जेव्हा पेप्सीसाठी रशियाने विकल्या होत्या पाणबुड्या

५ मार्च २०२२ रोजी युक्रेन सरकारच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले होते. रशिया युक्रेन युद्ध सुरु असतानाही कोकने रशियामध्ये आपले प्रॉडक्ट विकणे बंद केले नाही. या ट्विटमधून युक्रेन सरकारने कोकची स्पर्धक कंपनी पेप्सीला रशियामधून बाहेर पडून कोकला उत्तर देण्याचे आवाहन केले होते. या ट्विटनंतर काही दिवसांतच कोक आणि पेप्सीने रशियामध्ये आपले प्रॉडक्टस न विकण्याचा निर्णय घेतला होता.

ही आत्ताची गोष्ट असली तरी याआधी पेप्सी आणि रशियाचे व्यावसायिक संबंध इतके चांगले होते की एक रशियाने पेप्सीसाठी चक्क आपल्या पाणबुड्या विकल्या होत्या. साधारण १९५९-६० मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहॉवर यांना रशियाच्या नागरिकांना कॅपिटॅलिझमचे फायदे सांगायचे होते. त्यासाठी त्यांनी मॉस्को शहरात अमेरिकन नॅशनल एक्झिबिशन भरवले. आपले सहकारी, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यानां प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पाठवले.

 

या प्रदर्शनात निक्सन आणि रशियाचे नेते ख्रुस्चेव्ह यांच्यात कॅपिटॅलिझम वि कम्युनिझम यावरून वाद झाला. हा वाद वाढत वाढत बराच विकोपाला गेला. शेवटी त्या मिटिंगमध्ये उपस्थित असलेले पेप्सीच्या उपाध्यक्षांनी ख्रुस्चेव्ह यांनी शांत व्हावे म्हणून त्यांना पेप्सीचा एक कप प्यायला दिला. हे पेय ख्रुस्चेव्ह यांना आवडले. इतके आवडले की आपल्या देशातल्या नागरिकांनाही या पेयाचा आस्वाद घेता यावा म्हणून त्यांनी पेप्सीला आपल्या देशात हे पेय उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
पेप्सीने हे डील स्वीकारले. पण त्यावेळी परिस्थिती अशी होती की रशियाचे चलन इतर कोणतेही देश स्वीकारत नव्हते. पण इच्छा असेल तर  उक्तीप्रमाणे रशियाने यातूनही मार्ग काढला. त्यांनी पेप्सीला पैसे म्हणून वोडका देण्याचे ठरवले. अशा प्रकारे रशियामध्ये पेप्सी उपलब्ध झाले.

 

हा असा बार्टर पद्धतीचा व्यापार ऐंशीच्या दशकापर्यंत सुरु राहिला. नंतर मात्र पेप्सी आणि रशिया यांच्यातले अग्रीमेंट संपणार होते. अग्रीमेंट रिन्यू करायचे म्हटले तरी पुन्हा एवढा वोडका आणणार कुठून? पण पेप्सीच्या प्रेमात असेल्या रशियाने याहीवेळी मार्ग काढला. काय केलं? तर थेट आपल्या देशाच्या १७ पाणबुड्या आणि आणखी काही जहाजे पेप्सीला देऊन टाकली. त्याबदल्यात पेप्सी पेय रशियात आले. पेप्सीकडून ३ बिलियन डॉलरचे पेय घेण्यासाठी रशियाने ही सगळी युद्धसामग्री त्यांना दिली होती. या व्यवहारानंतर काही काळासाठी पेप्सी कंपनी जगातली ६ वी मोठी मिलीटरी बनली. नंतर अर्थात पेप्सीने ही सगळी युद्धसामग्री एका स्वीडिश कंपनीला विकून त्यातूनही पैसे कमावलेच.

Comments are closed.