातले. आमच्याकडे असलेल्या जास्तीच्या कॉफीचा वापर करून काहीतरी बनवता येईल का? अशी विचारणा करण्यात त्यांनी केली. नेस्लेने हे आव्हान स्विकारण्याचे ठरवले.

त्यांनी आपला कॉफी स्पेशालिस्ट मॅक्स मॉरगनथॅलर याला हा प्रोजेक्ट दिला. त्याआधी जगात कॉफी नव्हतीच असे नाही. पण मॅक्सवर जबाबदारी असलेला प्रोजेक्ट काहीसा वेगळा होता. त्याला अशी कॉफी बनवायची होती की ज्यात फक्त पाणी टाकले की कॉफी तयार होईलच शिवाय त्याला कॉफीचा फ्लेवर देखील असेल. याआधी असे काही प्रॉडक्टस बाजारात आले होते. पण त्यांना क्वालिटी आणि चव म्हणावी तशी जमली नव्हती.

 

मॅक्सने १९२९ मध्ये काम सुरू केले तरी यश येण्यासाठी त्याला तब्बल ९ वर्षे मेहनत करावी लागली आणि अखेरीस १९३८ मध्ये त्याने ही इन्स्टंट कॉफी बनवली. नेस्लेने ही कॉफी बनवली म्हणून त्यांच्या नावाची पहिली तीन अक्षरे आणि कॅफे असे वापरून या कॉफीचे नेसकॅफे असे नामकरण करण्यात आले.

१ एप्रिल १९३८ मध्ये नेसकॅफे स्वित्झर्लंडमध्ये लाँच करण्यात आली. तिला तिथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण नेसकॅफेला खरी प्रसिद्धी दुसऱ्या महायुद्धात मिळाली. या महायुद्धात अमेरिकन सेनेला दिल्या जाणाऱ्या रेशनमध्ये नेसकॅफेचा समावेश असे. सैन्याला ही बनवायला सोपी, पटकन बनणारी आणि चविष्ट कॉफी प्रचंड आवडली. त्यांनीच या कॉफीचे मार्केटिंग सगळीकडे केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यामुळे नेसकॅफेला इतर देशांतूनही भरपूर मागणी वाढली. अमेरिकेबरोबरच फ्रान्स, ब्रिटन, स्वित्झर्लंडमध्ये ही कॉफी लोकप्रिय झाली.

 

नेसकॅफेच्या नावावर काही अफाट विक्रमसुद्धा आहेत. 

१९५३ मध्ये एडमंड हिलरी आणि तेंझिंग नोर्गे जेव्हा एव्हरेस्ट शिखरावर गेले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत नेसकॅफेचा टिन नेला होता.

१९६९ मध्ये जेव्हा निल आर्मस्ट्रॉंग अपोलो ११ मधून चंद्रावर गेला तेव्हा त्यानेही आपल्यासोबत नेसकॅफे नेली होती. चंद्रावर जाणारी पहिली कॉफी बनण्याचा मान या निमित्ताने नेसकॅफेला मिळाला.

आजमितीला जगातील १८० हून अधिक देशांमध्ये नेसकॅफे विकली आणि प्राशन केली जाते.

Comments are closed.