हिंदुस्थान में तो बस फॉग चलता है
गेले जवळपास दशकभर भारतात गल्लीबोळात कुणालाही “क्या चल रहा है?” असं विचारलं तर त्याच उत्तर “फॉग चल रहा है” असंच असतं. अगदी मजेत का होईना ज्येष्ठही या टॅगलाईनचा वापर करताना दिसतात. फॉग ह्या ब्रँडने आपल्या ग्राहकांच्या हृदयात स्थान कसे मिळवले? विशेषतः मार्केटमध्ये ऍक्स, पार्क ऍव्हेन्यू, निविया यासारखे नावाजलेले ब्रँड्स असताना फॉगने असे काय केले की लोकांनी या ब्रँडला आपलेसे केले.
या सगळ्याची सुरुवात शोधली तर अगदी १९८६ पर्यंत जावे लागते. दर्शन पटेल यांनी आपला फॅमिली बिझनेस असलेल्या पारस फार्माची सूत्रे हातात घेतली. पारस फार्मा म्हटल्यावर लक्षात आलं नसेल. पण मूव्ह, रिंग गार्ड, सेट वेट, डर्मी कूल, डि कोल्ड ही नवे सगळ्यांनाच परिचयाची आहेत. हे सगळे ब्रँड पारस फार्माचेच आहेत. दर्शन पटेल यांनी हे ब्रँड्स सुरु केले आणि मोठेही केले.
बिझनेस जसा वाढत गेला तशी मोठ्या प्लेयर्सची पारस फार्मावर नजर पडली. त्यातूनच २०१० साली जगप्रसिद्ध कंपनी रेकीट बेनकिजरने पारस फार्माला विकत घेतले. थोडेथोडके नाही तर तब्बल ३२०० कोटींना. एवढी मोठी रक्कम हातात आल्यावर दर्शन पटेल यांनी विनी कॉस्मेटिक्स नावाची आणखी एक कंपनी सुरु केली. या कंपनीतून आता आणखी काहीतरी मोठे उभे करायचे अशी त्यांची इच्छा होती.
साधारण याच काळात भारतीय तरुणाईमध्ये डिओड्रंट प्रचंड ट्रेंडिंग होते. भारतातल्या बऱ्याच राज्यात असेही उष्ण हवामान असल्याने डिओड्रंट एक गरज बनली होती असे म्हणूयात हवे तर. त्यावेळी हिंदुस्थान युनिलिव्हरच्या ऍक्सचा मार्के टमध्ये बोलबाला होता. त्यांच्यामागे पार्क ऍव्हेन्यू, निविया आणि आणखीही ३-४ मोठे प्लेयर्स मार्केटमध्ये होते. एवढी स्पर्धा असतानाही पटेल यांनी या मार्केटमध्ये येण्याचे ठरवले. त्याला कारणही तसेच होते.
दर्शन पटेल यांनी यावेळी स्वतः मार्केट रिसर्च केला होता. त्यातून असे लक्षात आले की लोक डिओड्रंट वापरत तर आहेत पण सगळ्यांची एक तक्रार आहे. ही तक्रार होती की डिओड्रंट पटकन संपतो. पटेल यांनी याच गोष्टीवर फोकस करत आपला डिओड्रंट बाजारात आणला. असा डिओड्रंट ज्यात गॅस नव्हता. हाच त्यांनी आपल्या प्रॉडक्टचा यूएसपी बनवला.
पटेल यांनी आपल्या डिओड्रंटसाठी असा पंप बनवला की ज्याला एरोसोलची गरज नसेल आणि हा पंप फक्त बाटलीतले लिक्वीड पंप करेल. पटेल यांनी आणखी एक युक्ती केली. आपलं डिओड्रंट इतरांपेक्षा छोट्या बाटलीमध्ये लाँच केला. कारण दिले आम्ही फक्त डिओड्रंट विकतो, गॅस नाही. त्यामुळे आम्हाला मोठ्या बाटलीची गरज नाही.
पटेल यांनी आणखी एक गोष्टीवर फोकस केला. ती म्हणजे प्रॉडक्टचे मार्केटिंग. फॉगच्या जाहिरातीमध्ये त्यांनी स्पर्धक तुम्हाला डिओड्रंट कमी आणि गॅस जास्त विकतात असे मार्केटिंग केले. टॅगलाईन ठेवली ‘बिना गॅसवाला डिओड्रंट’. फॉग डिओड्रंटची एक बाटली ८०० स्प्रे मारून शकेल असे प्रॉमिस त्यांनी आपल्या ग्राहकांना केले.
भारतासारख्या देशात ग्राहकांना व्हॅल्यू फॉर मनी देणारे प्रॉडक्ट मिळाले की ते त्याला डोक्यावर घेतात. फॉगच्या बाबतीत हेच झाले. लाँचनंतर पहिल्याच वर्षात त्यांनी १०० कोटींचा रेव्हेन्यू नोंदवला आणि १०% हून अधिक मार्केट शेअरदेखील कमावला. प्रचंड आक्रमक मार्केटिंग करत फॉगने फक्त २ वर्षात २०१३ मध्ये ऍक्सला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली.
२०१५ मध्ये फॉगने आत्ता प्रसिद्ध असलेली फॉग चल रहा है ही जाहिरात आणली. या जाहिरातीतून भारतात फक्त आणि फक्त फॉगच चालतो असे कंपनीने ग्राहकांच्या मनावर ठसवले. डिओड्रंट इंडस्ट्री साधारणपणे १०-१२% CAGR ने वाढते. फॉगने मात्र २०१९ मध्ये तब्बल २०% CAGR ने प्रगती करत तब्बल १००० कोटींचा रेव्हेन्यू पार केला. अजूनही कंपनीकडे २०% च्या आसपास मार्केट शेअर आहे.
फॉग हे नाव जरी प्रसिद्ध असले तरी त्याचा फुलफॉर्म Friend of Good Guys/Girls असा होतो हे तुम्हाला माहित होते का?
Comments are closed.