जेव्हा मासे देतात गुंतवणुकीचे धडे

ही गोष्ट आहे साठच्या दशकातली. त्यावेळी अमेरिकेतल्या फिश फार्मिंग करणाऱ्या लोकांना एका अनोख्या समस्येने भेडसावले होते. ही समस्या होती पाण्यात उगवणाऱ्या अल्गी या एक प्रकारच्या शेवाळाची. या अल्गीमुळे एखाद्या तळ्यात किती माशांचे उत्पादन होऊ शकते यावर मर्यादा येत असे. या अल्गीला मारण्यासाठी केमिकल्सचा वापर करणे हा एक पर्याय होता. पण तो अर्थातच लॉंग टर्ममध्ये अपायकारक ठरला असता. मग अरकान्सास राज्यातील शास्त्रज्ञांनी एक उपाय काढला. कोरिया, चीन यांसारख्या पूर्व आशियाई देशात एशियन कार्प नावाचा एक मासा असतो. हा मासा अल्गी आणि पाण्यातील इतर वनस्पती खातो. या शास्त्रज्ञांनी एशियन कार्प अमेरिकेत मागवून घेतले आणि काही तळ्यांमध्ये ते सोडले. काय जादू?? काही दिवसांतच त्यांच्या समस्येचे निराकरण झाले.

समस्या सुटली म्हणून या शास्त्रज्ञांनी या माश्यांचा आणखी अभ्यास केला. हे मासे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर वापरता येतील का याचा विविध शक्यता पडताळून पाहिल्या. त्यानंतर हे मासे पाण्यात सोडण्याचे फायदे हे तोट्यांपेक्षा जास्त असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

मग अमेरिकेतील फिश फार्मिंग करणाऱ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात हे एशियन कार्प आयात करायला सुरुवात केली. हे मासे खाण्यासाठी नाही तर इतर माश्यांपासून, शेवाळापासून पाणी साफ ठेवण्यासाठी वापरले जात.यामुळे फिश फार्मिंग करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले आणि साहजिकच ते खुश झाले.

काही शेतकरी यशस्वी झाले पाहून आणखी शेतकऱ्यांनी ह्या माश्यांची आयात केली. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी जेव्हा त्यांचा वापर सुरू केला तेव्हा साहजिकच काही मासे शेततळी सोडून नद्यांमध्ये जाणे अगदीच शक्य होते. सुरुवातीला कोणाला याबद्दल फारसे काही वाटलेही नाही.

त्यांच्यामुळे काही धोका निर्माण होऊ शकेल असा विचारही कोणाच्या मनात आला नाही. नव्वदीच्या दशकात अमेरिकेतील काही प्रांतांमध्ये पूर आला.जेव्हा पूर ओसरला तेव्हा मरून पडलेल्या १० पैकी ९ मासे एशियन कार्प होते. एवढ्या मोठ्या संख्येने की त्यांनी जवळपास अमेरिकेतील माश्यांच्या स्थानिक प्रजाती जणू खाऊन टाकल्या होत्या.

या एशियन कार्प माश्यांची संख्या वाढतच होती. यासाठी वेगवेगळ्या राज्यांनी अनेक उपाययोजना राबवल्या पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

शास्त्रज्ञांना या माश्यांचा एक गुणधर्म माहीत होता. तो म्हणजे ते अतिशय वेगाने आपली संख्या वाढवू शकतात. हाच गुणधर्म शेतकऱ्यांनासुद्धा माहीत होता. म्हणजे दोन मासे (नर आणि मादी) हे शंभर मासे पैदा करीत. या शंभरमध्ये पुन्हा जोड्या होऊन ते आणखी शंभरच्या पटीत संख्या वाढवत. म्हणजे आपल्या आर्थिक भाषेत सांगायचे तर माशांचे कंपाऊंडिंग होत होते.

सुरुवातीला त्यांची वाढणारी संख्या मनातल्या मनात आकडेमोड करून मोजता येत असे. पण जशी संख्या वाढत गेली तसे हे अवघड होऊ लागले. पेन आणि पेपर घेऊन संख्या मोजण्याची गरज भासू लागली.

आपल्या इन्व्हेस्टिंगच्या प्रवासातील कंपाऊंडिंग असेच काहीसे असते. आपली संपत्ती वाढविण्याच्या प्रवासात याचाच फायदा होत असतो. एकदा का कंपाऊंडिंग सुरू झाले की आपल्याला पेन पेपर, कॅल्क्युलेटर घेऊन बसावे लागते. कारण त्याचा वेग तेवढा प्रचंड असतो. शॉर्ट टर्ममध्ये छोट्या फायद्याचा विचार करण्यापेक्षा लॉंग टर्ममध्ये कंपाऊंडिंग करून निर्माण होऊ शकणाऱ्या संपत्तीचा विचार आपण केला पाहिजे.

Comments are closed.