ईव्हीमध्ये टाटांचीच हवा, एप्रिल महिन्यात मिळवला ७०% मार्केट शेअर
Tata Motors managed to achieve 70% market share in EV segment for April 2021
भारतात गेल्या काही महिन्यांत ईव्ही गाड्यांची लोकप्रियता वाढताना दिसून येत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या गाड्यांचे ईव्ही मॉडेल्स ग्राहकांसाठी लाँच केले आहेत. सध्या मर्यादित असलेले हे मार्केट लवकरच भरपूर वाढीस लागेल असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार नोंदवतात.
भारतात एप्रिल २०२१ मध्ये एकूण ७४९ ईव्ही गाड्यांची विक्री झाली. यामध्ये टाटा मोटर्सने नेक्सॉन ईव्हीच्या ५२५ गाड्या विकत तब्बल ७०% मार्केट शेअर मिळवला आहे. एप्रिल २०२१ या एका महिन्यात टाटा मोटर्सने विकलेल्या एकूण नेक्सॉन गाड्यांपैकी ७.५% वाटा नेक्सॉन ईव्हीचा आहे.
नेक्सॉन ईव्हीखालोखाल १५६ गाड्यांची विक्री करत एमजी ZS EV ने दुसरे स्थान मिळवले. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर टाटा मोटर्सची तिगॉर ईव्ही (५६ गाड्या) आणि ह्युंदाईची कोना ईव्ही (१२ गाड्या) राहिल्या. याआधी टाटा मोटर्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसारनेक्सॉन ईव्हीने ४००० गाड्यांच्या विक्रीचा टप्पा गाठला होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारतातील सर्वाधिक विक्री झालेली ही गाडी होती. मार्च २०२१ मध्ये कंपनीने एकूण ७०५ गाड्या तर आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत तब्बल १७११ गाड्या विकल्या होत्या.
टाटा मोटर्सची गाडी विकत घेण्याचा विचार करत असाल तर काही मॉडेल्सवर मे २०२१ मध्ये ६५००० रुपयांपर्यंत डिस्काऊंट आहे. तुम्हाला तर जुनी गाडी एक्स्चेंज करून नेक्सॉन ईव्ही घ्यायची असेल तर कंपनीकडून १५००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसदेखील दिला जातो आहे.
Comments are closed.